गणेसोत्सवात एक सकाळची पुजा आरती आणि एक संध्याकाळची पुजा आरती केली की उर्वरीत वेळ रिकामा असतो, किंबहुना जाणीवपुर्वक काही वाचनास, चिंतनास वेळ रिकामा ठेवलेला असतो. आज सहज वाचन करताना अजुन काही ऐतिहासिक कविता वाचनात आल्या त्या येथे उधृत करीत आहे.
सदर लेखन दामोदर हरि चापेकर ह्यांनी येरवडा जेल मध्ये असताना लिहिलेले आहे. सर्वप्रथम म्हणजे त्यांचे आडनाव चाफेकर असे नसुन चापेकर असे आहे. हे तिघे भाऊ
१. दामोदर हरि - वय २७,
२. बाळकृष्ण हरि - वय २४
आणि
३. वासुदेव हरि - वय १८.
दामोदर आणि बाळकृष्ण ह्यांनी गणेशखिंडीत रॅन्ड ह्या अधिकार्याचा वध केला. दव्रिड नावाच्या इसमाने चुगली करुन त्यांची नावे सरकार ला कळवली म्हणुन वासुदेव ह्यांनी त्यांच्या "आपटे" नावाच्या मित्राच्या सोबतीने द्रविडचा वध केला . ह्या चौघांनाही तत्कालीन ब्रिटीश सरकारने ताबडतोब फासावर चढवले.
दामोदर ह्यांनी लिहिलेले हे हस्तलिखित १९५५ मध्ये स्वतंत्र भारत सरकारच्या हाती लागले आणि प्रकाशित करण्यात आले. त्यातील ह्या काही कविता :
कविता काव्य , साहित्य दृष्टीने पाहिल्यास त्यात विशेष असे काही दिसुन येत नाही. सहित्यिक मुल्यांच्या तुलनेने पाहिले तर सावरकरांच्या काव्याच्या जवळपासही जात नाहीत ह्या कविता पण ह्या कवितांतुन चापेकर बंधुंचे ज्वलंत देशप्रेम आणि कट्टर सनातनी धर्मप्रेम स्पष्टपणे दिसुन येते !
१)
सुखा आधी दु:ख भोगावे - लोके जैसे जाणुनी सुजने - देश हिताते लागावे ||
क्लेश सोसुनी तप आचरती सोडुनिया सदना मदना प्रभु नामधना रसना सेवी सुख भोगाते टाकुनी सेवटी स्वर्ग सुखाते मुनी पावे ||
शिवाजी राजा होऊनी गेला ज्यात जनी अभिमान मनी सकला सदनी गुणी शुर असा भोगियले बहु क्लेश आधी मग राज्य सुधा आणि यश पावे सुखा||
आर्य बंधुनो देश हितास्तव नित्य झटा करी घेई पटा तरवार वीटा जरी सैन्य कटा स्वधर्म कती निधन पाऊनी भूमी यश मिळवुनी मोजावे ||२)
नका नका भोगु तुम्ही परवशता आंग्लो जनांच्या खाता लाथा नाही तयाची लाज , पाव बिस्कुटे खाऊनी पिऊनी बनला दारु बाज ||
शिवाजी बाजी होऊन गेले गाजविली तलवार वंशज त्यांचे असोनी तुम्ही बनला सगळे नार ||
राव सदाशिव भाऊ पेशवे छातीचे सरदार दिल्ही अटकेवर तो त्याने विक्रम केला फार ||
जीवित्वाचा काय भरवसा तृण ऐसे माना धन्य व्हा जगी देशहितास्तव देऊन माना ||
ह्या दोन्ही कविता "पद" असे लिहिलेल्या आहेत अर्थात ह्या गेय असाव्यात पण किमान मलातरी ह्या चालीत गाता आल्या नाहीत. दुसर्या पदातील शिवाजी महाराज आणि सदाशिवराव भाऊ ह्यांचा गौरवपुर्ण उल्लेख महाराष्ट्राचा इतिहासातील सोनेरी पानांची आठवण करुन देणारा आहे.
