म्युच्युअल फंड या विषयावर सोशल मिडिया आणि युट्युब यावर खूप माहिती मिळत असते. काहींच्या मते हा गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम मार्ग आहे तर काही याला खूप नावं ठेवतात आणि स्वतः शेअर मार्केट मध्ये गुंतवुन त्यात जास्त फायदा कसा आहे ते सांगतात. या सर्व मत-मतान्तरात मी माझा अनुभव सांगतो.
मी सुमारे ५ वर्षांपूर्वी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुकीला सुरुवात केली. अर्थात ५ वर्ष हा काही इक्विटी म्युच्युअल फंड मधील गुंतवणुकीच्या दृष्टीने फार मोठा कालावधी नाही. तरीही या ५ वर्षात मार्केट मध्ये खूप उतार चढाव आले त्यामुळे 'मार्केट सायकल' या प्रकाराचा खूप चांगला अनुभव या काळात आला.
जानेवारी २०१९ मध्ये एक्सिस लॉन्ग टर्म इक्विटी फंड (८ हजार प्रति माह), निप्पोन ग्रोथ फंड ( ३ हजार प्रति माह) आणि निप्पोन लार्ज कॅप फंड (२ हजार प्रति माह ) असे एकूण १३ हजार प्रति महिना गुंतवायला सुरुवात केली. निप्पोन फंडचं तेव्हाच नाव रिलायन्स असं होतं.
एकूणच शेअर मार्केट या प्रकाराबद्दल उत्सुकता वाढू लागली. काही महिन्यानंतर स्टॉक मध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट साठी डी मॅट आणि ट्रेडिंग अकाऊंट देखील काढलं आणि डायरेक्ट स्टॉक मध्ये गुंवणूक मे २०१९ पासून सुरुवात केली. त्यात अगदी पेनी स्टॉक पासून हाय क्वालिटी लार्ज कॅप पर्यंत सगळ्या प्रकारात उलाढाल करायला सुरुवात केली. युट्युब वरील तथाकथित एक्सपर्टचा सल्ला आणि टिप्स घेऊन स्टॉक ची खरेदी विक्री सुरु केली. याचबरोबर म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक सुद्धा खंड न पडता चालू होती.
पहिल्या एक वर्षांमध्ये थोडे फार उतार चढाव सोडले तर मार्केट तसं स्टेबल होतं. फेब्रूवारी २०२० पासून मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात घसरण सुरु झाली. पुढे येणाऱ्या मोठ्या घडामोडींची चाहूल मार्केटला आधीच लागते असं म्हणतात. कोरोनाच्या संकटाची सुरुवात झाल्यामुळे मार्केट खाली येत होतं. त्यामुळे वर्षभरात पोर्टफोलिओ मध्ये जमा झालेले प्रॉफिट अक्षरशः काही दिवसात निघून गेले. मार्चला सुरुवात झाली तेव्हा मार्केट रोज नवीन तळ गाठत होतं. आता स्टॉक आणि म्युच्युअल फंड दोन्हीचा पोर्टफोलिओ नेगेटिव्ह होऊन लाल दिसू लागला होता. आणि दिवसागणिक नुकसान वाढत होते. काही तज्ञ सांगत होते कि रोज उठून पोर्टफोलिओ बघू नका मार्केट डाउन ट्रेंड मध्ये आहे तरीही 'आदत से मजबूर' मी मात्र रोज पोर्टफोलिओ बघत होतो. रोज वाढत जाणारे नुकसान बघून वाटू लागलं होतं यापेक्षा बँकेत FD किंवा RD केली असती तर बरं झालं असतं. तरीही म्युच्युअल फंड SIP बंद करून पैसे काढून घ्यायचा विचार नाही केला. SIP तशीच चालू ठेवली.
