दोन प्राध्यापक
बांधकाम व्यावसायिकाच्या
कार्यालयात.
पहिल्या प्राध्यापकाने
दुसर्या प्राध्यापकास
कानात कुजबुजत विचारले
नव्या ईमारतीच्या अवारातील
जुने वड, पिंपळ, पारीजात, .......
समृद्धतेचे प्रतिक की अडगळ?
दुसरा प्राध्यापक उत्तरला
अर्थात अडगळ!
बांधकाम व्यावसायिकाने
आज्ञाधारक विद्यार्थ्या प्रमाणे
आपल्या कार्यकर्त्याकडे बघीतले
कार्यकर्त्यांनी दुसर्या दिवशी
नव्या ईमारतीच्या परिसरातले
सारे जुने वड, पिंपळ, पारिजात
गुलमोहर, मोगरा, जाई, जुई,
बोगनवेल सदाफुली
आणि असेल ते सारे हिरवे
अगदीच कंपाऊंडवॉलच्या मागची
बाभळी, पळस आणि बेशरमाची झाडे
घरी सरपणास पाठवली
काम तसं फत्ते झाले
पण एका मजल्याच्या गॅलरीतून
वाळत चाललेले एक रोप डोकावले
मग कार्यकर्त्यांनी, विरह जागवणार्या
तुळशीच्या जागी श्वासाशी विरह झालेला
एक शोभीवंत ख्रिसमस ट्री लावला.
तुळशीचीकुंडी असलेल्या काकुंनी
तक्रार केली तर
नव्या ईमारतीच्या करारात
नव्या ईमारतीचे बाह्य दृश्य
ठरवण्याचा आधिकार
बांधकाम व्यावसायिकाकडे असल्याचे
करार-कलम तोंडावर फेकले
दुसर्या वयोवृद्ध प्राध्यापिकेने
नाराजी दाखवली तर त्यांना
दिवाणखान्यासाठी
काही बोन्साय गीफ्ट दिली
तसा नव्या ईमारती समोर
जाहीरातीतल्या चित्रासारखा
हिरवागार लॉन दिला होता
पण बोअरवेल आटली
टँकर कडाडला तशी
ती स्वप्नवत लॉनही
अशी वाळून गेली
कि ती कधी होती
हे आता
कुणाला स्मरतही नाही.
.
हि कविता वाचल्यावर
कुणीतरी म्हणेलच
आताशा माणूस चंद्रावर जातो
चंद्रावर कुठे हिरवळीची अडगळ असेते का?
.
.
.
.
.
.
* अनुषंगिक नसलेले विषयांतर आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार