श्रीगणेशोत्सवानिमित्त महात्मा फुले ह्यांचा एक सुप्रसिध्द अखंड
एक गोष्ट आजकाल प्रकर्षाने जाणवते आहे की आजच्या काळात लोकं जास्त वाचन करीत नाहीत, जुने ऐतिहासिक लेखन वाचत नाहीत. नुसतेच कोठेतरी काहीतरी वाचुन मते बनवतात. इन्स्टाग्राम रील्स आणि व्हॉट्सॅप युनिव्हर्सिटीच्या काळात आपल्या देशातील लोकोत्तर महापुरुष आणि त्यांचे अभिजात लेखन काळाच्या पडद्याआड चालले आहे , हे पाहुन फार खंत वाटते. विशेष करुन शाहु फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात ही समाज सुधारकांची विचारधारा अशी लुप्त होत जाणे हे अत्यंत निराशाजनक आहे.
ढ्यंड ढ्यंड ढ्यंड ढोलताशांचा कर्णकर्कश गोंधळ ऐकला, बाजारपेठेत कशच्या तरी थातुरमातुर गवताची किंमत तब्बल ५० रुपये लावुन चाललेली लुट पाहिली , प्लॅस्टिक थर्मॉकोलचे मखर , चायनीजच्या माळा , अव्वाच्या सव्वा रेट ने विकली जात असलेली सुमार दर्जाच्या पाच फळांच्या पिशव्या पाहिल्या . रस्त्यात टृअॅफिकला अडचण होत असुनही उभे केलेले मांडव पाहिले, अन माहात्मा फुलेंच्या लेखनाची आठवण झाली.
आता सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने महात्मा फुले ह्यांचा हा सुप्रसिध्द अखंड येथे उधृत करत आहे. "सुजाण" नागरिक ह्यातुन नक्कीच "ज्याला जो घ्यायचा तो" बोध घेतील अशी आशा आहे !
अखंडादि काव्यरचना
गणपती
पशुशिरी सोंड पोर मानवाचें ॥ सोंग गणोबाचें ॥ नोंद ग्रंथी ॥ ध्रु. ॥
बैसे उंदरावरी ठेवूनियां बूड ॥ फुकितो शेंबूड ॥ सोंडेंतून ॥ १ ॥
अंत्यजासी दूर, भटा लाडू देती ॥ नाकानें सोलीतो ॥ कांदे गणू ॥ २ ॥
चिखल तुडवूनी बनविला मोऱ्या ॥ केला ढंबुढेऱ्या ॥ भाद्रपदीं ॥ ३ ॥
* * * * * * * * वांचून ॥ करवी भ्रमण ॥ सर्व लोकीं ॥ ४ ॥
* * * * * चंद्र हांसला म्हणून ॥ श्रापवरदान ॥ पाहील्यास ॥ ५ ॥
* * * * * चंद्रास पाहीलें ॥ अस्वली वरिलें ॥ कृष्णदेवें ॥ ६ ॥
* * * * वला गणुजी दोंदीला ॥ नोवरा मिळाला ॥ देवबाप्पा ॥ ७ ॥
गणोबाची पूजा भावीका दाविती ॥ हरामाच्या खाती ॥ तूपपोळ्या ॥ ८ ॥
जै मंगलमूती जै मंगलमूती ॥ गाती नित्य किर्ती ॥ टाळ्यांसह ॥ ९ ॥
उत्सवाच्या नांवें द्रव्य भोंदाडीती ॥ वाटी खिरापती ॥ धूर्त भट ॥ १० ॥
जातिमारवाडी गरिबा नाडिती ॥ देऊळें बांधीती ॥ किर्तीसाठीं ॥ ११ ॥
देवाजीच्या नांवें जगाला पीडीती ॥ अधोगती जाती ॥ निश्चयानें ॥ १२ ॥
खरे देवभक्त देह कष्टवीती ॥ पोषण करीती ॥ घरच्यांचें ॥ १३ ॥
अजाणासी ज्ञान पांगळ्या अन्नदान ॥ हेंच बा स्मरण ॥ निर्मिकाचें ॥ १४ ॥
भोळा वारकरी त्यास दिली हूल ॥ स्मरणांत फल ॥ आहे म्हणे ॥ १५ ॥
क्षत्रिय रामाचा धूर्त बने दास ॥ गांठी शिवाजीस ॥ मतलबी ॥ १६ ॥
दादु कोंडदेव त्या ठेवी अविद्वान ॥ करवी तुळादान ॥ ऐदी भटा ॥ १७ ॥
स्वजातिहितासाठीं बोधीलें पाखांड ॥ धर्मलंड खरे जोती म्हणे ॥ १८ ॥
___________________________________________________
तळटीपः
१. श्रेयअव्हेर : वरील अखंड शासन प्रकाशित पुस्तकात जसा सापडाला तसाच्या तसा उधृत केलेला आहे.
२. पुस्तकातही **** असे च लिहिलेले आहे, ते नक्की काय शब्द असावेत ह्याचा अंदाज येतो. पण प्रकाशकाने ते का लिहिने नसावेत हे अनाकलनीय आहे.
३. उत्तदायित्वास नकार लागु. सदर लेखन महात्मा फुले ह्यांनी लिहिलेले असुन महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले आहे. त्यावर काहीही शंकाकुशंका अथवा आक्षेप असल्यास महाराष्ट्र शासनाशी संपर्क साधावा.
४. संदर्भ: महात्मा फुले समग्र वाङ्मय, पीडीएफ पान क्रमांक ४९९ . (पुस्तक पान क्रमांक छापलेला नाही. )
संपादक: धनंजय कीर, स.ग. मालशे आणि य दि फडके.
प्रकाशक : सचिव , महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई
लिन्क : https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4…