त्याची केव्हाही आठवण आली तरी,
सर्वांगावर सरकन् काटा येतो,
डोक्यावरचा केस न केस उभा रहातो,
आणि थंडीच्या दिवसातही दरदरुन घाम फुटतो,
अंधारलेल्या डोळ्या समोर, नाचतात आकृत्या भेसुर,
जिभेला पडते कोरड आणि काना मधून निघतो धुर,
कित्येकांना याने लाचार बनवले, भिकारी बनवले,
याच्या दहशती मूळे कित्येक पापभिरु दूराचारी झाले,
तो आहेच असा भितीदायक,
आता पर्यंत भेटलेला सर्वात मोठा खलनायक,
मी मी म्हणणा-यांची त्याच्या पुढे टरकायची,
नुसत्या आठवणीने कित्येकांची बोलती बंद व्हायची,
वर्ष सहा महिन्यातुन तो एकदा कधीतरी यायचा,
पण त्याचा बोलबाला मात्र वर्षभर असायचा,
किती उपाय झाले, नवस झाले सायास झाले,
पण याच्या समोर कोणी सुध्दा नाही टिकले,
एवढ्या वर्षांनंतर सुध्दा मला त्याचीच स्वप्ने पडतात,
तेरा,सतरा,एकोणीस,सत्तावीसचे,पाढे अजूनही अडतात,
कितिही अभ्यास केला तरी, ऐन वेळी, वाजवतो हा पुंगी,
गणिताचा पेपर म्हटले की टाकतात सगळे नांगी,
पैजारबुवा,