काही दिवसांपूर्वी नेदरलँडचे माजी पंतप्रधान ड्राइस व्हेन एग्त आणि त्यांच्या पत्नी यांनी त्यांच्या देशात कायद्याने मंजूर असलेले स्वेच्छामरण वयाच्या 93 व्या वर्षी स्वीकारले. अधूनमधून अशा बातम्या वाचनात येतात. आजच्या घडीला जगभरात सुमारे डझनभर देशांमध्ये या प्रकारच्या मरणाला कायदेशीर मान्यता आहे. त्यापैकी नेदरलँडस, बेल्जियम, कॅनडा आणि स्वित्झर्लंड ही आघाडीची मंडळी आहेत. असा कायदा अन्यत्रही असावा या उद्देशाने विविध देशांमध्ये या विषयावर चर्चा आणि विचारमंथन होत असते. सध्या या संदर्भात युकेमध्येही जोरदार चर्चा, सर्वेक्षण आणि विचारमंथन चालू आहे आणि या विषयावर संसदीय मत घ्यावे म्हणून सह्यांची मोहीम राबवली जात आहे.
गेल्या महिन्यात या विषयावरील “आता वेळ झाली” हा मराठी चित्रपट प्रदर्शित झालाय. त्या निमित्ताने त्यातील प्रमुख भूमिका करणाऱ्या दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी या ज्येष्ठ कलाकारांची मुलाखत प्रसारित झालेली आहे. मुलाखत चांगली असून त्यामध्ये दोघांनीही काही चांगले मुद्दे मांडलेत. स्वेच्छामरण (voluntary euthanasia) हा विषय समाजाने निषिद्ध न मानता त्यावर खुलेपणाने चर्चा करावी असा त्यांच्या चर्चेचा सूर आहे. सत्यघटनेवर आधारित असलेल्या त्या चित्रपटात, ‘
धडधाकट असलेल्या माणसालाही स्वेच्छामरणाचा अधिकार असायला हवा’
ही मागणी अधोरेखित केलेली आहे.
या विषयाला वैद्यकीय, कायदेशीर, सामाजिक, नैतिक आणि भावनिक असे अनेक पैलू आहेत. त्या दृष्टिने या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. या लेखात विषयाची फक्त वैद्यकीय बाजू मांडत आहे.
(मरणासन्न अवस्थेत असलेल्या रुग्णांच्या बाबतीत त्यांची स्वतची ‘त्या वेळेस’ परवानगी हा प्रश्न उपस्थित होत नाही. अशा प्रकरणांमध्ये (अन्य परवानगीने) त्या रुग्णांचे जीवरक्षक उपचार थांबवून त्यांचा मृत्यू जवळ आणणे याला Non-voluntary euthanasia असे म्हणतात. त्या प्रकारची कायदेशीर सशर्त परवानगी बऱ्याच देशांमध्ये आहे. हा प्रकार लेखात घेतलेला नाही कारण त्यावर पूर्वी अनेकदा चर्चा झालेल्या आहेत).
ज्या देशांमध्ये स्वेच्छामरणाला कायदेशीर मान्यता आहे तिथे त्यासाठी संबंधित व्यक्तीच्या निवडीचे काही वैद्यकीय निकष ठरवलेले आहेत ते असे :
1. संबंधित व्यक्तीचे वय किमान 18 वर्षे पूर्ण पाहिजे
2. ती व्यक्ती स्वतःच्या तब्येतीविषयी निर्णय घेण्यास सक्षम असावी
3. त्या व्यक्तीला कुठल्यातरी प्रकारचा बरा न होणारा वेदनामय दुर्धर आजार झालेला असावा.
संबंधित प्रत्येक देशातील कायद्यांमध्ये वरील निकषांमध्ये थोडेफार फरक/शिथिलता असू शकतात. परंतु त्याच्या खोलात आपण शिरणार नाही. असे मरण आणण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वैद्यकीय पद्धतींचा औषधांसह तपशील मांडणे हा या लेखाचा उद्देश आहे.
महत्त्वाची टीप : जे वाचक या विषयाबाबत अत्यंत संवेदनशील आहेत किंवा ज्यांना ही संकल्पनाही नकोशी वाटते, त्यांनी पुढील लेख वाचण्यापूर्वी पूर्ण विचार करावा. अन्यथा इथूनच माघार घेणे उत्तम.
..
..
..
..