पण तथापि चापेकर बंधुंन्ना शिवजयंती उत्सवाविषयी खुप काही आत्मीयता नव्हती, शिवरायांचे चालले दैवतीकरण हे त्यांना खटकत होते . ते स्वतःच स्वतःच्या शब्दात म्हणतात - "शिवाजी महारांजापासुन जे उदाहरण घ्यायचे ते न घेता लहानथोर पोरकट चाळे करतात हे आम्हांस सहन न होऊन खाले दोन श्लोक तयार केले :"
३)शिवाजी महाराज जयंती उत्सव सभेत म्हणलेले श्लोक :
वाक्शौर्योद्भव उच्च वृक्ष सुफला नाही कधी ऐकिले | स्वप्नी स्त्री मुख चुंबनी नच कधी संतानही जाहले |
बोलावे, परी वृष्टीहीनघनसे गर्जु नका हो असे | रंडा निती पराक्रमाविण जनीं , होते तियेचे हसे ||
नाही होत स्वतंत्रता शिवकथा घोटुनी भाटापरी | घ्यावे लागतसे शिवाजी बाजीपरी हे मस्तक स्वहस्तावरी ||
हे जाणोनी तरी अता सुजन हो ह्या खड्ग ढालां हाती | मारा थाप भुजांवरी अरि शिरे तोडूं असंख्यात ती ||
४)श्लोक प्रतिज्ञेचा : हा माझ्या मते चापेकर बंधुंचा सर्वात महत्वाचा श्लोक म्हणता येईल. ह्यातुन त्यांचा ठाम निश्चय दिसुन येतो तसेच कृती शुन्य लोकांना उद्देशुन तुम्ही नुसते बघत बसा आम्ही राष्ट्रकार्य करुन दाखवतो बघा हा टोमणा एकदम वर्मी लागावा असा आहे >
ऐका राष्ट्रीय युध्दभूमीवरी ह्या, प्राणांसी देऊ धका |
जे जे भाषण बोललो बहु जनीं, तो फार्स मानू नका |
धर्मध्वंसक शत्रुवक्षरुधीरा पाडूच भूमीवरी |
मारूनीच मरू आम्ही, तुम्ही स्वयें ऐकाल रांडांपरीं ||
५) गणेश उत्सवातील श्लोक :
अरे मूर्ख हो मर्द झाला कशाला | मिशा मोठमोठ्या धराव्या कशाला ||
न लज्जा तुम्हां भोगता दास्य हाय | करा हो तरी जीव जायां उपाय ||
अरे मारिती वासरे आणि गाई | महा दुष्टचांडाळ जैसे कसाई ||
हरा क्लेष त्यांचे, मरा , आंग्ल मारा | रिकामे नका राहू भूमीस भारा ||
हिंदुस्थान असे जनांत म्हणती लोकास ह्या सर्वही | येथे आंग्ल कसे स्वराज्य करिती जाणा महालाज ही ||
नावाला विसरु नका, दृढ धरा देशाभिमाना मनी | ठोका दंड, उठा , भिडा सुयशया दुष्टाचिया कंदनी ||
होते पुर्वज आमचे दृढ कसे झुंजावया कंदनी | गेले मेळवुनी यशास अपुल्या देशास ह्या रक्षुनी ||
त्यांचे पोटी आम्ही कसे निपजलो भानूस जैसे शनी | नेले राज्य हरुनि अमुचे तरी लज्जा न वाटे मनी ||
आता थोडीशी चिकित्सा करु. चापेकर आपले आहेत, त्यांच्या लेखनाची आपण निर्भीडपणे, कोणतीही भिती न बाळगता चिकित्सा करु शकतो, काय चुकीचे काय बरोबर ह्यावर टिप्पण्णी करु शकतो. इथे कोणत्याही दहशतवादाला घाबरायचे कारण नाही.
