नोव्हेंबर २०२३ मध्ये माझे बाबा गेले. वय ८२ पूर्ण होते. लौकिकार्थाने त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी व्यवस्थित पार पाडल्या होत्या. तोपर्यंतचे आयुष्य आनंदाने जगले होते. त्यामुळे फार त्रास न होता ते गेले म्हणजे त्यांचं सोनंच झालं. पण... हा पण खूप मोठा आहे. ते गेल्यावर लक्षात आलं की आपल्या बाबांचे आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे स्थान होते. त्यांच्या जाण्याने कधीच भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
खरं तर हे इतकं खाजगी असं चव्हाट्यावर मांडायची खरंच काय गरज! इथे लिहिण्यामागे दोन कारणं आहेत. एक तर असं म्हणतात की "More you write personal, more it becomes universal". तसेच बाबा गेल्यावर मोठ्याने भोकाड पसरून रडावसं वाटत होतं. पण तेव्हाच्या एकूण परिस्थितीत ते जमलंच नाही. इथे मला वैयक्तिकरित्या ओळखणारे फार कमी असतील. त्यामुळे कोण काय म्हणेल ही भीती पण कमीच.
त्यांचा आज जन्मदिवस असतो. त्यामुळे त्यांना माझ्याकडून ही आदरांजली.
============================================================
माझे बाबा
आमच्या घरातलं मी चौथं आणि शेवटचं अपत्य. माझ्या जन्मानंतर बाबा ज्या उत्साहाने दवाखान्यात भेटायला यायचे ते पाहून आईला एका बाईने विचारले की पहिली मुलगी आहे का? आईने सांगितलं की नाही बाई शेवटची आहे. असं कौतुकाने बाबांनी माझं स्वागत केलं. आणि कायम मी त्यांची लाडकी म्हणूनच राहिले. खरं तर ते लाड, कौतुक आम्हा चौघांचंही करायचे पण मी विशेष लाडकी. नेहमी म्हणायचे की त्यांची आजीच जन्माला आली आहे. त्यांची आजी खूप उंच होती आणि मी पण तशीच उंच झाले.
मी पाच वर्षांची होईपर्यंत आम्ही बारामतीला होतो. तिथे आम्ही जिथे राहायचो ती एक बैठी चाळ होती. ती चाळ अगदी मुख्य रस्त्याला लागून असली तरी आमचं घर बरंच आत होतं. बाबा संध्याकाळी परत यायचे तेव्हा त्यांच्या जीपचा आवाज यायचा. आणि मी मग धावत त्यांच्याकडे जायचे. बाबा पण तेवढ्याच आनंदाने मला उचलून जवळ घ्यायचे. रात्री झोपताना जमिनीवर गाद्या घातलेल्या असत. त्यावर न चुकता रोज मला ते घोडा घोडा करून फिरवायचे. हा प्रकार मी चौथीत गेलेली घोडी होईपर्यंत सुरु होता.
पूर्वीच्या काली काही घरांमध्ये एकप्रकारचं वातावरण असायचं की वडील घरी आले की एकप्रकारे संचारबंदी असायची. आमच्या घरात असला काही प्रकार नव्हता. बारामतीच्या दोन खोल्यांच्या घरात माणसं येत जात असणार. तेच नंतर खेडला राहायला गेलो तेव्हा बहिणी मोठ्या झाल्या होत्या, त्यांच्या मैत्रिणी घरी येऊन बडबड, दंगा करत असत. एकदम मोकळं वातावरण होतं.
तिसरी-चौथीत असताना शाळेत एक प्रकार कळला होता. समोरच्याला सांगायचं की गुढीपाडवा म्हण. त्याने 'गुढीपाडवा' असं म्हटलं की आपण त्याला म्हणायचं 'नीट बोल गाढवा'. आणि हेच मी माझ्या बाबांना म्हणायला सांगितलं आणि त्यांना 'नीट बोल गाढवा' असंही म्हणून झालं. माझ्या आईला तर माझ्या अश्या वागण्याचा धक्काच बसला. पण बाबांनी ही घटना खूप खेळीमेळीत घेतली.
जेवढे माझे लाड करत होते तेवढीच शिस्त वेळप्रसंगी लावत होते. एकदा चौथीत असताना शाळेचा गृहपाठ केला नव्हता. बाईंनी सांगितलं की बाबांना घेऊन ये. मधल्या सुट्टीत रडत रडत घरी आले आणि सांगितलं की बाबांना बोलावलं आहे. बाबांनी यायला साफ नकार दिला. मला म्हणाले की 'मी सांगितलं होतं का की अभ्यास करू नकोस'. आणि ते खरंच शाळेत आले नाही.
