अगदी नुकतेच इंदूर भटकंती झाली. मांडू, उज्जैन, ओंकारेश्वर, महेश्वर सर्व काही पाहिले. पण खास आकर्षण होते ते छप्पन दुकान आणि रात्रीच्या सराफ्याचे. छप्पन दुकान हा छप्पन गाळ्यांचा समुच्चय. छप्पन दुकान दिवसभर सुरु असते. शेवटचे १/२ कपड्यांचे गाळे वगळता इतर सर्व खादाडीचीच दुकाने आहेत. इथले सर्वाधिक खास म्हणजे विजय चाट हाऊस, जॉनी हॉट डॉग आणि बाबू नारियल क्रश.
वेगवेगळ्या स्टॉल्सवरुन खादाडीचे पदार्थ घेऊन निवांतपणे खाता यावेत म्हणून इकडे जागोजागी सीट आउट्स आहेत.
विजय चाट हाऊसचे सर्वच पदार्थ एकदम जबरदस्त. खोबरा पॅटिस इथला युएसपी. एकदम मऊसूत पॅटिसमध्ये खोबर्याचे सारण आणि आंबटगोड चटणी. एकदम सुख.
खोबरा पॅटिस
इथला साबुदाणावडा सुद्धा अशक्य भारी आहे. दही, फराळी चिवडा आणि चटणीसोबत तो देतात. आपल्याकडच्या साबुदाण्या वड्यापेक्षा सर्व्ह करण्याची वेगळी पद्धत पण चव जबरदस्त.
असेच सलग एका रांगेत छप्पन गाळे आहेत.
इथला फेमस बाबू नायियल क्रश. शहाळ्याचे पाणी आणि त्यातलीच मलई एकत्र करुन मिक्सरवर फिरवून ग्लासमध्ये देतात. एकदम मस्त.
दुपारचं खाणं असं छप्पनमधील विविध प्रकार खात खातच केलं. साबुदाणा वडा, खिचडी, भुट्टे का किस, गराडू ढोकळा, खोबरा पॅटिस, बास्केट चाट, पनीर टिक्का, मसाला सोडा, नारियक क्रश अर्थात सर्व डिश शेअर करतच खाव्या लागतात कारण सर्वच हवेहवेसे वाटते.
बाकी छप्पन तर फक्त ट्रेलर आहे. खरी मजा तर सराफ्यालाच येते. दिवसा सराफ बाजारात सगळी दुकाने आहेत ते सराफांची, मात्र जशीजशी ते रात्री साडेआठ नवाला बंद होऊ लागतात तसातसा सराफा विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सने फुलायला लागतो. रात्री दहाच्या आसपास जवळपास संपूर्ण सराफा हा पूर्णपणे सुरु होतो ते पार उत्तररात्री दोन तीन वाजेपर्यंत. रविवारच्या दिवशी मात्र दागिन्यांची दुकाने बंद असल्याने संध्याकाळी सहापासूनच सराफा फुलायला लागतो. आणि गेलो तो रविवारच होता आणि राती साडेनऊला पोचलो असल्याने सर्व स्टॉल्स उघडले होते आणि प्रचंड गर्दी होती. येथे एक मात्र सांगणे आवश्यक. सराफा हा जुन्या इंदूरात ऐन बाजारात असल्याने येथे स्वतःची गाडी घेऊन येऊ नये. इंदूरातल्या कुठल्याही कोपर्यातून येथे येण्यासाठी व रात्री कितीही उशिरा जाण्यासाठी येथे रिक्षा उपलब्ध असतात. आम्ही देखील कार जिंजरवर ठेवूनच रिक्षाने सराफ्यात आलो. सराफ्यातल्या दुकानदारांप्रमाणेच येथले रिक्षावालेही अगदी हसतमुख आहेत.
रिक्षाने आम्हाला होळकर राजवाड्यापाशी सोडलं. राजवाडा असा झगमगत होता.
राजवाड्याच्या डाव्या बाजूच्या रस्त्याने थोडे पुढे जाताच सराफ्याच्या गल्लीची सुरुवात होते.
