माझ्या वयातल्या इतर कुणाही मुलाप्रमाणे मी सहावी किंवा सातवीत पहिल्यांदा स्वामी कादंबरी वाचली. मला हे कबुल करायला अजिबात संकोच वाटत नाही की ती कादंबरी त्यावेळी मला खुप आवडली होती. माधवरावांची एक प्रतिमा माझ्या मनात नोंदली गेली होती. कादंबरीच्या सुरवातीच्या पानावर असलेल्या इतिहासकारांच्या काही अभिप्रायामुळे शेंदराचा टीळा व्यवस्थित लागला होता. एकंदर ब्राह्मणी वातावरणात लहानपण गेल्यामुळे लावणी वगैरे अतिशय घाण प्रकार असतो त्याला टाळणे हेच उत्तम असा संस्कार असल्यामुळे कादंबरीतील माधवराव मधुन उठून जातात इत्यादी प्रसंग दाद देणारे आणि माधवराव या व्यक्तीबद्दल आदर वाढवणारे ठरले. रमामाधव यांच्यातील काही हलके फुलके नर्मविनोदी प्रणय प्रसंग त्याकाळातील माझ्या वयाला मोहवणारे वाटले आणि अखेरची ताटातुट गळ्यात आवंढा आणणारी होती. काकापुतण्यातील ताणतणावाचे प्रसंग बरी अद्दल मोडली अशा पुटपुटीत बदलुन हाणला मस्त अशा मांडीवर थाप मारत दाद देण्यापर्यंत प्रसंगी जात असे. हे सर्व दहावी पर्यंत येईपर्यंत तीन चार वेळेस नक्की झालं असेल. अर्थात त्याकाळात अशीच दाद वीरधवल, कालिकामुर्ती इत्यादी कादंबरींना सुद्धा दिली जात असे. खरी गोष्ट ही होती की माझ्या मनात इतिहासकालीन व्यक्तीरेखा आणि कादंबरीमधील व्यक्तीरेखा यांच्यामधे फरक करणार्या विवेकाचा अभाव होता.
आजही मी जेव्हा अशा विवेकाबद्दल बोलतो तेव्हा तसा विवेक माझ्या ठायी आहे असा माझा अजिबात दावा नाही. परंतु असा विवेक असावा अशा पद्धतीचे भान मला आज आहे असे माझे प्रामाणिक मत आहे. यामताबद्दल विरोध असु शकतो परंतु असा विरोध नोंदवण्याआधी माझे मत समजुन घेतले जावे अशी माझी माफक अपेक्षा आहे. इतिहासकालिन कादंबरी आणि काल्पनिक कादंबरी यामधे प्रमुख भेद हा असतो की दोन्ही मधील व्यक्तिरेखा पुर्णपणे भिन्न असतात. इतिहासकालीन कादंबरीमधील व्यक्ती प्रत्यक्षात जीवन जगलेल्या असतात. त्यांच्या संबंधी, त्यांच्या गुणावगुणांविषयीचे उल्लेख कुठे न कुठेतरी नोंदले गेलेले असतात. अशा व्यक्तिंचे चित्रण करतांना त्यांच्या या उल्लेखांना बाजुला सारता येणे अवघड असते. काल्पनिक व्यक्तिरेखा आपण हव्या तशा गुणांची बनवु शकतो. प्रसंगी त्यांच्यातील मनुष्याला बाजुला सारत सुपरहिरो बनवु शकतो. मात्र ऐतिहासिक कादंबरीमधे हे घडणे अवघड असते. पण कादंबरीकार मात्र हे भान न ठेवता हिरोला सुपर हिरो करतातच पण प्रसंगी व्हिलनला सुद्धा सुपरहिरो बनवतात. भारतासारख्या इतिहासाबद्दल अक्षम्य बेपर्वाई असलेल्या पण इतिहासाबद्दल अत्यंत उर्मट अहंभाव असलेल्या देशामधे ऐतिहासिक कादंबरीच्या नावाखाली वाटेल ते दडपणे गेल्या काही वर्षांमधे सुरु झाले आणि तशा कथानकांमधुन पुढे आलेला इतिहास हाच खरा इतिहास आहे अशी भ्रामक समजुत विशेषत: महाराष्ट्रात पसरली. अशा कथानकांमधले अग्रेसर नाव स्वामी कादंबरी आहे. आज मला स्वामी कादंबरी अजिबात आवडत नाही. मी आजही तिचे वाचन करेन परंतु काही वर्षांपुर्वी ज्या भावुकतेने मला ती कादंबरी आवडली होती तशी आज आवडत नाही.
