विडंबन - 'बाँड'
बाँड हा वटण्यास थोडा समय आहे
आणि त्याला देणगीचे वलय आहे
बोलणे खोटे तुझे हे जाणतो मी
बातम्या मज वाचण्याची सवय आहे
सांग आता मी खरे बोलू कुणाशी
झूठ येथे बोलण्याला अभय आहे
'देश हा बदलून टाकू' ते म्हणाले
बोललो त्यांना 'कुठे हा विषय आहे?'
शासनाची का तमा मी बाळगावी?
आज झाले आत्मनिर्भर हृदय आहे
- 'सुमार' जावडेकर
माझीच मूळ गझल - 'बांध'
बांध हा फुटण्यास थोडा समय आहे
आणि मागे जीवनाचा प्रलय आहे
बोलणे खोटे तुझे हे जाणतो मी
चेहरे मज वाचण्याची सवय आहे
सांग आता मी खरे बोलू कुणाशी
झूठ येथे बोलण्याला अभय आहे
'शहर हे बदलून टाकू' ते म्हणाले
बोललो त्यांना 'जुना हा विषय आहे'
वादळाची का तमा मी बाळगावी?
आज झाले पत्थराचे हृदय आहे
- कुमार जावडेकर