त्याच काळात मी घरात कोणाला तरी उलट उत्तर दिलं होतं. आईने बाबांना सांगितलं. मग त्यादिवशी संध्याकाळी घरी आल्यावर मला सारखं जवळ घ्यायचे आणि प्रेमाने सांगायचे की 'मी लाड करतो म्हणजे तू लाडाने वेडं व्हावं असं नव्हे'. मला जे समजायचं होतं ते एका शब्दाने न रागावता समजले होते.
मी सहावीत असताना घरातील बाकीचे आम्ही पुण्यात आणि बाबा नोकरीच्या गावी असे राहायचे ठरले. साधारण अकरा वर्षे आम्ही असं राहिलो. तो काळ त्यांच्यासाठी फारच कठीण होता. आठवड्याचे पाच ते सहा दिवस कुटुंबापासून लांब राहायचे. त्यात सरकारी नोकरी म्हणजे तिथले टक्केटोणपे वेगळे. त्या काळात त्यांची जरा भीती वाटायची. पण आता लक्षात येतं की किती अवघड असेल त्यांच्यासाठी पण असं राहणं. असो.
बाबा सिव्हिल इंजिनियर होते आणि पाटबंधारे खात्यात नोकरीला होते. त्यांना त्या साईटवरच्या कामाची प्रचंड आवड. त्यांनी कधीच फक्त ऑफिसमध्ये काम असेल अशी बदली घेतली नाही. उन्हातान्हाचं डोक्यावर फक्त एक टोपी घालून ते काम करत असत.
आई त्यांच्याबद्दल एक गोष्ट सांगते. १९७२ साली प्रचंड मोठा दुष्काळ पडला. तेव्हा लोकांना काम मिळावे, पैसा मिळावा म्हणून साईटवरच्या कामावर घेतले जायचे. साठ-सत्तरीच्या पुढची म्हातारी लोकं बाबांकडे काम मागायला यायची. बाबा त्यांना कामावर घ्यायचे आणि कडेला बसून राहा म्हणून सांगायचे.
कित्येकदा बाबांची बदली जिथे व्हायची तिथली कामं थांबलेली किंवा अडकलेली असायची. बाबा तिथे जाऊन कामं सुरु करायचे, कामांना गती द्यायचे. त्यांना जी वापरासाठी जीप मिळायची ती हमखास दुरावस्थेत असायची. बाबा त्या जीपचेही काम करवून घायचे. ते नवीन जागी गेल्यावर डबडी असलेली जीप देखणं रूप लेऊन छान धावायला लागायची.
जेवढं त्यांचं प्रेम त्यांच्या दगडमातीतील कामावर होतं तेवढीच त्यांना नवनवीन टेक्नॉलॉजीची आवड होती. त्यातल्या त्यात multimediaची आवड जास्त. फोटोसाठीचा कॅमेरा तर त्यांच्याकडे कित्येक वर्षे आधीपासून होता. माझे आणि माझ्या भावंडांचे लहानपणचे म्हणजे जवळपास पन्नास वर्षांपूर्वी त्यांनी फोटो काढले होते. आधी ब्लॅक अँड व्हाईट कॅमेरा होता. नंतर रंगीत कॅमेरा घेतला. त्यानंतर डिजिटल व्हिडिओ कॅमेरा जेव्हा बाजारात यायला लागला तेव्हा म्हणजे २० वर्षांपूर्वी सोनीचा कॅमेरा घेतला होता. जसे आमच्या लहानपणाच्या आठवणी त्यांनी काढलेल्या फोटोंमध्ये आहेत तश्याच माझ्या मुलींच्या आठवणी त्यांनी केलेल्या व्हिडिओ शूटिंगमध्ये आहेत. त्यांच्या साठीच्या पुढे त्यांनी व्हिडिओ शूटिंग करायला सुरु केले. पण त्यांचा हात अतिशय स्थिर असायचा.
आमच्या फोटोंची एक गंमतशीर आठवण आहे. एकदा रविवारी दुपारी त्यांनी ठरवलं की आमचे सहा जणांचे फोट काढायचे. भर दुपारी जेवणं झाल्यावर त्यांनी आम्हाला सगळ्यांना तयार व्हायला लावलं आणि आम्ही अनेक फोटो काढले.
जसं फोटो, व्हिडिओ ची आवड तशीच त्यांना रेकॉर्ड प्लेअर, रेडिओ, टेप रेकॉर्डर, टीव्ही, VCR, DVD प्लेअर अश्या सगळ्याची आवड. मी साधारण दोन वर्षांची असेल किंवा थोडी मोठी, तेव्हा त्यांनी माझा आवाज रेकॉर्ड करून ठेवला होता. मला धड इंदिरा गांधीपण म्हणता येत नव्हतं. इंदिरा गांधी म्हण म्हटलं की मी इंदिका गागा म्हणत होते.