सुरुवातीला जनता कर्फ्यू आणि मग २५ मार्च पासून सुरु झालेलं लॉकडाउन यामुळे मार्केट ने तळ गाठला. अजून किती खाली जाईल याचा कुणालाच काहीच अंदाज नव्हता युट्युब वरील तज्ज्ञ देखील काहीच सांगू शकत नव्हते अर्थात परिस्थतीच तशी गंभीर होती. या कठीण काळात एकच जमेची बाजू म्हणजे माझं वर्क फ्रॉम होम सुरु झालं आणि पगार बंद झाला नाही त्यामुळे SIP चालू ठेऊ शकलो. एका मागून एक लॉकडाउन वाढत होते तरीही मार्केट खाली यायचं थांबलं. हळूहळू मार्केट वर येऊ लागलं आणि दिवसागणिक नुकसानीचा आकडा कमी कमी होऊ लागला. ६ महिन्यानंतर सप्टेंबर २०२० प्रथमच पोर्टफोलिओ पॉझिटिव्ह दिसू लागला. त्यानंतर मार्केटने २०२१ मध्ये एकदा २०२२ मध्ये २ वेळा आणि २०२३ मध्ये २ वेळा असे थोडे धक्के दिले तरीही एकंदर मार्केट अपट्रेन्ड होते.
या दरम्यान स्टॉक मार्केट मध्ये ट्रेडिंग साठी असंख्य युट्युब व्हिडिओ पहिले काही पुस्तके विकत घेतली आणि काही पेड कोर्स केले. फ्युचर अँड ऑपशन आणि स्विंग ट्रेडिंग देखील केले. पण एकंदरीत त्यामध्ये नफ्यापेक्षा तोटाच अधिक झाला. याचा अर्थ ती पुस्तके आणि कोर्सेस वाईट होते असं नाही पण एकंदरीतच ते मला जमलं नाही. त्यातच SEBI ने एक अहवाल सादर केला त्यात असं दिलं होतं कि FY २२ मध्ये ८९% ट्रेडर लॉस मध्ये आहेत त्यातही सरासरी नुकसान १ लाखाचं आहे. केवळ ११% ट्रेडर्स फायद्यात आहेत आणि सरासरी फायदा १.५ लाख आहे.
पण या सगळयात एक गोष्ट अखंड चालू होती ती म्हणजे म्युच्युअल फंड SIP. आता या सातत्यपूर्ण गुंतवणुकीचा काय फायदा झाला ते बघू.
निप्पोन लार्ज कॅप फंड मध्ये १२०००० गुंतवले गेले आणि त्याचे सध्याचे मूल्य २१८०००/- आहे म्हणजे सरासरी वार्षिक वृद्धी (CAGR) २४.२%.
निप्पोन ग्रोथ फंड मध्ये एकूण १८०००० गुंतवले गेले आणि त्याचे सध्याचे मूल्य ३९१०००/- आहे म्हणजे सरासरी वार्षिक वृद्धी (CAGR) ३१.८%.
एक्सिस लॉन्ग टर्म इक्विटी फंड मध्ये ४८०००० गुंतवले गेले आणि त्याचे सध्याचे मूल्य ६९१०००/- आहे म्हणजे सरासरी वार्षिक वृद्धी (CAGR) १४.६१%.
अर्थात सध्या मार्केट अपट्रेन्ड मध्ये आहे त्यामुळे फायदा जास्त दिसत आहे तरीही जेव्हा युद्ध परिस्थितीत काही काळ मार्केट मार्केट डाउन होता तेव्हाही परतावा RD आणि FD च्या तुलनेत खूप चांगला होता.
आता मी हेच ३ फंड त्यावेळी का निवडले तर ते माझ्या रिस्क प्रोफाइल आणि उद्दिष्ट यांना साजेसे होते म्हणून. आणि मी वेळोवेळी फंड बदलत राहिलो नाही. काही फंड या कालावधी मध्ये काही काळ अंडर परफॉर्मर होते पण तरीही मी दुसऱ्या फंड मध्ये स्विच न करता नेटाने याच फंड मध्ये गुंतवणूक चालू ठेवली.
हे सगळं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे कि हल्लीच्या सोशल मीडियाच्या युगात स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंड याविषयी प्रचंड माहिती उपलब्ध आहे त्यामुळे गुंतवणुकी बाबत निवड करताना गोंधळ होऊ शकतो.
मी काही गुंतवणूक सल्लागार नाही पण तरीही या छोट्याश्या अनुभवातून लक्षात आलेलं मर्म म्हणजे 'सातत्यपूर्ण गुंतवणूक' हाच आहे. मार्केट वर जात असेल, खाली येत असेल किंवा स्टेबल असेल तरीही दर महिन्याला ठराविक रक्कम SIP करून गुंतवावी म्हणजे दीर्घ कालावधी नंतर त्याचा फायदा दिसू लागतो.
Disclaimer: Mutual fund investments are subject to market risk. Mutual funds do not offer guaranteed returns.