भाग २ इथे
.. .. ..
हृदयाचे आरोग्य जाणून घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या काही मूलभूत तपासण्या नित्यनेमाने केल्या जातात. अशा प्राथमिक तपासण्यांची माहिती आपण या लेखात घेऊ. या चार चाचण्या अशा आहेत :
1. नाडी तपासणी
2. रक्तदाब मोजणी
3. स्टेथोस्कोपने छातीची तपासणी
4. इसीजी तपासणी
इथे एक मुद्दा लक्षात येईल. या चाचण्या जशा संबंधित रुग्णावर करतात त्याचप्रमाणे त्या निरोगी व्यक्तींसाठी सुद्धा आरोग्यचाळणी चाचण्या म्हणून वापरल्या जातात. (या चाचण्यांमध्ये जे बदल/बिघाड आढळून येतात त्यासाठी हृदयविकारांव्यतिरिक्त अन्य कारणे/विकार सुद्धा कारणीभूत असतात).
· नाडी (pulse) तपासणी
वरील तपासण्यांपैकी ही एकमेव अशी आहे की जिला कुठलेही उपकरण लागत नाही. रुग्णाच्या मनगटाजवळ असलेल्या रोहिणीवर हाताची तीन बोटे ठेवून नाडी मोजली जाते. या तपासणीत नाडीचे प्रतिमिनिट ठोके मोजले जातात तसेच ती तालबद्ध आहे किंवा नाही हे सुद्धा पाहिले जाते (rate & rhythm).
निरोगी प्रौढात तिची गती प्रतिमिनिट 70 ते 80च्या दरम्यान असते. जेव्हा काही कारणांमुळे ही गती 50 पेक्षा कमी होते त्याला मंदगती नाडी (bradycardia), तर 100 पेक्षा जास्त झाल्यास जलगदगती नाडी (tachycardia) असे म्हणतात.
नाडीची गती अनेक कारणांमुळे बदलू शकते. यामध्ये काही कारणे नैसर्गिक स्वरूपाची आहेत तर अन्य बरीच कारणे आजारांशी संबंधित आहेत.
नैसर्गिक गोष्टींमध्ये दोन मुद्दे महत्त्वाचे :
१. श्वसन : श्वास नाकातून आत घेताना नाडीगती थोडी वाढते. या उलट श्वास बाहेर टाकताना ती कमी होते.
२. व्यायाम : जसे आपण व्यायाम करू लागतो आणि त्याची तीव्रता वाढते तसतसे नाडीचे ठोके वाढू लागतात. थोडक्यात, व्यायामाची तीव्रता आणि नाडीचे ठोके समप्रमाणात राहतात.
आता विशिष्ट शारीरिक परिस्थिती आणि आजारांची संबंधित कारणे पाहू.
जलदगती नाडी :
1. ताप येणे : साधारणपणे शरीरातील तापमान 1F ने वाढल्यास नाडीगती प्रति मिनिट 10ने वाढते.
2. पेशींना होणारा ऑक्सिजन पुरवठा कमी करणारे विविध आजार
3. थायरॉईड अधिक्य
4. भावनिक कारणे : भीती, राग-संताप शरीराच्या पृष्ठभागावरील वेदना
मंदगती नाडी :
1. थायरॉईड न्यूनता
2. भावनिक : अतीव दुःख, मानसिक धक्का
3. शरीराच्या खोलवर भागातून निर्माण झालेली वेदना
4. हृदयाच्या पेसमेकर आणि संदेशवहन यंत्रणेतील बिघाड
रक्तदाब मोजणी
1. रक्तदाब म्हणजे काय?
हृदयातून पंप केलेले रक्त शरीराच्या सर्व रक्तवाहिन्यांमधून सातत्याने पुढे जात राहण्यासाठी त्याला एक विशिष्ट दाब असणे आवश्यक असते; हाच तो रक्तदाब (BP). अर्थातच हा दाब स्थिर नसतो. हृदयाच्या प्रत्येक आकुंचनाबरोबर (systole)तो वाढतो आणि या उलट हृदयप्रसारणामध्ये (diastole) तो कमी होतो. या दोन्ही अवस्थांमधला रक्तदाब जाणणे महत्त्वाचे असते. या दोन प्रकारच्या दाबांना अशी नावे आहेत :
. आकुंचन दाब (SBP)
. प्रसारण दाब (DBP)
सामान्य माणसाच्या भाषेत यांचा ‘वरचा’ आणि ‘खालचा’ दाब असा उल्लेख केला जातो.
पुढील विवेचनात आपण त्यांची इंग्लिश लघुरुपे वापरू.