स्वामी कादंबरी ज्या काळात आली त्या काळात साहित्य हे ब्राह्मणांचे ब्राह्मणांनी ब्राह्मणांसाठी लिहिलेले अशा एका परिघात अडकलेले होते. नाही म्हणायला इतर लेखक होते, परंतु त्यांचा आवाका मर्यादीत होता आणि त्यांची मजल पुणे वा दादर मधुन शाबासकी मिळावी इतकाच होता. त्यापलिकडे वाचकवर्गच नव्हता आणि प्रकाशन व्यवसाय मक्तेदारी असल्याने वेगळे काही लिहिलेले छापले जाण्याचा संभव नव्हता. अहो रुपम अहो ध्वनी करुन पाठखाजवणी करुन पैसे कमवणे आणि जमल्यास नाव कमवणे हे उद्देश असल्यावर जशी साहित्यनिर्मिती होईल ती तशी त्या काळात झाली. बहुधा हे पुरातन काळापासुन आहे. मुद्दा हा आहे की अशा काळात एखादी कादंबरी जी ब्राह्मणांची अहंता जोपासेल, त्यांच्या गतकालीन वैभवाची (!) जाण करुन देईल, त्यांच्या अक्षम्य चुकांवर पांघरुण घालेल नव्हे त्यांचा उल्लेख सुद्धा टाळेल, देव देश आणि धर्माच्या पेल्यातील अमृत प्यायला देऊन निवांत झोप आणेल, वर्तमानातील समस्यांना क्षणभर अंधारकोठडीत टाकून कर्तृत्वाचे धगधगते पलिते ह्या हातातुन त्या हातात झेलत भुतकाळातील तथाकथित संग्राम सावल्यांच्या खेळाच्या रुपात मांडून जागरणाने डोळे विस्फारत अभिमानाने डोलवायला लावेल अशा कथानकाची गरजच त्या काळात निर्माण झालेली होती. ती गरज स्वामीने पूर्ण केली.
४८ च्या गांधीहत्येनंतर ब्राह्मणांचे सामाजिक आयूष्य संपले. राजकीय आयुष्य १९२० ला टिळकांच्या मृत्युसमवेत संपले. ५२ चा कुळकायदा ब्राह्मणांचे आर्थिक आयुष्य संपवणारा ठरला. अशा प्रकारे २० ते ५२ अशा सुमारे ३०-३५ वर्षांच्या आत गेली दोन ते तीन हजार वर्षे भारतात आणि महाराष्ट्रात समाजाच्या जडणघडणीवर ब्राह्मणांचा पगडा होता तो संपून गेला. तसा तो सातव्या आठव्या शतकात मुहम्मद बिन कासिमच्या आक्रमणापासुन संपू लागलाच होता. आणि सुरु झाला होता एक काळा कालखंड ज्यामधे अस्तित्व टिकवण्यासाठी वाटेल ते करण्याचे उरफाटे धंदे. इस १००० च्या पुर्वीचा ब्राह्मण आणि इस १००० नंतरचा ब्राह्मण यामधे प्रचंड फरक आहे. अगदी जसा वैदिक कालखंडातील सर्वशक्तीमान, दयाळु राजा इंद्र आणि पुराणकथांमधुन समोर आलेला लंपट, लबाड इंद्र यांच्या सारखा. याचा अर्थ इस १००० नंतरचे सगळेच ब्राह्मण वाईट असा अर्थ नाही. समाजातील इतरही घटक साथीला असतांना जे घडू शकते तेच ह्या कालखंडात झाले. समाजातील योग्य घटकांनी अयोग्य गोष्टींकडे दुर्लक्ष केले की समाजाचे पतन निश्चित होत असते. ब्राह्मणांचे तेच झाले. वैयक्तिक लाभ अन हिशेब यांच्या नादात पेशवाई पतन पावली. नव्या साम्राज्यात कारकुनीशिवाय काही करता आले नाही. थोडेफार बरे निपजले ते फासावर गेले किंवा समाजाकडून धिक्कारले गेले. टिळकांच्या अस्ताबरोबर ब्राह्मणांची राजकीय घुसमट झाली. ६० च्या दशकात ब्राह्मण समाज म्हणून संपलेला होता.
