सन 2018 मध्ये मी आपल्या आणि अन्य एका संस्थळावर “ट्रोपोनिन : ‘हार्ट अॅटॅक’वर शिक्कामोर्तब“ हा लेख लिहिला होता आणि त्यावर चर्चाही झाली होती. त्यानंतर ऑगस्ट 2023मध्ये ध्यानीमनी नसताना त्या लेखाच्या एका वाचकांनी अन्यत्र स्वतःच्या हार्ट अटॅकसंबंधी अनुभवकथन केले. त्यात त्यांनी ट्रोपोनिनच्या त्या लेखाचा जीवरक्षक म्हणून उपयोग झाल्याचे नमूद केले. ते वाचून आनंदयुक्त समाधान वाटले. त्या निमित्ताने हृदयविकारावर अनेकांशी व्यक्तिगत संपर्कातून ओझरती चर्चा झाली. तेव्हा त्यांनी असे सुचवले, की पूर्वीचा ‘ट्रोपोनिन’ संबंधीचा लेख हा फक्त एकाच महत्वाच्या प्रयोगशाळा चाचणीशी संबंधित आहे; परंतु आता हृदयविकार या विषयावर सविस्तर लेखन केल्यास ते अनेकांना उपयुक्त वाटेल. या अतिशय चांगल्या सूचनेवर विचार करून प्रस्तुत लेखमालेचा आरंभ करीत आहे.
मानवी हृदय आणि त्याचे विकार हा एक अवाढव्य व गुंतागुंतीचा विषय असून आधुनिक वैद्यकात त्यावर प्रचंड संशोधन झालेले आहे. सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून हृदयासंबंधी काही मूलभूत माहिती, हृदयविकारांचे प्रकार आणि त्यांची कारणमीमांसा याचे विवेचन महत्त्वाचे आहे.
त्या अनुषंगाने या लेखमालेत खालीलप्रमाणे विभाग असतील :
1. मानवी हृदय : रचना आणि कार्य
2. हृदयरोग निदानाच्या प्राथमिक तपासण्या
3. हृदयविकाराचे विविध प्रकार
4. करोनरी हृदयविकार (पूर्वार्ध)
5. करोनरी हृदयविकार (उत्तरार्ध)
वरील मुद्दे झाल्यानंतर मी एक लक्ष्मणरेषा आखलेली आहे. त्या रेषेपलीकडे रोगनिदानाच्या प्रतिमातंत्र चाचण्या, अत्याधुनिक invasive चाचण्या, औषधोपचार आणि शस्त्रक्रिया हे विषय येतात. हे सर्व विषय हृदयरोगतज्ञांच्या अखत्यारीतील असल्याने मी त्यांना हात घालणार नाही.
हृदयविकाराच्या संदर्भात भारतातील काही निरीक्षणे महत्त्वाची आहेत :
१. समाजातील एकूण मृत्यूंपैकी सुमारे एक चतुर्थांश मृत्यू हृदयविकारामुळे होतात
२. गेल्या दोन दशकांमध्ये या विकारांचे प्रमाण वाढलेले असून ते समाजातील सर्व सामाजिक-आर्थिक स्तरांमध्ये दिसून येते.
३. विकाराची सुरुवात होण्याचे वय सुमारे दहा वर्षांनी अलीकडे सरकलेले आहे.
४. रोगनिदान आणि उपचार सुविधांतील कमतरतेमुळे या विकारांचा मृत्यूदर प्रगत देशांपेक्षा जास्त आहे.
या लेखमालेसाठी प्रामुख्याने वैद्यकीय अभ्यासक्रमातील विविध पाठ्यपुस्तकांचा आधार घेतला आहे. या व्यतिरिक्त जे जालसंदर्भ वापरलेले आहेत त्यांचा उल्लेख संबंधित लेखाच्या तळटीपेत करेन.
अशा प्रकारे हृदयाच्या काही महत्वाच्या पैलूंचे विवेचन करणारा हा ‘हृदयसंवाद’ सादर करीत आहे. सर्व वाचकांचे हृदयपूर्ण स्वागत ! नेहमीप्रमाणेच शंकाकुशंका, पूरक माहिती, सूचना आणि अर्थपूर्ण चर्चेची प्रतीक्षा आहे.
**************************************************************
क्रमशः