स्वेच्छामरणाची कार्यवाही करण्याच्या दोन पद्धती आहेत :
1. वैद्यकीय सल्ल्यानुसार केलेली आत्महत्या (physician-assisted suicide), आणि
2. डॉक्टरांनी औषधी इंजेक्शन देऊन घडवलेला मृत्यू (euthanasia).
मूलतः या दोन्ही पद्धतीत आधुनिक वैद्यकातील औषधांच्या मोठ्या डोसचा वापर केला जातो (ती ‘औषधे’च आहेत, विषारी पदार्थ नव्हेत). या औषधांमुळे संबंधित व्यक्तीला मृत्यू लवकरात लवकर आणि वेदनारहित यावा अशी अपेक्षा असते. परंतु वास्तवात वेगवेगळे अनुभव येऊ शकतात. काही रुग्णांना या प्रक्रियेदरम्यान बराच त्रास होऊ शकतो. या सगळ्याची कल्पना रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना दिली जाते आणि त्यानंतरच त्यांची मरणपद्धतीच्या प्रकारासह परवानगी घेतली जाते.
आता दोन्ही पद्धती विस्ताराने पाहू.
• वैद्यकीय सल्ल्यानुसार केलेली आत्महत्या
यासाठी ज्या औषधांचे पर्याय उपलब्ध आहेत त्यांची आता माहिती घेऊ. औषधांच्या गटाचे नाव (व कंसात त्याचे एखादे उदाहरण) आणि त्याचे गुणधर्म अशा पद्धतीने माहिती देतो.
1. Sedatives (Chloral Hydrate) : मेंदूला गुंगी आणून झोप आणणारे हे औषध आहे.
2. Barbiturates (Pentobarbital) : ही औषधे मेंदूचा संवेदना स्वीकारणारा भाग बधीर करतात आणि त्यानंतर गुंगी आणि झोप आणतात.
3. Benzodiazepines (diazepam) : ही मन शांत करून गुंगी आणतात.
4. Opioids (morphine) : ही वेदनाशामक, गुंगी आणणारी आणि श्वसनक्रिया मंद करणारी असतात.
5. Cardiotoxic Agents (digoxin) : मुळात हृदय दुर्बलतेसाठी दिले जाणारे हे औषध अतिरिक्त डोसमध्ये हृदयाचे आकुंचन थांबवते आणि हृदयक्रिया बंद करू शकते.
वरील औषधांपैकी कोणती वापरायची त्यामध्ये देशागणिक काही फरक आहेत. फक्त एकाच औषधाऐवजी खालील प्रकारच्या संयुक्त प्रणाली देखील वापरल्या जातात :
1. ‘DDMA’ (diazepam, digoxin, morphine and amitriptyline) किंवा
2. ‘DDMP’ (diazepam, digoxin, morphine and propranolol).
वरील १ मधील amitriptyline हे नैराश्यविरोधी औषध आहे
आणि
२ मधील propranolol हे beta blocker या प्रकारचे औषध असून एरवी उच्चरक्तदाब आणि हृदयविकारांसाठी उपचार म्हणून वापरले जाते. तसेच घबराट (panic) कमी करणे हा त्याचा गुणधर्म आहे.
रुग्णांचे प्रत्यक्ष अनुभव
वरील प्रकारची औषधे घेतल्यानंतर मृत्यू लवकरात लवकर आणि अन्य कुठल्याही शारीरिक कटकटी व त्रास निर्माण न होता यावा अशी अपेक्षा असते. परंतु वास्तवात तसे होतेच असे नाही. या बाबतीत बरीच व्यक्तीभिन्नता आढळते. मुळात असे औषध खूप मोठ्या डोसमध्ये तोंडाने घ्यायचे असल्याने ते घेणे हे सुद्धा एक आव्हान असते. उदाहरण द्यायचे झाल्यास barbiturate या औषधाच्या १०० गोळ्या चूर्ण स्वरूपात करून त्या एखाद्या गोड द्रवात मिसळून लवकरात लवकर पिऊन टाकायच्या असतात. असले हे अघोरी मिश्रण पिताना जबरदस्त मळमळ आणि उलटीची भावना होतेच. त्यामुळे अनेकांना असा प्रकार केल्यानंतर अन्ननलिकेतील जळजळ, मळमळ व आतडी पिळवटून टाकणारी उलटी असे त्रास होतात. असा त्रास फारच झाल्यास शरीरात जलन्यूनता होते आणि या सगळ्याचा त्या औषधाच्या शोषणावर परिणाम होतो. कित्येकदा या औषधाच्या प्रभावाखाली बेशुद्ध अवस्थेत जात असलेला रुग्ण पुन्हा एकदा शुद्धीवर येऊ शकतो. म्हणून असे औषध देण्यापूर्वी उलटी-प्रतिबंधक औषधही द्यावे लागते.
