चांद्रयान-३ ची यशस्वी मोहीम पार पाडल्यावर इस्रो ने आता सूर्याकडे नजर वळवली आहे. आदित्य-L1 असे या यानाचे म्हणा किंवा वेधशाळेचे नाव असेल. ही वेधशाळा सूर्याचा वेध घेऊन सूर्याची तेजप्रभा (corona) आणि सूर्यापासून वाहणारे वारे (सोलर विंड) आणि इतरही अनेक गोष्टींचा अभ्यास करून त्याची विदा आपल्याला पाठवेल. ह्या छोट्या लेखात "L1" हा काय आहे त्याची चर्चा केली आहे.आदित्य-L1
बद्दल जिज्ञासूना https://www.isro.gov.in/Aditya_L1.html इथे माहिती मिळेल.
१) थ्री बॉडी प्रॉब्लेम म्हणजे दोन महाकाय आणि एक इटुकला पिटुकला त्यांच्यामध्ये घुटमळणारा. ह्यांचे गणित. लॅॅग्रंज आणि आयलर ह्या प्रसिद्ध गणितज्ञांनी सोडवले. दोन महाकाय "वस्तूंच्या" लठ्ठालठ्ठीत शहाणी माणसे "कुंपणावर " बसून राहतात. अश्या एकूण पाच जागा असतात. हे लॅॅग्रंज ने दाखवून दिले म्हणून लॅॅग्रंज बिंदू असे नाव पडले. ह्या बिंदूंवर बसून आपण दिग्गजांच्या हाणामारीचा आस्वाद घेऊ शकतो.
२) जिथे जिथे अशी स्थिति असते ( दोन महाकाय) असतात त्या प्रत्येक ठिकाणी असे पाच बिंदू असतात. ह्या बिंदूंवर दोनही महाकाय वस्तूंचे गुरुत्वाकर्षण बल समसमान असते.
३)ह्यापैकी L1, L2, L3 हे अस्थिर असतात. म्हणजे ते जणू टाईट रोप वकिंग करत असतात. त्यांचा तोल गेला तर ते कुठेतरी भरकटू शकतात. किंवा चकवा लागल्यासारखे आजूबाजूला फिरत राहतात. जर या ठिकाणी आपण आपला कृत्रिम उपग्रह/यान ठेवले असेल आणि ते भरकटले तर त्याला ताळ्यावर आणण्यासाठी इंधन लागते.
४) ह्याच्या उलट L4, L5, हे पार्किंग लॉट एकदम सुरक्षित! इथे तुम्ही तुमची गाडी लावून मजेत फिरू शकता. कोणीही मामा येऊन तुम्हाला दंड ठोकणार नाही वा टोचण लावून गाडी पळवणार नाही. तुम्हाला तुमच्या शहरातल्या अश्या L4, L5, जागा माहित आहेत काय?
५) आपल्या सूर्यमालेत सूर्य आणि प्रत्येक ग्रह ह्यांचे लॅॅग्रंज बिंदू आहेत. इतकेच नव्हे तर आपली पृथ्वी आणि चंद्र ह्यांचे पण लॅॅग्रंज बिंदू आहेत.
६) पैकी सूर्य आणि गुरु ह्या दुकलीचे लॅॅग्रंज बिंदू हे खास आहेत. ह्या जोडीच्या L4, L5 बिंदूंवर अक्षरशः हजारो लघुग्रह लपून बसले आहेत. ह्यांना ट्रोजन म्हणतात. एकूण L4, L5 म्हणजे अवकाशातील कचरा डेपो आहेत. पण हे L4, L5 तसे खूप कामाचे बिंदू आहेत. त्याबद्दल आता फक्त रुमाल टाकून ठेवतो!
हुश्श.
लेखनविषय: