नमस्कार मंडळी
माझ्या अनेक आवडींपैकी एक म्हणजे बागकाम. त्यासाठी नेहमी वेळ मिळत नसला तरी सकाळचा चहा घेउन गॅलरीत झोपाळ्यावर बसणे आणि मेहनतीने लावलेल्या बागेतील झाडांची विचारपूस करणे ईतके तरी मी करतोच. कधीतरी विकांताला सगळी हत्यारे परजून कुठेतरी खुरपणे, खते देणे, दोर्या बांधुन वेल वर चढवणे , बांबूच्या कामट्या खुपसुन आधार देणे, कुंड्या बदलणे असे काहीतरी चालु असते. मग गॅलरी मातीने माखली की घरच्यांचा रोष होण्याच्या आत गॅलरी धुणे हेही त्यात आलेच. अर्थात माझे हात माखलेले असल्याने त्यातही मला मदतीला बायको लागतेच. पाणी दे,खराटा दे, हातावर पाणी घाल वगैरे.(आणि मग "नको ती झाडे आणि नको तुझे गॅलरी धुणे" हेही ऐकुन घ्यावे लागतेच :))
पुर्वी बैठे घर असताना आजीने अंगणात लावलेली जाई,जुई,अनंत्,जास्वंद्,कोरांटी,कर्दळ आणि पाठीमागे असणारा खोबरी आंबा,नारळ ही झाडे , आसपासच्या वाड्यात खेळायला गेले असता तिकडची विविध झाडे ही मित्रमंडळीं ईतकीच ओळखीची होती. पण हळूहळू घरे पाडुन ईमारती बांधायचे खूळ आले आणि बघताबघता ते सगळे वैभव लयाला गेले. मग गॅलरीत जमतील तशी झाडे लावली, पण ती दुधाची तहान ताकावर भागवावी ईतपतच. मग कामानिमित्त "पोटासाठी भटकत जरी दूरदेशी फिरेन" सुरु झाले आणि आवडीने लावलेली झाडे फुकटावारी लोकांना देउन टाकली. ५-६ वर्षे अशी गेल्यावर जरा स्थिरता आली अणि पुन्हा झाडे लावणे सुरु झाले. यावेळी मात्र ठरवुन जाई,जुई,सायली,कुंदा अशी फुलांची झाडे लावत गेलो. ती जगल्यावर कवठी चाफा,पांढरा चाफा ,लाल चाफा आणि सोनचाफा आणले. तुळस्,वेखंड, आले,हळद,कढीपत्ता सुद्धा लावले. टेकडीवर फिरायला जातो तिथुन सावरी आणि मोहाच्या बिया मिळाल्या. बागेत राय आवळे आणि चिंच मिळाले. जांभळे आणि आंबे/फणस तर घरी येतातच, त्या बिया रुजवल्या. लिंबु,पपई लावुन झाले. बकुळ /अनंत नर्सरीतून आणले.
ईतके सगळे होउनही सोनचाफा मात्र मला म्हणावे तसे यश देईना. एकदा लावले ते झाड जास्त पाण्यामुळे मेले. दुसर्या वेळी कुंडी बदलताना काहीतरी लोचा झाला आणि पाने गळून ते झाड मेले. बरे ह्याला देवचाफा म्हणतात कारण याची फांदी लावुन ते येत नाही तर कलमच आणावे लागते. त्याला पाणी कमी आणि उन जास्त लागते अशी बरीच माहिती मिळत गेली. त्यातुन मला कायप्पावर वेलणकर चाफ्याविषयी समजले. वेलणकर नावाच्या गृहस्थांनी ही १२ महीने फुले येणारी सोनचाफ्याची जात शोधली आहे. काही जणांकडुन खात्री करुन घेतली तेव्हा त्यांचे अनुभव चांगले आहेत असे समजले. मग वेलणकरांशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की आम्ही १-२ रोपे पाठवत नाही, फक्त मोठी ऑर्डर असेल तरच पाठवतो. आता काय करावे?
मग त्यांनीच उपाय सांगितला. ठाण्याचे एकजण तुमच्या माझ्यासरखेच बाग् प्रेमी. ते सगळ्या ऑर्डर्स एकत्र करतात आणि मोठ्या प्रमाणावर रोपे मागवतात, त्यांच्याशी संपर्क करा असे सांगितले. मग मी त्यांच्याशी बोललो. त्यावर त्यांनी ही रोपे आम्ही कुडाळच्या नर्सरीतुन पावसाळ्यानंतर मागवतो असे सांगितले. मग मी तो विषय सोडुन दिला. ४-५ महीने गेले, आणि एक दिवस कायप्पावर एक ग्रुप तयार झाला ज्यात माझेही नाव होते. ठाण्याच्या शी. प्रशांत ठेंगे यांनी हा ग्रुप तयार केला होता. ज्यांना वेलणकर चाफा हवा असेल त्यांनी आगाऊ रक्कम भरुन झाडे बूक करायची होती. शिवाय ही बातमी ईतरत्र दिल्यावर अजुन २-३ जणांनी मला गळ घालुन एक झाड पाहिजे म्हणुन सांगितले. मी ताबडतोब सगळी रक्कम भरुन टाकली. मग रोज कायपावर मेसेज येउ लागले. झाडे तयार आहेत, झाडे निघाली आहेत, झाडे पोचली आहेत असे करता करता तो सुदीन आला.
आज पुण्यात ४-५ रूट ठरवुन प्रत्येक रूटवर ४-५ स्पॉट ठरवुन झाडे वाटप होणार होते. रक्कम आधी भरलेल्यांनाच झाडे मिळणार होती. सकाळपासुन कायप्पावर उत्तम नियोजन सुरु होते, प्रत्येक स्पॉटचा अॅडमिन वाटप करणार होता. स्पॉटवर पोचलो तो मंडळी टेम्पो ची वाट चातकासारखी बघत उभीच होती. यथावकाश तो आला आणि शिस्तीत वाटप झाले. मी माझी झाडे घेउन घरी आलो.
सध्या हे पाहुणे गॅलरीत आहेत, पावसात भिजत आहेत. आणि त्यांना योग्य जागी लावण्यासाठी मी रविवारची वाट बघत आहे. बघुया यावेळी कसे यश मिळते ते.