अशा वेळेस स्वामी कादंबरी समोर आली. ब्राह्मणांची थोडीफार जमीन उरली होती तिचे वाटणीवरुन कज्जे चालु होते. नोकरी करुन आपण बरे आपली बायको बरी अशी विचारसरणी दृढ होत होती. एकत्र कुटुंब भांडणात तुटत होते किंवा सकाळ संध्याकाळ भांडे आदळत दात ओठ आवळत होते. तिन्ही लोकी भ्रष्ट पण आम्हीच श्रेष्ट असा फुकाचा अहंभाव वाढत होता. हा आपला तो त्यांचा असे वर्गीकरण मनात सुरु झाले होते. गाव सोडून शहरात आल्यामुळे गावची बलुतेदारी आणि जातीव्यवस्था सुटली होती. पण त्यामुळे इतर जातीच्या लोकांशी मिसळून वागण्याची गरज संपली होती. सोसायटीत आजुबाजुला ब्राह्मणच असावे असा आग्रह आणि कटाक्ष पाळला जात होता. त्यामुळे गावाकडुन शहरात विशिष्ट उपनगरातच घर घेतले जात होते. या सर्व घडामोडीत आपण ब्राह्मण असून धड शिक्षण नाही, धड नोकरी नाही, चार पैसे गाठीला नाहीत ह्याचा विचार न करता जुनी कर्मकांडे मात्र अगदी व्यवस्थित पुन्हा सुरु केली होती. प्रसंगी कर्ज काढले जात होते. मुंजीचे औचित्य संपुन दोन हजार वर्षे उलटली आहेत पण ब्राह्मण अजुनही मुंजीत अडकला होता. मानपान देणे घेणे यातच पुरुषार्थ शोधत होता. अशा ब्राह्मण मनाला स्वामी कादंबरीची भुरळ पडली.
काका पुतण्याच्या भांडणात, माधवरावाच्या देवभक्तीत, लांबुन लांबुन केल्या जाणार्या प्रेमकुजनात, संतापुन चाबकाचे फटके देऊन शासन करणार्या माधवरावात, हताश गोपिकाबाईत, राघोबादादात, नानात प्रत्येकात ब्राह्मण समाज स्वत:ला शोधत होता. स्वत:ला रमवत होता. गतकाळाच्या स्मृतीमधे आजचा वर्तमान विसरत होता. ब्राह्मणसमाजाने स्वामीला डोक्यावर घेतले. त्या कादंबरीत खरे किती खोटे किती हा संशोधनाचा विषय आहे. कादंबरी आवडलेल्यांना त्याची फिकीर नाही. हीच गोष्ट संपूर्ण पेशवाई बद्दल आहे. हीच गोष्ट इतिहासातील कुठल्याही कालखंडाबद्दल आहे. इतिहास कसाही असो कादंबरी आम्हाला हवी तशीच हवी ही वाचकांची मागणी आहे. ही मागणी स्वामी पूर्ण करते. ब्राह्मण जे करतो जसे वागतो बोलतो तसे इतर समाज करत असतो हे बर्याचदा आढळले आहे. त्याचमुळे नंतर इतर समाजातील लोकांना सुद्धा स्वामी कादंबरी आवडु लागली. कारण समस्या सर्वच समाजात असतात. आणि वर्तमान विसरुन भुतकाळात रमायला अनेकांना आवडते.
स्वामी मला का आवडत नाही याची कारण मिमांसा तुम्हाला कदाचित पटणार नाही. पटावी असा माझा आग्रह नाही. माझ्या कारण मीमांसेमधे काही चुका असण्याची शक्यता मी नाकारत नाही. कालानुरुप माझी मते बदलत असतात त्यात मला कमीपणा वाटत नाही. स्वामी मला का आवडत नाही याची कारणे तुम्ही शांतपणे वाचलीत याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि हे आभार नोंदवणे मला माझे कर्तव्य वाटते.