दरवर्षी रेल्वे सप्ताहात रेल्वेनं एखादा प्रवास करायचा माझा अनेक वर्षांपासूनचा शिरस्ता. यावेळी जरा वेगळ्या पद्धतीनं प्रवास करायचा ठरवलं. त्यानंतर मी माझ्या भाच्याबरोबर परतीसाठी मिरजेहून 12493 दर्शन एक्सप्रेसची निवड केली आणि आरक्षणही करून टाकलं.
दर्शन एक्सप्रेस मिरजेहून पहाटे 4.50 ला दर्शन निघत असल्यामुळं ही गाडी पकडण्यासाठी आम्हाला कोल्हापूरहून मध्यरात्रीनंतर मिरजेला जाणं आवश्यक होतं. त्यासाठी आम्ही कोल्हापूरहून रात्री निघणारी कोल्हापूर-पुणे विशेष एक्सप्रेसची निवड केली. त्या गाडीनं अनारक्षित डब्यातून मध्यरात्री 00.35 ला मिरज गाठलं. तिथं पोहचलो तेव्हा दर्शन काही मिनिटांपूर्वीच फलाट क्रमांक दोनवर दाखल झालेली दिसली.
देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मिरज मार्गे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या प्रवाशांची फलाटावर गर्दी दिसत होते. त्या गर्दीतच एकेठिकाणी मोकळ्या जागी आम्ही बसलो होतो. गाड्यांची ये-जा, त्यांचे बदलले जाणारे चालक-गार्ड, प्रवाशांची होत असलेली धावपळ हे सगळं बघताबघता तीन तास कसे निघून गेले समजलंच नाही. पहाटे सव्वातीन वाजता दर्शनला घेऊन आलेला WAP-7 कार्यअश्व पुन्हा जागा झाला. परतीच्या प्रवासात तोच तिला निजामुद्दीनला घेऊन जाणार होता. आमच्या समोरून तो दर्शनकडे निघून गेल्यावर आम्ही दोन नंबरच्या फलाटाकडे निघालो. तेव्हा हवेतील उबदारपणा जाऊन जरा गारवा जाणवू लागला होता. आता मिरजमार्गे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचीही वर्दळ वाढू लागली होती.
दर्शनला ते इंजिन जोडून झाल्यावर त्याचे HOG कपलर जोडण्याचे प्रयत्न केले जाऊ लागले. गाडीत बसल्यावर आता पुन्हा एकदा रेल्वेच्या फिरत्या चहावाल्याकडून आम्ही चहा घेतला. तोपर्यंत सव्वाचार होत आल्यामुळं आमच्या गाडीत प्रवाशांची संख्या वाढत जाऊ लागली. सुट्ट्यांचे दिवस असल्यामुळं दर्शनच्या बिगर-वातानुकुलित डब्यांमध्ये आरक्षण फुल्ल झालेलं होतं.
आजवरच्या शिरस्त्यानुसार रेल्वे सप्ताहात होत असलेला प्रवास, त्यातच पहिल्यांदाच अशा पद्धतीनं होत असलेला कोल्हापूर-पुणे प्रवास आणि पहिल्यांदाच दर्शननं जात असल्यामुळं आरक्षण केलेल्या मिनिटापासून मला एक्साईटिंग वाटत होतं. गेल्या 20-22 वर्षांमध्ये माझा हा पहिल्यांदाच कोल्हापूर-पुणे रात्रीचा रेल्वे प्रवास होत होता. गाडीमध्ये बसल्यावर माझी निरीक्षणं नोंदवणं सुरू झालं. डबा बाहेरून दिसायला चांगला वाटत असला तरी त्याची अंतर्गत अवस्था फारशी ठीक नव्हती. मी माझ्या भाच्याला सांगितलं की, या डब्याची ही अवस्था अजून दीड वर्ष तरी अशीच राहायची शक्यता आहे, कारण याच्या पूर्ण overhauling ला अजून तेवढा काळ आहे.
पहाटेचा प्रवास असल्यामुळं डब्यात येणारे प्रवासी लगेच झोपीही जात होते. तिकडून एक नंबरवरून आमचे लोको पायलट आणि त्याचा असिस्टंट इकडे येत होते. त्यांनी लगेचच दर्शनची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर लगेच असिस्टंटनं या कार्यअश्वाची तपासणी सुरू केली आणि लोको पायलटनं डॉक्युमेंटेशन सुरू केलं. मागं शेवटच्या डब्यात गार्डचीही पूर्वतयारी झाल्यावर ब्रेक पॉवर सट्रिफिकेटवर त्याची आणि लोको पायलटच्या सह्या झाल्यावर सेक्शन कंट्रोलरकडून गाडी सोडण्याची परवानगी मिळाली आणि पहाटे ठीक 4.50 ला दर्शननं निजामुद्दीनच्या दिशेनं कूच केलं. तेवढ्यात खिसा कापला गेलाय सांगणारा आमच्या डब्यात चढला आणि आमच्या मागच्या मोकळ्या बर्थवर बसला. त्याच्याकडे तिकीट नसल्यानं आम्ही म्हटलं की, चेकर आला की याचं काय होईल. पण चेकर काय पुण्यापर्यंत फिरकलाच नाही आणि त्या माणसाचा फुकट प्रवासही पूर्ण झाला.