2. रक्तदाब मोजणी
कुठल्याही व्यक्तीचा रक्तदाब मोजण्याआधी त्या व्यक्तीस शांतपणे पाच मिनिटे बसू देणे महत्त्वाचे आहे. दवाखान्यांमध्ये बहुतांश वेळा रुग्ण बसलेला असतानाच्या अवस्थेत रक्तदाब मोजला जातो. रक्तदाब मोजण्याची नेहमीची जागा म्हणजे आपल्या हाताचा दंड. दंडाभोवती एक प्रमाणित आकाराची पट्टी गुंडाळली जाते आणि तिच्यात पंपाद्वारे हवा भरली जाते आणि सोडली जाते. चित्र पहा :
इथे एक मुद्दा महत्त्वाचा आहे. प्रौढ व्यक्ती, लहान मुले आणि खूप जाड व्यक्ती या सर्वांसाठी एकाच आकाराची पट्टी वापरून चालत नाही. त्यासाठी वेगवेगळ्या मापाच्या पट्ट्या उपलब्ध असतात. तसेच एका बैठकीत रक्तदाब किमान तीनदा मोजावा अशी शिफारस आहे !
3. नॉर्मल रक्तदाब
परंपरेनुसार हा प्रौढात 120/ 80 mmHg असा मानला जातो. परंतु नवीन संशोधनानुसार हे दोन्हीही अंक त्यापेक्षा जरा कमी असल्यास अधिक चांगले (<120/ <80). 110/70 हा दाब सर्वोत्तम (optimal) मानला जातो.
वरील दोन्ही दाबांमध्ये जो फरक असतो त्याला पल्स प्रेशर (PP) असे म्हटले जाते आणि निरोगी अवस्थेत ते 40mmHg असते.
4 दैनंदिन सामान्य घटकांचा प्रभाव : जरी आपण ‘नॉर्मल’ रक्तदाब <120/ <80 हा मानतो, तरी काही नैसर्गिक घटनांमुळे त्याच्यात नित्य फरक पडत असतो. असे काही महत्त्वाचे घटक खालीलप्रमाणे :
. दिवसाची वेळ : पहाटेच्या वेळेस दाब सर्वात कमी असतो तर दुपारच्या जेवणानंतर साधारणपणे एक तासाने तो 5-6 mmHg अधिक असतो. शांत झोप लागली असता सुरुवातीच्या तासांमध्ये SBP 15 ते 20 mmHgने कमी होऊ शकतो. मात्र झोपेत वारंवार व्यत्यय आल्यास तो वाढतो.
. व्यायाम : विशेष प्रशिक्षण नसलेल्या सामान्य माणसाच्या व्यायामादरम्यान दाबांमध्ये असा फरक पडतो :
सौम्य व्यायामामुळे SBP वाढतो पण DBPत सहसा फरक नाही. तीव्र व्यायाम करताना दोन्ही दाब वाढतात.
. भावना : उत्तेजना, भीती आणि काळजीमुळे SBP वाढतो.
. आनुवंशिकता : दाब नॉर्मलपेक्षा सातत्याने जरा वरच्या किंवा खालच्या बाजूस असण्याची प्रवृत्ती बऱ्याच जणांमध्ये असते आणि त्यामागे आनुवंशिकतेचा भाग असतो.
. शरीराची स्थिती : यामुळे मुख्यतः DBPवर परिणाम होतो. बसण्याच्या स्थितीशी तुलना करता - आडवे पडले असता तो कमी होतो तर उभे राहिले असता तो वाढतो.
. मोजणीचे ठिकाण: हा बऱ्यापैकी महत्त्वाचा मुद्दा आहे ! रुग्णाच्या घरच्या मोजणीत जो दाब असतो त्यापेक्षा दवाखान्यात तो सुमारे 12/7 mmHg ने वाढतो/वाढू शकतो.
5. रोग व उच्चरक्तदाब
जेव्हा रक्तदाब सातत्याने 130/80च्या वर राहतो तेव्हा उच्चरक्तदाब असे निदान केले जाते. अशा सुमारे 90 टक्के लोकांमध्ये याचे नक्की कारण सापडत नाही. उरलेल्या 10 टक्के लोकांना विविध प्रकारचे आजार असू शकतात. त्यामध्ये रक्तवाहिन्या, मूत्रपिंड आणि हार्मोनविषयक आजारांचा समावेश आहे. (उच्चरक्तदाब हा स्वतंत्र मोठा विषय असल्याने सध्या इतकेच पुरे).
· स्टेथोस्कोपने छातीची तपासणी
छातीमधील हृदयाचे स्थान लक्षात घेऊन छातीवरील संबंधित भागांमध्ये टप्प्याटप्प्याने स्टेथोस्कोप ठेवून विविध आवाज ऐकता येतात.
