आयुष्य कधी कधी गंमतीदार वळण घेतं. पण ज्यावेळेस अशा घटना घडत असतात त्यावेळेस असं काही वळण येईल, किंवा असं काही घडेल जे कदाचित चांगले असू शकेल असे त्यावेळेस वाटत नसतं. दिवस काढणं तर अवघड असतंच पण रात्र सुद्धा अंगावर येत असते. काय करावे, कसे करावे काही म्हणता काही सुचत नसते. फक्त आपल्याच आयुष्याचा आपण मांडून ठेवलेला तमाशा पहायचा आणि जमेल तितकी पडझड थांबवायचा प्रयत्न करायचा. दोन हात थिटे पडतात. आणि अवशेष दणादण डोक्यावर कोसळत पडतात.
खिशात मोजून ४०० रुपये. घरात सामान आणायचे तर दोन हजार तरी लागतील. मोबाईल वगैरे तेव्हा नव्हते पण दूरध्वनीचे बील भरणे भाग. करंट खात्यावर शेवटचे साडेचार हजार पडलेले. एका मोठ्या प्रोजेक्टने दगा दिलेला त्याची दिड लाख रक्कम बुडीत. अजुन दोघांचे पैसे येणार होते पण किमान १५-२० दिवस लागणार. मित्रांकडून घेतलेल्याचा आकडा लखपती वेगळ्या अर्थाने करणारा. हातात नवीन प्रोजेक्ट नाही. लगेच येईल याची शक्यता शून्य. एकच पर्याय नोकरी शोधणे. नोकर्री करायची नाही, व्यवसाय करायचा हे स्वप्न उध्वस्त होणे म्हणजे जगण्याची उमेदच संपल्यासारखं.
फोन वाजला. मित्र फोनवर. अमुक अमुक ठिकाणी जायचं आहे. उद्या सकाळी ९ वाजता निघू. ११ वाजेपर्यंत पोहोचून दुपारपर्यंत परत येऊ. अजून एक जण सोबत आहे. जाण्याचा विचार नसतो पण विचार केला थोडा बदल झाला तर मन तरी मोकळ होईल. तोच तोच विचार मनात येणार नाही. आणि काय सांगाव काही तरी सुचून जाईल मार्ग. येतो म्हटलो पण अकरानंतर निघू म्हण़जे आधी बँकेतून पैसे काढू. दुपारपर्यंत बँक बंद झाली तर संध्याकाळी सामान आणता येणार नाही. तेव्हा एटीएम, कार्ड काही नव्हतं आज ती सोय झाली आहे. तो काळ वेगळा होता. ठीक म्हणून मित्राचा फोन बंद झाला.
साडेदहा वाजता गाडीत दोघे हजर. बँकेतून साडेतीन हजार काढले. चोरखिशात ठेवून दिले. वर दोनशे ठेवले, दोनशे घरी देऊन ठेवले होते. लागलेच तर. जातांना समजले मित्राच्या सोबत्याला एका ठिकाणी जायचे होते. तिथे देवीचे का कुठले मंदीर आहे. तिथला साधू त्याचा गुरु होता म्हणे. दर्शनाला जायचे होते. मंदीर दूर जंगलात होते. आदीवासी बहुल भाग होता. म्हटले चला तेवढेच पर्यटन.
जंगल लागलं. आजुबाजुचा परिसर पहाता पहाता मनाची काजळी कमी व्हायला लागली. अखेर ते ठिकाण आलं. मठ किंवा आश्रम. साधंस कौलारु छप्पर असलेलं एक मंदीर आणि थोड्या अंतरावर तशाच पद्धतीच्या दोन खोल्या. जागेला कुंपण घातलेल. बहुधा बिबट्याचा वावर असणार. आतमधे दहाबारा वेगळाली झाडे आणि फुलझाडे. एका बाजुला दोन बाकडी. कोप-यात हातपंप. पहाताच कलेजा खुश. असल्या जागी चार दिवस आनंदाने रहाता येईल. जगापासुन दूर. आपण. आपली पुस्तके. आपलंच विश्व. फक्त त्यात विवंचना नको. विवंचना असली तर मग इथं काय, शहरात काय अनं हिमालयात काय. मेंदू कुरतडला जातो तो जातोच. विवंचना नसतील तर शहर सुद्धा हिमालयाप्रमाणे निवांत वाटतं. सगळा मनाचा खेळ. मन चंगा तो दुनिया से पंगा. नही तो सिर्फ दिमाग मे दंगा.
हातपंपावर पाय धुवून मंदीरात गेलो. देवीची छोटीशीच पण प्रसन्न मुर्ती होती. समोर होमकुंड होतं. हलका धूर चालू होता. आणि पक्षांच्या आवाजाखेरीज काहीही नव्हतं. आम्ही सुद्धा मुर्तीकडे तोंड करुन शांत बसून राहीलो. बोलावसं वाटलं तरी शब्द तोंडातून काढून ती शांतता ढवळायचं जीवावर आलं होतं. इतक्यात गंभीर आवाज आला. तुम्ही तर सकाळी येणार होता ना? इतका उशीर का केला?
