हिशोब
एकदा तीन मित्र हॉटेलमध्ये जेवायला गेले. भरपेट जेवण आणि गप्पा झाल्या. कडक कॉफी झाल्यावर त्यांनी वेटरला बिल आणायला सांगितले. वेटरने बिल आणून दिले. बिल झालं होतं. तीनशे रुपये.
“हे बाकी बेस झालं. प्रत्येकी शंभर रुपये! हे माझे शंभर.” त्याने पाकिटातून शंभराची नोट काढून प्लेटमधे ठेवली.
तर अशाप्रकारे त्या मित्रांनी प्रत्येकी शंभर रुपये शेअर करून बिल चुकते केले. कॉफीचे शेवटचे घुटके घेत असताना वेटर परत आला.
“जेन्टलमेन, माफ करा, आमच्या कॅशिअरने बिल करताना चूक केली. आपले बिल तीनशे नव्हे तर अडीचशे रुपये झाले आहे. कॅशिअरने माझ्याकडे हे पन्नास रुपये तुम्हाला परत देण्यासाठी दिले आहेत. पण पन्नास रुपये तुम्ही तिघात कसे वाटून घेणार? म्हणून मी काय केले आहे कि मी ह्यातून वीस रुपये मला टिप म्हणून ठेवून घेतले आहेत. आणि उरलेले हे घ्या प्रत्येकी दहा रुपये.”
मित्रांनी विचार केला, “अरे, आपण टिप द्यायला विसरलोच होतो. आणि आपल्याला पण बरच झाले. दहा दहा रुपये परत मिळाले.”
अशाप्रकारे मित्र, वेटर आणि कॅशिअर सगळे खुश झाले.
पण अस्सल पुणेरी असल्यामुळे माझ्या मनात किडा वळवला. का?
मी मनात हिशेब करत होतो. प्रत्येक मित्राने नव्वद रुपये खर्च केले. म्हणजे एकूण दोनशे सत्तर अधिक वेटरची टिप वीस रुपये. म्हणजे एकूण दोनशे नव्वद झाले. ऑ? मग दहा रुपये कुठे गेले?
प्रिय मित्रांनो, हिशेबात काय चुकले माझे?