ज्यांच्या बाबतीत उलट्या वगैरे न होता या मिश्रणाचे शोषण व्यवस्थित होते त्यांचा मृत्यू होण्यास लागणारा सरासरी वेळ एक ते दोन तास असतो. परंतु काहींच्या बाबतीत ही वेळ जवळजवळ साडेचार दिवसांपर्यंत लांबलेली आहे ! ही सर्व प्रक्रिया रुग्णाच्या घरी त्याच्या नातेवाईकांच्या उपस्थितीतच होत असते. जर तो मृत्यू बऱ्याच त्रासदायक पद्धतीने झाल्यास उपस्थितांनाही मनोवेदना होतात.
त्यामुळे या प्रकारच्या मृत्यूप्रक्रियेपूर्वी अजून एक खबरदारी डॉक्टरांना घ्यावी लागते. जर का तोंडाने गोळ्या घेऊन मृत्यू होण्यास खूपच वेळ होऊ लागला आणि रुग्णाची तडफड होऊ लागली तर अशा वेळेस डॉक्टरांनी मध्यस्थी करून इंजेक्शनच्या मदतीने मृत्यू लवकर आणावा लागतो. या प्रक्रियाबदलाची लेखी परवानगी रुग्णाने तोंडी औषध घेण्यापूर्वीच देणे महत्त्वाचे ठरते.
तोंडाने स्वतः मृत्यूचे औषध घेण्याच्या पद्धतीच्या मर्यादा आणि त्यातले संभाव्य त्रास/वेदना वरील विवेचनातून लक्षात येतील. ज्या इच्छुकांच्या बाबतीत असे त्रास होतात त्यांच्या नातेवाईकांना खालील प्रश्न नक्की पडतात :
१. “अरेरे ! हाच का तो शांतपणे आणि सन्मानाने मिळणारा मृत्यू?”
२. “याचसाठी त्या कुटुंबाने केला होता का सारा कायदेशीर खटाटोप?”
• औषधी इंजेक्शन देऊन घडवलेला मृत्यू
या प्रकारात वरती उल्लेख केलेल्या सर्व औषधी इंजेक्शनसचा समावेश आहेच. त्या व्यतिरिक्त अन्य काही औषधे वापरली जातात :
• भूल द्यायची (बेशुद्ध करणारी) औषधे (Propofol)
• स्नायू गलितगात्र करणारी औषधे (Pancuronium)
• हृदयक्रिया बंद पाडणारी औषधे (Potassium chloride)
या पद्धतीतही निरनिराळी औषधांची मिश्रणे - अर्थातच इंजेक्शनच्या स्वरूपात- वापरली जातात. सर्वसाधारण पद्धत अशी असते :
१. सर्वप्रथम चिंतामुक्तीचे औषध दिले जाते
२. त्यानंतर बेशुद्ध करणारे औषध देतात.
३. यानंतर शरीरातील हालचालींशी संबंधित सर्व स्नायू गलितगात्र (paralyze) करणारे औषध देतात. त्यामुळे श्वसनाचे स्नायू सुद्धा दुर्बल होतात. तसेच मोठ्या स्नायूंचे झटके येत नाहीत. असे झटके येताना न दिसणे हे नातेवाईकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.
४. गरजेनुसार हृदयक्रिया बंद पडणारे औषधही दिले जाते.
इंजेक्शनद्वारा आणलेला मृत्यू हा तोंडी गोळ्या घेण्याच्या पद्धतीपेक्षा अर्थातच सुलभ आहे. तरीसुद्धा या संदर्भात काही वादग्रस्त मुद्दे उपस्थित केलेले आहेत. इंजेक्शनद्वारा द्यायच्या औषधांचे डोस म्हणावे तितके प्रमाणित नाहीत. त्यामध्ये डॉक्टरांच्या अनुभवानुसार काही फरक होऊ शकतात. जर का या पद्धतीने इंजेक्शन देताना त्या व्यक्तीची बेशुद्धी पुरेशी नसेल तर तिला श्वास कोंडल्यावर किंवा पाण्यात बुडल्यावर जशा वेदना होतात त्या प्रकारचा त्रास होऊ शकतो. म्हणजेच या पद्धतीने होणारा सर्वांचाच मृत्यू अगदी शांतपणे होईल असे नाही. या लेखाच्या मुख्य संदर्भातील खालील वाक्य त्या दृष्टीने बोलके आहे :
While assisted suicide and euthanasia is often portrayed as a ‘Hollywood’ style peaceful and painless death, evidence from jurisdictions where the practice is legal reveals that this is not always the case.