1. निरोगी अवस्थेत प्रत्येक व्यक्तीत किमान दोन आवाज (S1 & S2) ऐकू येतात. मागच्या लेखात दिल्याप्रमाणे ते हृदयझडपा बंद होण्याशी संबंधित असतात. या आवाजांच्या ध्वनीशक्ती, स्पष्टपणा आणि नियमिततेकडे लक्षपूर्वक ऐकावे लागते.
2. काही कसरतपटू तसेच गरोदर स्त्रियांमध्ये एक अतिरिक्त तिसरा आवाज (S3) ऐकू येऊ शकतो. एरवी तिसरा व चौथा (S4) आवाज विविध हृदयविकारांचे निदर्शक असतात.
3. खरखर किंवा कुरकुर (murmur), ‘स्नॅप’ किंवा ‘क्लिक’ या पद्धतीचे आवाज विविध हृदयविकारांमध्ये ऐकू येतात.
इसीजी तपासणी
हृदयाच्या प्रत्येक ठोक्याबरोबर त्याच्यात काही विद्युत बदल होतात. आपले शरीर हे उत्तम वीजवाहक असल्याने त्या विद्युत संवेदना सर्व शरीरभर पसरतात. आपण जर शरीराच्या बाह्य पृष्ठभागावर काही ठिकाणी वीज संवेदक (electrodes) ठेवले तर ते या संवेदना पकडू शकतात. त्यानंतर या संवेदनांचे एका आलेखात रूपांतर करता येते. त्याला हृदयाचा विद्युत-आलेख अर्थात इसीजी असे म्हणतात. हा आलेख काढण्यासाठी electrocardiograph हे उपकरण वापरले जाते.
आलेख काढताना शरीरावर एकूण बारा ठिकाणी संवेदक ठेवले जातात (12 leads).
मूलभूत आलेख संक्षिप्त स्वरूपात असा असतो : (चित्र पहा)
त्यामध्ये दिसणाऱ्या P, Q, R, S &T या लहरी हृदयाच्या विविध कप्प्यांच्या आकुंचन व प्रसरणाशी संबंधित असतात. (या लहरींना पारंपरिक ‘ABCD’ अशी नावे न देता PQRST अशी का देण्यात आली हा एक कुतुहलाचा मुद्दा आहे. त्या बाबतीत काही गृहीतके आणि दंतकथा प्रसवल्यात. Einthoven या वैज्ञानिकांनी इसीजीवर प्रमुख संशोधन केले. त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात जो आलेख काढला होता त्यातील लहरीना ABCD असे म्हटले होते. परंतु नंतर गणिती सूत्राने नवा सुधारित आलेख करण्यात आला तेव्हा मागच्या ABCDशी गोंधळ नको म्हणून त्यांना PQRST नावे देण्यात आली).
रुग्णाच्या या आलेखानुसार खालील प्रकारच्या हृदयविकारांच्या निदानात मदत होते :
. विविध हृदयतालबिघाड आणि हार्ट ब्लॉक .
. हृदयविकाराचा झटका (infarction)
. शरीरातील सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम इत्यादींच्या पातळीमधील बदलांमुळे हृदयावर होणारे परिणाम
संबंधित रुग्णाची लक्षणे समजून घेतल्यानंतर वरील चार प्राथमिक तपासण्या केल्या जातात. त्यांच्या निष्कर्षानुसार एक प्राथमिक रोगनिदान करता येते. त्यानंतर गरजेनुसार अधिक वरच्या पातळीवरील विशेष चाचण्या (प्रयोगशाळेतील किंवा प्रतिमा तंत्रज्ञानातील) करण्याचा निर्णय घेता येतो.
बऱ्याच जणांच्या बाबतीत केल्या जाणाऱ्या अशा एका चाचणीचा आता उल्लेख करतो :
Treadmill Stress Test
या चाचणीमध्ये संबंधित व्यक्तीला विशिष्ट प्रकारच्या सायकलवर ठराविक वेळ व्यायाम करायला सांगतात आणि त्या दरम्यान तिच्या नाडीगती, रक्तदाब आणि इसीजी या तपासण्या केल्या जातात. सदर चाचणी कोणाच्या बाबतीत करायची आणि चाचणीच्या दरम्यानची व्यायामाची पातळी या गोष्टी डॉक्टर ठरवतात. विश्रांती अवस्थेपेक्षा अधिक शारीरिक श्रम केले असता शरीर कसा प्रतिसाद देते याची कल्पना यातून येते. त्यातून संभाव्य रोगाचा निष्कर्ष काही अंशी काढता येतो.
या लेखात उल्लेखिलेल्या चारही मूलभूत चाचण्यांशी सर्वसामान्य लोकांचा अधूनमधून संबंध येतो. त्यांची शास्त्रीय माहिती सर्वांना व्हावी या दृष्टिकोनातून केलेले हे लेखन.
****************************
क्रमशः
संदर्भ