अस्पर्शित संध्याकाळ
घनव्याकूळ हे आकाश
मेघांना भिडतो वारा
तुटती थेंबांचे पाश
वाळूत गिरविली स्वप्ने
लाटांनी पुसली जाती
हलकेच उतरतो चंद्र
तिमिराच्या पंखावरती
क्षितिजाने सूर्याचा
मग हात घेतला हाती
अंबरात नक्षत्रांच्या
त्या स्निग्ध बावऱ्या ज्योती
पाण्यावर येई अलगद
ही चंद्रफुलाची छाया
मनात आठवते मग
आईची प्रेमळ माया