त्या अनादि,अनंत, सर्वसाक्षी जगन्नियंत्याने आपल्या ललाटावर भाग्यरेखा लिहिताना अहर्निश परीक्षा देणंच लिहिलं आहे,असं प्रत्यंतर प्रत्येक जीवात्म्यास हा भवसागर पार करत असताना येत असतं!
बास,बास,बास! पिळापिळी पुरे! ह्याच लायनीवर ही सगळी पोस्ट लिहीत बसले ,तर माझी दमछाक होईल. सोप्या भाषेत मला एवढंच म्हणायचं आहे की, आपल्यापैकी प्रत्येकाच्या नशिबात, रोजच्या व्यवहारात परीक्षा देणं लिहिलेलंच असतं. खरं तर मला रोजच्या रोज येणाऱ्या संकटरुपी परीक्षेवर लिहायचंच नाहीये. मला लिहायचंय ॲक्चुअल परीक्षेवर. आपल्याला शाळेत घातल्यापासून ते आपल्या माथी कोणत्यातरी डिप्लोमा, डिग्रीचा शिक्का लागेपर्यंत द्याव्या लागणाऱ्या खऱ्याखुऱ्या पेपर,पेनवाल्या परीक्षेवर!
आमच्या वेळी पाडव्याच्या दिवशी पाटी पेन्सिल घेऊन शाळेत गेलं की भागत असे. परीक्षा पाटीवरच. शिक्षक प्रत्येकाच्या पाट्याच तपासायचे. हल्ली दुसऱ्या, तिसऱ्या वर्षीच शाळेत घालतात. प्ले ग्रुप,प्रिस्कूल ग्रुप,केजी अशा नावांची ती शाळाच असते. त्यासाठी सुद्धा पाल्याच्या मम्मी, पप्पांना शाळेत इंटरव्ह्यू द्यावा लागतो. शालेय साहित्याचा खर्च खूप असतो. मुलांना युनिफॉर्म असतो. साॅक्स,शूज,टाय असतो. मग पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतल्यापासून ते कंपलसरीली परदेशगमन करेपर्यंत अनेक परीक्षा द्याव्या लागतात. दहावी, बारावी, मग निवडलेल्या शाखेत ग्रॅज्युएशन. त्यासाठी एन्टरन्स एक्झाम. JEE, NEET, SAT, MHTCET, TOFEL, IELTS, GRE (एबीसी ते एक्स,वाय) अशा अनेक परीक्षा द्याव्या लागतात. ही सर्व परीक्षांची नावंही पुढच्या पिढ्यांना विचारून गोळा करावी लागली.
काही लेक्चर्स आणि क्लासेस आता ऑनलाईन असतात. मम्मी पप्पा महागडे मोबाईल्स, लॅपटॉपस् घेऊन देतात. मुलं सतत दबावाखाली, ताणलेल्या मनःस्थितीत असतात. शंभर टक्क्यांपेक्षा जास्त मार्क्स मिळवणं आवश्यक असतं. नव्वद ते पंच्च्याण्णव टक्क्यांना ॲडमिशन मिळत नाही. मुलं हसणं,खेळणं, चेष्टा मस्करी करणं,टपल्या मारणं विसरून जातात. सगळ्यांचेच चेहरे लांबडे,आठ्यांच्या जाळ्यांनी ग्रासलेले होतात.
मला आमच्या वेळच्या परीक्षा आठवतात. वर्षभर हुंदडायचं आणि परीक्षा महिन्यावर आली की अभ्यास सुरु करायचा. अभ्यास पूर्ण झालेला नसायचा. पेपराला जायच्या आधी भीतीनं पोटात बर्फाची लादी ठेवलीय असं वाटायचं. सारखं "तिकडे"जावं लागायचं. पुढच्या वर्षी पहिल्या दिवसापासून अभ्यास करायचा असा निश्चय करायचा. आणि पेपर कसा का जाईना तो देऊन आल्यावर हुश्श करायचं. हेच सामान्य विद्यार्थी करायचे.
आमच्या वेळी फक्त मॅट्रिकची परीक्षा महत्त्वाची असायची. मग प्री डिग्री. त्यानंतर साईड निवडायची. आर्ट्स, कॉमर्स,सायन्स,एवढेच पर्याय. थोडी हुशार मुलंच डॉक्टर, इंजिनिअर व्हायची. नाहीतर वकील, शिक्षक किंवा बँकेत. मध्यमवर्गीय मुलांना एवढेच मुख्य ऑप्शन्स. त्यामुळे कसलाही काथ्याकूट, चर्चा, ॲप्टिट्यूड टेस्ट ही भानगड नाही. मुली बी.ए.पर्यंत शिकायच्या. लग्नाच्या बाजारात असलेल्या त्यांच्या पात्रतेनुसार शिक्षक, इंजिनिअर वगैरे असलेला नवरा शोधायच्या. मग लग्न,मुलं.इतकं सोपं, सुटसुटीत होतं सगळं!
आपली मुलं कितवीतून कितवीत गेली हे आईवडीलांना माहीत नसायचं. मूल पास झालं एवढं पुरेसं असे. शाळेची फी दोन रुपये,पाच रुपये,दहा रुपये अशी असायची. माझ्या कॉलेज वयाच्या वेळी माझ्या वयाच्या इतर मुली थोड्या वाढत्या संख्येने काॅलेजात जायला (म्हणजे तिथपर्यंत पोचायला) लागल्या होत्या. मुलगी ग्रॅज्युएट झाली तर वरसंशोधनाच्या वेळी तिला प्रेफरन्स मिळेल ,हाही विचार पालक करु लागले होते. मुलगी ग्रॅज्युएट झाली तर नवरा मिळणं मुश्किल होईल, शिकलेली मुलगी संसार नीट करणार नाही, हे विचार हळूहळू मागे पडत चालले होते.