मनात चमकून गरकन मागे वळून पाहीले. एक साठीपासष्ट वय असलेले भगवी कफनी घातलेले, पाणीदार डोळे, पांढरी शुभ्र छातीपर्यंत रुळणारी दाढी आणि तसेच मागे वळवलेले केस, शांत गंभीर चेहरा असलेले आमच्याजवळ आले. आम्ही तिघे पटकन उभे राहिलो. त्यांना हात जोडून नमस्कार केला. मित्राचा सोबती बाबाजी आशीर्वाद द्या असे म्हणून त्यांच्या पाया पडला. आणि ते काय बोलत आहात याची आम्ही वाट पाहू लागलो. या असे म्हणून ते देवीच्या मुर्तीकडे निघाले. शांतपणे नमस्कार केला. आमच्याकडे वळून म्हणाले तुम्ही तिघे सकाळी येणार होता ना ?
हो मित्र म्हणाला, पण याचे काम होते म्हणून उशीर झाला.
खरे आहे, देवी थांबेल बँक कशी थांबेल? हो ना? आणि माझ्याकडे पाहून हलकेच स्मित केले. मी दचकलो आणि ओशाळवाणे हसलो. असु असु दे देवी संभाळते सगळ्यांना. तुम्हाला ही संभाळेल असे म्हणून ते त्यांच्या कुटीकडे आम्हाला या असा इशारा करुन चालू लागले. आम्ही तिघे आता काय बोलावे हे न सुचून शांतपणे त्यांच्यामागे चालू लागलो.
आम्हाला बसायला सांगून ते आतल्या खोलीत गेले. दहा मिनिटांनी आत या अशी हाक आली. आत गेलो तर त्यांनी स्वतःच्या हाताने चार ताटे वाढली आणि जेवायला दिले. अतिशय रुचकर आणि सुंदर जेवण होते. ते त्यांनी स्वतःच बनवलेले होते.
माईने सांगितले आज तुम्ही जेवायला येणार आहात म्हणून सगळी तयारी केली होती बाबाजी म्हणाले. कोण माई मी पटकन विचारुन गेलो आणि उगाच विचारले असे वाटले. दोघे सोबती डोळे वटारुन मा़झ्याकडे पहात असतांना बाबाजींनी माई असे म्हणून मंदिराकडे बोट दा़खवले. माझ्या चेह-यावरचा अविश्वास पाहून त्यांनी स्मित केले असे वाटले परत त्यांचा चेहरा गंभीर झाला.
जेवण झाल्यावर बाहेरच्या खोलीत ते त्यांच्या आसनावर बसले. समोरील सतरंजीवर आम्ही तिघे बसलो. मित्राच्या सोबत्याने त्यांना काही सांगितले. त्यांची चर्चा मित्र मनोभावे ऐकत होता. मी शांतपणे पण मनात हसत त्यांच्या चर्चेचा आनंद घेत होतो. मित्राच्या सोबत्याचे समाधान झाले. त्यानंतर आपण आता जरा भजन करु असे म्हणून बाबाजींनी काहो स्तोत्रे आरत्या म्हटल्या. सुरेल आवाजातील त्या भजनाचा आनंद घेत असतांना मन तल्लीन झाले, जरा मनाचा ताण हलका झाला. बसा जरावेळ म्हणून बाबाजी परत आत गेले. येतांना आमच्यासाठी चहा घेऊन आले. गवती चहा टाकलेला वाफाळलेला चहा पिऊन अगदी प्रफुल्लीत झालो.
वातावरण मस्त होतं पण परतणे भाग होते. बाबाजींचा निरोप घ्यावा असं हळूच मित्राला आणि त्याने त्याच्या सोबत्याला खुणावले. बाबाजी अजूनही शांतपणे चहा पित होते. त्यांचा चहा झाल्यावर मित्राच्या सोबत्याने खिशात हात घालून काही पैसे काढून बाबाजींसमोर ठेवले आणि त्यांना नमस्कार केला. बाबाजींंनी समोरच्या पैशांकडे पाहून त्यातील एक नोट काढून बाजूला असलेल्या देवीच्या तसबिरीपाशी ठेवली आणि बाकीचे घेऊन जा म्हणून खुणावले. मित्राच्या सोबत्याने भक्तीभावाने त्यांना पुन्हा नमस्कार केला. उरलेले पैसे भक्तीने कपाळाला लावून आदराने खिशात ठेवले.
मित्राच्या मनात काय आले काय माहित ! तो उठला खिशात हात घालून तीन चार नोटा समोर ठेवल्या आणि नमस्कार केला. बाबाजींनी शांतपणे त्यातील एकच नोट उचलली आणि जसे सोबत्यासोबत झाले त्याची पुन्हा आवृत्ती. बाबाजींनी स्मितपुर्वक माझ्याकडे पाहिले. बोलले काहीच नाही. मी काय करावे या मनस्थितीत अडकलेलो. पण अनुभव पाठीशी होता एकच नोट घेतील. ठीक आहे. २०० रुपये वर होते ते त्यांच्यापुढे ठेवले आणि नमस्कार केला.