महाराष्ट्रात पुण्यामध्ये जेव्हा टीव्हीचं प्रक्षेपण सुरु झालं तेव्हा आम्ही बारामतीला होतो. त्यामुळे तिथे तो सिग्नल यायचा. त्यामुळे १९७९-८० साली आमच्याकडे आमचा पहिला ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आला. तेव्हा फक्त आमच्याकडेच टीव्ही असल्याने शेजारपाजारचे सगळेजण आमच्याकडे टीव्ही पाहायला गोळा व्हायचे. त्यानंतर रंगीत टीव्हीदेखील त्यांनी १९८१-८२ च्या सुमारास घेतला. तसंच VCR देखील आमच्याकडे १९८५-८६ च्या सुमारास आला होता. तेव्हा बाबा पुण्यातल्या हॉंगकॉंग लेनमधल्या चंदन व्हिडिओ कॅसेट लायब्ररीमधून पिक्चरच्या कॅसेट आणायचे.
बाबांचं कसल्याही प्रकारचं सेन्सॉरिंग नसायचं. ते दरवर्षी दिवाळी अंक आणायचे. त्यात आवाज, जत्रा असे वात्रट चित्र असलेले अंक असायचे. त्याचबरोबरीने शतायुषी, दीर्घायु असे आरोग्यासंदर्भातील अंकदेखील असायचे. पण आम्ही काय वाचावे आणि काय वाचू नये ह्यावर काहीही निर्बंध नसायचे.
मी अकरावी-बारावीत असताना त्यांनी वेगवेगळी साप्ताहिकं आणायला सुरु केली होती. त्यात ते Stardust आणि Filmfare पण आणायचे. एका स्टारडस्टच्या अंकात ममता कुलकर्णीचे बोल्ड फोटो होते. पण म्हणून तो अंक आणायचा नाही असे त्यांनी केले नाही. इतर अंक जसे आणले तसेच तेही घेऊन आले. माझी मधली बहीणच जास्त कडक. तिने ते सगळे फोटो असलेल्या पानांना स्टेप्लरने एकत्र पिना मारल्या.
आपल्या कृतीची जबाबदारी आपणच घ्यायला त्यांनी अप्रत्यक्षरीत्या शिकवलं.
बाबांनी १९९९ साली रिटायर झाल्यावर कॉम्पुटर विकत घेतला आणि ते वापरायला शिकले. कित्येक व्हिडिओंचे एडिटिंग, व्हिडिओ फाइल्समधून फोटो काढून घेणे. तसेच त्यांनी Microsoft Excel वापरून इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी एक सॉफ्टवेअर बनवले होते. बहुतेक फ्लॉपीमध्ये कॉपी करून काही लोकांना विकले होते. इनकम टॅक्स रिटर्न स्वतः भरायला मी त्यांच्याकडूनच शिकले. प्रत्येक गोष्टीचा अतिशय खोलात जाऊन अभ्यास करायचा त्यांचा स्वभाव होता.
तसंच त्यांना स्वयंपाक पण चांगला करता यायचा. लग्नाच्या आधी जवळपास ८-९ वर्षे स्वतः हाताने स्वयंपाक करून खात होते. लग्नांनंतर एकहाती स्वयंपाक जरी केला नसला तरी नंतरच्या काळात संध्याकाळी चहाच्या वेळी स्वतः काही तरी करून खायचे. स्वतः खायचे, माझ्या मुली आईकडे सांभाळायला असायच्या त्यांना करून घालायचे. त्यांना चवीचं ज्ञान चांगलंच होतं. कुठला पदार्थ कसा झाला असेल किंवा काय चुकलं असेल हे पण ते बरोबर सांगू शकायचे.
माझं लग्न झाल्यावर मी त्यांना विचारलं होतं की मी केलेलं उप्पीट कोरडं होतं. मला लगेच म्हणाले की तू रवा जास्त भाजत असशील. आणि तेच माझ्याकडून होत होतं. असो.
मला माहित आहे की माझे बाबा एक माणूस होते. त्यामुळे एखाद्या माणसात असणारे चांगले-वाईट असे सगळे गूण त्यांच्यात होते. कधी कधी ते टोचणारेही होते. पण त्यांच्याविषयी असलेला चांगल्या आठवणींचा ठेवा खूप मोठा आहे. तसेच माझं सुखसमाधान आयुष्य आणि माझे व्यक्तिमत्त्व घडण्यात त्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वाटा होता. त्यामुळे असे हे माझे बाबा बेस्ट बाबा होते.