अहल्या शिळा राघवे मुक्त केली
पदी लागतां दिव्य होऊनी गेली.
जया वर्णिता सिणली वेदवाणी
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी.
समर्थ म्हणतात, श्रीरामांच्या चरणांचा स्पर्श होताच शिळा रुपी अहल्या मुक्त झाली. हा श्लोक वाचतना, अनेक प्रश्न मनात आले. अहल्या खरोखर शिळा झाली होती का? श्रीरामांच्या चरणाचा स्पर्श होतास ती पुन्हा मूळ स्वरूपात आली, हे कसे संभव आहे? समर्थांच्या या श्लोकाचा भावार्थ वाल्मिकी रामायणातील कथेत शोधण्याचा प्रयत्न मी आपल्या अल्प बुध्दीने केला आहे.
महर्षि विश्वामित्र, राम, लक्ष्मण आणि अनेक ऋषी मुनीं सोवत मिथिलेत पोहोचले. श्रीरामांना तिथे एक ओसाड निर्जन आश्रम दिसले. श्रीरामाने महर्षि विश्वामित्रांना विचारले या आश्रमात ऋषी, मुनी, आचार्य, ब्रह्मचारी इत्यादी कोणीच का दिसत नाही? ऋषी विश्वामित्र म्हणाले, हे आश्रम गौतम ऋषींचे आहे. पूर्वी देवराज इंद्राने महर्षि गौतम ऋषींच्या पत्नी अहल्येवर बलात्कार केला होता. अहल्या निर्दोष होती तरी समाजाने अहल्येलाच दोषी ठरवले आणि गौतम ऋषींच्या आश्रमावर बहिष्कार टाकला. आज ही परिस्थिती विशेष बदललेली नाही. स्त्रीवर अत्याचार झाला तरी लोक स्त्रीलाच दोष देतात. त्यावेळी ही समाजाने इंद्रासोबत अहल्येलाही दोषी ठरवले. तिला वाळीत टाकले.
एकदा समाजाने ज्या व्यक्तीशी "रोटी आणि बेटीचा" व्यवहार बंद करून वाळीत टाकले की त्या व्यक्तीची स्थिती एखाद्या वाळवंटातील दगडा सारखीच होते. अहल्येची स्थिती अशीच झाली होती म्हणून समर्थाने तिला शिळा असे संबोधित केले. समाजाने बहिष्कृत केले तरी काय झाले, परमेश्वरापासून तिला कोणीच दूर करू शकत नव्हता. माता अहल्येने श्रीरामांच्या भक्तीत जगण्याचा आधार शोधला. आपले दुःख आणि पीडा विसरून ती तपस्वी, प्रभुरामचंद्रांच्या नाम स्मरणात दंग झाली. असो.
समाजातील वरिष्ठ, प्रतिष्ठीत लोकांना, उदा. गावातील सरपंच ते राजा इत्यादींना, बहिष्कृत व्यक्तिला पुन्हा समाजात घेण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार होता. पण निर्णय राबविण्यासाठी समाजाने त्या व्यक्तीचे आतिथ्य स्वीकार करून त्याला पुन्हा समाजाने स्वीकार केले याची पावती देणे ही गरजेचे. बहुधा यासाठीच बहिष्कृत व्यक्तीने समाजाला किंवा गाव जेवण देण्याची परंपरा सुरू झाली. सौप्या शब्दांत बहिष्कृत व्यक्तीचे आतिथ्य स्वीकार करणे म्हणजे समाजाने त्याला स्वीकार करण्याची पावतीच.
माता अहल्या निर्दोष आहे, समाजाने तिच्या स्वीकार केला पाहिजे या हेतूने श्रीराम गौतम ऋषींच्या आश्रमात आले. गौतम ऋषी आणि माता अहल्याने सर्वांची पाद्यपूजा करून स्वागत केले. स्वतः माता अहल्याने पाण्याने श्रीरामांचे चरण धुऊन ते वस्त्राने पुसले. श्रीरामाच्या चरणांचा स्पर्श अहल्येला झाला. त्याचेच वर्णन समर्थांनी श्लोकात केले आहे. श्रीराम आणि लक्ष्मणाने माता अहल्या आणि गौतम ऋषींचे चरण स्पर्श करून त्यांना नमस्कार केला. श्रीराम, महर्षि विश्वामित्र, सहित अनेक ऋषी मुनींनी त्यांचे आतिथ्य स्वीकार केले. ते दृश्य पाहून स्वर्गातील देवतांनी पुष्पवृष्टी करून श्री रामांच्या कृतीचे समर्थन केले. असे वर्णन वाल्मिकी रामायणात आहे. माता अहल्येवर समाजाने टाकलेला बहिष्कार संपला. तिला पुन्हा समाजात मान ताठ करून जगणे शक्य झाले. गौतम ऋषींच्या आश्रमात पुन्हा ऋषी, मुनी आचार्य आणि शिक्षणासाठी ब्रम्हचारी येऊ लागले. पूर्वी प्रमाणे आश्रमात यज्ञादी कार्य पुन्हा सुरू झाले. असो.
अहल्या उध्दार ज्ञात इतिहासातील एकमेव अद्वितीय घटना आहे, जिथे एक राजा, एका पीडित निर्दोष स्त्रीला न्याय देण्यासाठी स्वयं तिच्या घरी गेला. तिचे आतिथ्य स्वीकार केले. समर्थ पुढे म्हणतात, श्रीराम आपल्या भक्तांची कधीच उपेक्षा करत नाही. वंचित, पीडित समाजाला न्याय देण्यासाठी श्रीरामचंद्र सदैव तत्पर असतात. अश्या भक्तवत्सल प्रभू रामाचे वर्णन करताना वेदवाणी ही शिणली, त्यात आश्चर्य काय.