त्यांनी त्या पैशांकडे पाहिले.... देवीच्या तसबिरी कडे पाहून म्हटले बघ मैया अजून विश्वास नाही याचा तुझ्यावर. आणि माझ्याकडे पाहून सुचक हसले. मी शांतपणे चोरखिशात हात घालून बँकेतून काढलेले साडे तीन हजार रुपये समोर ठेवले. आणि म्हटलो.. बस आत्ता इतकेच आहेत.
भरपुर आहेत. माझं काम झालं. बाबाजी म्हणाले. आणि दोन हजार काढून माझ्या हातात दिली. माईची कृपा तुझावर नक्की होईल असे म्हणून सतराशे रुपये तसबीरीसमोर ठेवले. डोळ्यात टचकन पाणी यायचं बाकी होते. एक आवंढा गळ्यात आला. कशाला आलास जंगल पहायला. आयुष्याचं वैराण जंगल काय कमी झालंय. आता घरी काय सांगायचं आणि कसं सांगायचं. काही न बोलता, नमस्कार वगैरेच्या भानगडीत न पडता ताडकन उठलो.
दोघे पण उठले. आणि पुन्हा बाबाजींना येतो आम्ही म्हणून नमस्कार केला आणि निघालो. दहा पावले गेलो असू नसू.. बाबाजींनी मित्राच्या सोबत्याला हाक मारली आणि त्याच्या कानात काही तरी बोलले. सोबत्याने पुन्हा नमस्कार केला आणि गाडीकडे आलो. येतांना माझं मन पुर्ण अस्वस्थ होतं. मित्राला माझी सध्याची परिस्थिती माहित असल्याने तो सुद्धा शांत होता. काही न बोलताच परत आलो. घरापाशी आल्यावर गाडीतून उतरलो आणि टाटा बाय बाय न करता सरळ घराच रस्ता पकडून चालू लागलो.
नशीबाचे फेरे उलटे पडले की कसे पडतात याचा अनुभव घेत होतो. त्यात स्वतःचीच कॄत्ये कारणीभुत ठरली की आणखी चिडचिड वाढते. गेल्या गेल्या वडीलांनी विचारले अरे कुठे गेला होतास? किती वेळ झाला. सांगून नाही का जायचं वगैरे. मी जरासा तडकून म्हणालो तुम्हाला माहित आहे ना काम असले की वेळ लागतो.
अरे हो हो चिडू नकोस दुपार पासून ते अमुक अमुक दहा वेळेस फोन करत होते. आम्ही काय सांगायचे तु कुठे आहेस कधी येणार. सांगायचे त्यांना आला की करेल फोन. कशाला आले होते ते त्यांनीच तर सगळा प्रॉब्लेम करुन ठेवला आहे. नंबर घेऊन ठेवायचा मी करवादलो. सगळं झालं करुन वडीलांनी शांतपणे सांगितले. शेवटी अर्ध्यातासापूर्वी ते स्वतः इथे आले होते आणि हे पाकिट देऊन गेले.
पाकिट हातात घेतले. फोडले. आतमधे एक चिठ्ठी. त्यांच्या धंद्यात त्यांचे पैसे अडकून बुडल्यामुळे दोन तीन वर्षांपासून ते खूप अडचणीत होते. त्यामुळे त्यांना माझे पैसे देता आले नव्हते. काही दिवसांपूर्वी त्यांचा एक मोठा व्यवहार झाला, त्यात त्यांना चांगला फायदा झाल्यामुळे बंद पडलेली कंपनी ते परत चालू करत होते. त्यासाठी त्यांनी मा़झी थकलेली रक्कम आणि प्रेमाची भेट म्हणून वर काही रक्कम असा चेक पाकिटात देत आहे. वेळ मिळाला की मी त्यांना फोन करावा. पुढचे काम लवकरच सुरु करायचे आहे. क्षणार्धात मनाचे ओझे खाडकन कमी झाले. आणि मी चेककडे नजर टाकली.
चेकवर रक्कम होती एक लाख सत्तर हजार.
लगेच मित्राला फोन केला आणि त्याला बातमी दिली. त्याला सुद्धा बरे वाटले. दहा मिनिटांत मित्राचा फोन. अरे आपण निघतांना बाबाजींनी सोबत्याला बोलावून काही सागितले होते आठवते का? त्या वेळेस मी एकदम उद्विग्न झालो होतो पण सोबती परत जाऊन काही तरी बोलला होता हे आठवतं होतं. हां आठवतय पण काय त्याचं मी अर्धवट उत्सुकतेने विचारले.
बाबाजी म्हणाले होते तुमचा हा मित्र आठ दिवसांत परत इथे येईल.
मी तिस-या दिवशी तिथे गेलो होतो.
एकटाच.