मिरजेनंतर दर्शननं तिला पहिला थांबा सांगलीला घेतला. त्यावेळी काही वेळापूर्वी सांगलीत दाखल झालेल्या बीसीएन वाघिण्यांच्या मालगाडीचं तेथील मालधक्क्यावर दोन WDG-4 इंजिनांच्या मदतीनं शंटिंग सुरू असलेलं दिसलं, तर त्याचवेळी आमच्या पलीकडे दोन नंबरवर मिरजेकडे जाणारी मालगाडी रोखून धरलेली होती. सांगलीत गाडीमध्ये बऱीच गर्दी आली आणि त्यापैकी बरीच गर्दी लगेच निद्रेतही गेली. इथं दर्शन जरा जास्तवेळ थांबली होती, कारण दादर-हुबळी एक्सप्रेस आत येत होती. इथं सांगलीमधील नियोजन चुकलेलं दिसलं. मिरजेपासून आता शेणोलीपर्यंत दुहेरी मार्ग सुरू झालेला असतानाही समोरून येणाऱ्या गाडीसाठी दर्शनला थांबावं लागलं होतं.
सांगलीनंतर दर्शननं चांगला वेग घेतल्यावर इंजिनाच्या पेंटोग्राफमधून सारख्या उडणाऱ्या ठिणग्या खिडकीतून लक्ष वेधत होत्या. पहाटेच्या अंधारात या ठिणग्या विजांप्रमाणे भासत होत्या. हवेत गारठाही बऱ्यापैकी वाढला होता. काही वेळातच शेजारून डाऊन लाईनवरून मुंबईहून कोल्हापूरला निघालेली महालक्ष्मी एक्सप्रेस आणि तिच्या पाठोपाठ चालुक्य एक्सप्रेस क्रॉस झाल्या. दर्शन पहाटे 5.54 ला शेणोली ओलांडून एकेरी मार्गाच्या सेक्शनमध्ये प्रवेश करत असताना बाहेर बऱ्यापैकी उजाडलं होतं आणि आता गारठा वाटत नव्हता, तर हुडहुडी भरू लागली होती.
सहा वाजून गेलेले असल्यामुळं आता पँट्रीवाला “चाय-चाय” करत येईल आणि गरमागरम चहा पिऊन थंडीला पळवून लावता येईल असं वाटत होतं. पण तो काही येईना. सव्वासहानंतर लालबुंद सूर्यबिंब डोंगरांच्या मागून वर येताना दिसलं आणि म्हटलं आता जरा थंडी कमी वाजायला लागेल. 7.10 ला दर्शन साताऱ्यात आली आणि जनरलची गर्दी आमच्या डब्यात आली. ही संपूर्ण गाडी आरक्षित असताना असं कसं, असं म्हणत होतो, तेवढ्यात लक्षात आलं की, बाहेर पोलिसच त्यांना या डब्यात चढा म्हणून सांगत होता.
निरा नदी ओलांडून पुणे जिल्ह्यात आल्यावर काही मिनिटांनी जेजुरीचा थांबा घेऊन दर्शन पुढच्या प्रवासाला निघाली. 9 वाजून 9 मिनिटांनी आंबळे ओलांडलं आणि या प्रवासामधला दुसरा रोमांचक टप्पा – शिंदवणे घाट सुरू झाला. या घाटात अद्याप दुहेरीकरणाचं काम अपूर्णच आहे.
आतापर्यंत चांगल्या वेगानं दौडत असलेली दर्शन बरोबर पावणेदहाला घोरपडीच्या लोकोशेडच्या पुढं येऊन थांबली. मग मी आणि माझा भाचा तिथेच उतरून पुणे स्टेशनच्या दिशेनं चालत गेलो. कारण दर्शनची पुणे स्टेशनवर येण्याची अधिकृत वेळ सकाळी 11 वाजता आहे, त्यामुळं ती पावणेदहानंतर तासाच्यावर तिथं एकाच जागी थांबून राहणार होती. स्टेशनवर पोहचून आम्ही लोणावळा लोकलमध्ये बसलो, तेव्हा दर्शन फलाटावर आली. तोपर्यंत आम्हाला चालत स्टेशनवर येऊन एक तास झालेला होता. माझा हा प्रवास मस्त झाला असला तरी दुसरीकडे नव्या युगातील आपल्या नव्या रेल्वेची दयनीय अवस्थाही पुन्हा एकदा अस्वस्थ करून गेली.
लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2024/04/blog-post_19.html