ह्या सर्वच कवितांमधुन जाज्वल्य देशभक्ती देशप्रेम ओतप्रोत भरुन वाहात आहे . पण त्याचे मुळ हे खरे सनातन धर्मवरील श्रध्दा हे आहे. ती श्रध्दा इतकी आत्यंतिक आहे की इतरांचे सोडुनच द्या , चापेकर बंधु साक्षात टिळकांच्या विषयी - "टिळक धड सुधारक ही नाहीत आणि स्वधर्मनिष्ठही नाहीत" असे म्हणतात ! हे जरा जास्तच झाले. अर्थात समकालीन लोकांच्या बाबतीत एखादा ग्रेट असेल तर ते आपल्याला तरी कुठे लक्षात येते म्हणा ! टिळक हे आजच्या सनातन परिप्रोक्ष्यातुन ग्रेट आहेत, गीतारहस्य तर अल्मोस्ट शंकाराचार्य ह्यांच्या गीताभाष्य आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरी ह्यां पेक्षा जास्त तर्कशुध्द आणि लॉजिकल वाटते. पण इथे आपण चापेकर बंधुंना बेनीफीट ऑफ डाऊट देऊयात , त्यांन्ना १८९८ मध्ये फाशी देण्यात आले आणि टिळकांनी गीतारहस्य १९०५ नंतर मडाले तुरुंगवासात लिहिलेला आहे. आणि त्याधी लोकमान्य टिळकांनी केलेल्या काही काही गोष्टी सनातन धर्माला धरुन नव्हता हे म्हणायलाही वाव आहेच.
चापेकर बंधुंनी सुरुवातीलाच आपण लहान असताना केलेल्या नागपुर ते रायपुर ह्या प्रवासात च मनात आलेल्या हिंसक क्रांतीकारक विचारांचे दाखले दिले आहेत, त्यावेळीस त्यांचे वय १५ आणि १२ होते ! फक्त ! इतक्या लहान वयात इंग्रजांच्या विषयी इतका पराकोटीचा द्वेष का निर्माण झाला असावा ह्याला उत्तर नाही , असेही खुद्द दामोदरच लिहुन ठेवतात. असेही नाही कि वडील किंव्वा अन्य पुर्वजांच्याकडुन काहीतरी इंग्रज द्वेषाचे धडे मिळाले असावेत. वडील तर (त्यांच्या वर्णनावरुन) गुळंमुळीत पळीपंचपात्रात खेळणारे ब्राह्मण हरदास वाटतात. त्यांना तर पोरांनी कडक बलोपासना केलेलीही खपत नव्हती.
कोणाला पटो न पटो पण काही तरी पुर्वसंस्कार नावाचा प्रकार असावाच. आणि नंतर लगेच काही वर्षात गणेश उर्फ बाबाराव , विनायक उर्फ तात्याराव आणि नारायणराव सावरकर हे देशप्रेमाने भारलेले बंधुत्रय उदयास यावेत अन त्यांनीही इतकाच पराकोटीचा त्याग करावा ह हा मती गुंग करुन टाकणारा योगायोग आहे !
आता शेवटचा आणि ऑबव्हियस विचार - हेच चापेकर बंधु १९४७ मध्ये जिवंत असते अन माऊंटबॅटन ह्या इंग्रजामुळे देशाची फाळणी होत आहे हे त्यांनी पाहिले असते तर त्यांन्नी माऊंटबॅटन चा वध/ खुन / हत्या / मर्डर केला असता का ? की ह्या फाळणीमुळे देशाला झालेले गँगरीन तब्बल ८०० वर्षांननंतर फायनली एकदाचे कापुन टाकले जात आहे , आता हिंदुंना हिंदु म्हणुन निर्भयपणे जगता येइल ह्या प्रॅक्टिकल / व्यावहारिक विचाराने आनंद साजरा केला असता ?
ह्म्म्म... अवघड प्रश्न आहे.
असो पण ह्या कवितांच्या निमित्ताने चापेकर बंधु ह्यांच्या विषयी वाचणे झाले, त्यांची विचारधारा कळाली, १८१८ ते १९४८ ह्या मोठ्ठ्या ऐसिहासिक पझल मधला एक मिसिंग पीस गवसला ह्याचा मनापासुन आनंद वाटतो!
गणपती बाप्पा मोरया !
_________________________________________________________________________________________________
तळटीप :
संदर्भ : हुतात्मा दामोदर हरि चापेकर ह्यांचे आत्मवृत्त
संपादक : वि. गो. खोबरेकर ,
प्रकाशक : सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
लिंन्कः https://archive.org/details/DamodarHariChaphekar/page/n6/mode/1up?view=…