• धोरणातील त्रुटी आणि विचाराधीन मुद्दे
सामाजिक पातळीवर पाहता स्वेच्छामरण हा अतिशय संवेदनाशील आणि वादग्रस्त विषय आहे. सामान्यजनांच्या मनात यासंबंधी एक बाळबोध असा गैरसमज आढळतो तो म्हणजे, संबंधित व्यक्तीला एक ‘घातक’ इंजेक्शन दिल्यावर पाच दहा मिनिटात सारे काही शांत शांत होते आणि मृत्यू येतो. परंतु वास्तव काय आहे ते आपण वर पाहिले. या संदर्भात आतापर्यंतच्या वैद्यकीय अनुभवावरून खालील मुद्दे लक्षात आलेले असून त्यावर भविष्यात गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे :
१. मृत्यू येण्यासाठी जी औषधे वापरली जातात त्यांच्या डोसबाबत एकवाक्यता नाही. तसेच प्रत्येक देशागणिक औषधांच्या मिश्रणामध्येही (cocktails) फरक आहे.
२. ज्या प्रकरणांमध्ये डॉक्टरांनी दिलेल्या इंजेक्शनद्वारा मृत्यू घडवलेले आहेत त्या सर्व प्रकरणांच्या अधिकृत नोंदी उपलब्ध नाहीत. ज्याप्रमाणे नेहमीच्या वैद्यकीय संशोधनाची विविध विज्ञानपत्रिकांमधून जाहीरपणे चर्चा होते, तसे काही या घटनांच्या संदर्भात होत नाही. परिणामी अशा मरणघटनांचा अभ्यासाला आवश्यक असलेला विदा फारसा उपलब्ध नाही.
३. या संदर्भातील वैद्यकीय धोरणांचे नियमन करणारी सरकारी समिती/यंत्रणा देखील सक्षम नाही. त्यामुळे निरनिराळ्या वैद्यकीय संघटनांच्या मतानुसार संबंधित औषधांची निवड आणि डोस ठरवले जातात.
४. या मरण प्रक्रियेदरम्यान जर रुग्णाला अत्यंतिक त्रास होऊ लागला किंवा त्याची तडफड दिसू लागली तर डॉक्टरांनी मध्येच (जीवरक्षक) हस्तक्षेप करायचा की नाही यासंबंधी सुद्धा मार्गदर्शक तत्वे असण्याची आवश्यकता आहे.
५. मानवी शरीराच्या परिपूर्ण अभ्यासामध्ये मरणोत्तर शवविच्छेदन हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. स्वेच्छामरण स्वीकारलेल्या व्यक्तींची या प्रकारे मरणोत्तर तपासणी करण्यासंबंधी निश्चित अशी नियमावली आखली गेली पाहिजे. अशा प्रकारच्या अभ्यासातून भविष्यातील या प्रकारचे मृत्यू अधिक सुखावह करता येतील.
समारोप
लेखाच्या प्रास्ताविकात म्हटल्यानुसार या विषयाला अनेक महत्त्वाच्या बाजू आहेत. त्यापैकी वैद्यकीय पैलू या लेखातून सादर केले. या विषयावरील आतापर्यंतच्या वैद्यकीय अनुभवातून लक्षात आलेल्या अधिक/उणे अशा दोन्ही बाजू वाचकांसमोर ठेवल्यात. या वास्तवातून कोणताही गैरसमज किंवा भीती पसरू नये अशी आशा वाटते; तसा अजिबात उद्देश नाही. विषयाच्या कायदेशीर बाजूबाबत कायदा अभ्यासकांनी स्वतंत्रपणे सविस्तर विवेचन केल्यास ते उपयुक्त ठरेल. या व्यतिरिक्त या संवेदनशील विषयाच्या सामाजिक, नैतिक आणि भावनिक बाजूंसंबंधी मते व्यक्त व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य लोकशाहीतील प्रत्येक नागरिकाला आहे.
**************************************************************************
संदर्भ :
१.
३. विविध वैद्यकीय पाठ्यपुस्तके