माझ्या बी.ए.च्या रिझल्टच्या वेळची एक गंमत आठवते. मी बी.ए.ला संपूर्ण विद्यापीठात तिसरी आले होते. पेढा देताना ही गोष्ट मी आमच्या कामवालीला अभिमानाने आणि आनंदाने सांगितली. तिनं निष्पापपणे विचारलं,"म्हणजे पास की नापास?". एकूण पास होणं महत्वाचं.
एवढं यश मिळाल्यावर,"माॅं,मैं बी.ए.पास हो गया!"असं सिनेमातल्या हिरोनं आईला उचलून, गरागरा फिरवून,सांगितल्यावर ती त्याच्यासाठी "गाजर का हलुवा" करते,तसं माझी आई माझ्यासाठी काहीतरी मस्त (म्हणजे गोड) खायला करेल असं मला वाटलं.
पण आई बाबांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले होते. त्यांनी पाठीवरून हात फिरवला. भावंडांनी हातात हात धरले. आईनं देवासमोर साखर ठेवली, हात जोडले. आणि त्यानंतर माझ्यासाठी मला आवडतात म्हणून बटाटेवडे केले. बास! एवढंच! त्यावेळी झगमगाट दाखवून सेलिब्रेशन करायची, पार्टी झोडायची पद्धत नव्हती.
बाय द वे, लहानपणी मला बटाटावडा आवडायचा. पण पुढं माझ्या करिअरमध्ये रेकाॅर्डिंगसाठी भटकंती करताना, जेवायला वेळ न मिळाल्याने मला अनेकदा वडापाव खावा लागला. त्याचा इतका वीट आला की आता मला वडा ही खावासा वाटत नाही आणि पावही खावासा वाटत नाही.
मी मॅट्रिकची परीक्षा द्यायला गेले ,तेव्हाची गोष्ट. तेव्हा एका दिवसात दोन पेपर्स असायचे. अकरा ते दोन पहिला मध्ये एक तास सुट्टी आणि तीन ते सहा , दुसरा पेपर. माझ्या मॅट्रिकच्या परीक्षेच्या वेळी माझा परीक्षा क्रमांक बघायला, परीक्षेचं केंद्र बघायला घरातलं कुणीही आलं नाही. मीच ते शोधलं. परीक्षेच्या वेळी कुणीही मला केंद्रावर सोडायला आलं नाही. घरच्या मोठ्या मंडळींना नमस्कार करुन मी परीक्षेला एकटीच गेले. त्याच परीक्षेला एक मुलगी आली होती. श्रीमंताघरची वाटत होती. ती टांग्यातून आली. (त्यावेळी रीक्षा नव्हत्या.) बरोबर तिचे आईवडील दोघेही तिला पोहोचवण्यासाठी आले होते. तिचा नंबर माझ्याच वर्गात होता. तिचे आईवडील तिला वर्गात सोडायला आले. तिचा सीट नंबर त्यांनी पुन्हा पुन्हा चेक केला. मग जाताना घरुन आणलेलं लिंबू सरबत तिला प्यायला दिलं. तिच्या केसांवरुन, पाठीवरून हात फिरवला. पुन्हा पुन्हा बेस्ट लक दिलं. ते दोघं बाहेर पडले.
पहिला पेपर संपला. बरा गेला होता. खूप भूक लागली होती. आता डबा खायला म्हणून मी मैत्रीणींबरोबर बाहेर पडले. बघते तो काय!तिचे आईवडील दोघेही बाहेर तिची वाट बघत उभे होते. आम्ही सगळ्या मैत्रिणी झाडाच्या सावलीत डबा खायला बसलो. ते तिघे जण मला दिसत होते. तिच्या आईने डबा उघडला आणि तिला डब्यातलं भरवायला सुरुवात केली. तिचे वडील तिला पुढच्या पेपरासाठीचा धडा, तिच्या पुस्तकातून वाचून दाखवत होते. मग तिच्या आईने एक थर्मास उघडला. त्यातलं दूध एका कपात ओतलं. तिच्या ओठांजवळ कप नेत तिला पाजलं. इकडं वडील धडा वाचून दाखवत होतेच. मग तिच्या आईने पिशवीतून द्राक्षं काढली. ती एक एक द्राक्ष तिला भरवू लागली. मी थक्क झाले. मला तर ए व्ही एम पिक्चर्स मद्रासचा एखादा सिनेमा पाहतोय असंच वाटलं.
दुसरा पेपर सुरू झाला. एकदाचा संपला. ते तिघे मिळून टांग्यातून परत गेले.
मी घरी गेले. आईनं विचारलं ,"कसे गेले दोन्ही पेपर्स?"मी म्हटलं,"चांगले." आईनं विचारलं ,"पास होशील ना?"मी म्हटलं,"होईन."
मग आई म्हणाली,"मी जरा देवळात जातेय. दुपारी आजीसाठी दशमी केली होती. तुझ्यासाठी ठेवलीय. ती गुळांब्याबरोबर खा. गुळांबा बेतानेच घे. नाहीतर भरमसाठ खाशील. कुणी अचानक आलं तर वाढायला बरा पडतो. वर्षभर पुरायला हवा!"
या लेखात मी मॅट्रिक,टांगा,गुळांबा, दशमी सारखे अनेक आउटडेटेड शब्द वापरले आहेत. पण मी ते एके काळी माझ्या बोलण्यात वापरलेले आहेत, दुसऱ्यांकडून ऐकलेले आहेत. ते माझ्या काळातले "माझे" शब्द आहेत.
खरंच! बराच काळ लोटलाय नाही माझं लहानपण माझ्यापासून दूर निघून गेल्याला!