आतमध्ये प्रवेश करताच की एकदम स्वर्गच, दोन्ही बाजूंना विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स
इथले प्रमुख आकर्षण म्हणजे जोशी दही बडा हाऊस. प्लेटमधला दहीवडा हवेत उंच उडवून परत प्लेट्मध्ये झेलणारे आणि एकाच चिमटीतून सैंधव, काळी मिरी, चाट मसाला आणि जीरावम दहिवड्यावर खुबीने पेरणारे जोशीबुवा इथली खासियत. आम्ही गेलो तेव्हा जोशी नेमके तिथे नव्हते, सराफा मनसोक्त खादाडून परत येतांना त्यांचे दर्शन झाले. , त्यांचा मुलगा तेव्हा दुकानावर होता.
अफलातून चवीचा दहीबडा
थोडं पुढं गेल्यावर कुल्फीच्या दोन स्टॉल्सवर सोन्याचे प्रचंड दागिने घालून हसतमुखाने स्वागत करणारे दोन भाऊ आपल्या दिसतात. येथे आपल्याला सोन्याचा वर्ख लावलेली कुल्फी देखील ३०० रुपयात मिळते. इतर कुल्फ्या अगदी २०/३० रुपयांपासून मिळतात.
गराडू हे येथले अजून एक आकर्षण. एक प्रकारचे कंदमूळ आहे. आधी ते वाफवून घेतात आणि तेलात तळून त्यावर लिंबू आणि एक प्रकारचा विशिष्ट मसाला पेरुन एकदम गरमागरम खायला देतात. छप्पनमधल्या गराडूपेक्षा इथला गराडू शतपटीने भारी.
सराफ्यात खाद्यपदार्थांची प्रचंड विविधता आहे. अगदी चायनीज पासून मोमोज पर्यंत, पावभाजी पासून पिझ्झ्यापर्यंत विविध स्टॉल्स आहेत. इतके सर्वच खाणे शक्य नाही पण नुसते पाहण्यास तरी काय हरकत आहे. आणि तुम्ही येथे खात नसलात तरी दुकानदार खडूसपणाने बघत नाहीत, उलट खाऊ नका पण आमचे फोटो बिंधास्त काढा म्हणत असतात.
हा मोमोजचा स्टॉल
चाट
दहिवडा
डेझर्ट्स
ही १२ चवींची पाणीपुरी एकदम भन्नाट. त्यातही हिंग लसूण, हाजमा हजम आणि पायनापल स्वाद तर एकदम भारी. १२ चवींची पाणीपुरी खाताना मात्र शेयर करुन खाऊ नये कारण वेगवेगळे स्वाद मिस होऊ शकतात आणि त्यातही सराफ्यातले प्रमुख पदार्थ खाल्यावरच पाणीपुरीस हात घालावा कारण ह्या बारा पुर्या गप्पकन पोटात बसतात.
गराडूप्रमाणेच भुट्टे का किस येथले अजून एक आकर्षण. मक्याचे दाणे किसून आणि वाफवून मसाला टाकून देतात.
अग्रवालची मिठाई म्हणजे एकदम भारी. राजभोग, गुलाबजाम, कलाकंद, रसमलई, रबडी, मालपुवा, काय नाही ते विचारा.
रबडी तर अशी घट्ट, सायीचा प्रचंड दाट थर असलेली.
येथली जिलेबी पण लै भारी. जवळपास ७०० ग्रॅम असलेली एकच भलीमोठी जिलबी मागणीनुसार तळून देतात. सोबत असतात ते मालपुवे.
आता इतकं खाल्ल्यावर नवीनचं कोकोनट क्रश हवंच, छप्पनमधल्या बाबूपे़क्षाही नवीनचा नारियल क्रश जगात भारी. येथे एक अॅडिशन म्हणजे नारियल क्रशमध्ये नवीन वरतून पुन्हा शहाळ्याची कोवळी मलई टाकतो, त्याने तर अजूनच भारी चव येते.
सगळं खाऊन पचवायला इथे पानांचे देखील विविध प्रकार आहे. साध्या पानापासून चॉकलेट पानापर्यंत, बनारस पासून कलकत्त्यापर्यंत, स्मोक पानापासून फायर पानापर्यंत.
शेवटी काय, खायची कितीही इच्छा असली तरी पोट तर भरतं पण मन मात्र भरत नाही. सराफ्याला किमान दोन रात्री तरी हव्यात. शिवाय सगळे पदार्थ शेयर करुनच खावेत त्यामुळे येथली चव तर कळतेच आणि वैविध्यही अनुभवास येते.
खरंच पृथ्वीवरील स्वर्ग आहे हा सराफा म्हणजे आणि तेथील खाद्य म्हणजे स्वर्गसुखाची परमावधी.