मुळ आरती/ चाल : आरती सप्रेम जय जय https://www.youtube.com/watch?v=xvF50JQEZc8
________________________________________________________________________
आरती सखेद जय जय कोव्हिड व्हायरस ।
विश्वसंकटीं नानाSSSSSSSSS होSSSSSSSS रुपीं आम्हां देसीं त्रास ॥ ध्रु० ॥
पहिला अवतार वुहान प्रांती प्रकटसी।
चिल्लर फ्लु मानुनी तुज जग फाट्यावर मारी ।
आम्हीही आलो करुनी थायलंडची वारी*।
ईंगा तु दाविला , भयानक पॅन्डेमिक होसी ॥ आरती० ॥
लागला लॉकडाऊन, आम्ही वाजविल्या थाळ्या*।
मोदीबुवांचे प्रवचन ऐकुनी सर्व नियम पाळ्या।
घरी बसुनी पत्ते कॅरम सागरगोट्या*ही खेळ्या।
निजसुख हे टोचता, घरी लाविल्या लाटाया पोळ्या ॥ आरती० ॥
रसातळाला जाई हळुहळु अर्थव्यवस्थाही ।
आयटीवाले आम्ही सारे शेयर मार्केट हो पाही ॥
घसरले शेयर पाहुनी संधीचा लाभही घेई।
आता पोर्टफोलिओ पाहुनी मनाला आनंद होई ॥ आरती० ॥
लॉकडाऊन सैलावला , लोकं बाहेरी पडती।
नियमांचा भंग म्हणुनी पोलीस पावत्या फाडती ।
आर.टी.ओ. चौकाचौकामध्ये चिरीमिरी छापती।
तू परवडला पण ह्या लोकांची आम्हां वाटे भीती ॥ आरती० ॥
दुसरा अवतार भयानक डेल्टा झालासी।
माणसे मरती टपटप जैसी किडा मुंगी माशी ।
तयामध्येही येई ऊत ह्या राजकारणासी।
थोडी सद्बुद्धी देऊनी, टुचुक* वाढवसी॥ आरती० ॥
वर्कफ्रॉमहोमीं घरी बसोनी चिंतन म्यां केले।
बुडले अवघे जग जरी अथवा रसातळा गेले ।
हर्षमहर्षभयोद्वेगैर्मुक्त* मन आपसुकची झाले।
अलिप्तपणाचे भोगु आता निजसुख हे अपुले ॥ आरती० ॥
ओमायक्रॉनरुपी तुझा नवीन अवतार आला।
लसवंत झाले लोकं, न घाबरती तुजला।
होईल ते होवो आता, कोव्हिड गर्दभगाडीत* गेला।
पशा म्हणे आम्हा मर्फी नियम* समजला ॥ आरती० ॥
__/\__
===================================================================
अवघड शब्दांचे अर्थ :
* थायलंडची वारी : ह्यावर मिपावर प्रवासवर्णन लिहिण्याचा विचार होता पण तो मोह "फॉरऑब्व्हियसरिझन्स" टाळाण्यात आलेला आहे.
* आम्ही वाजविल्या थाळ्या : जन्ता कर्फ्युच्या रम्य आठवणी https://youtu.be/pD-uJd8EN7w
* सागरगोट्या : हा खेळ काळाच्या ओघात लुप्तप्राय होत चालला होता, वर्कफ्रॉमहोम मुळे ह्या खेळाचे पुनरुज्जीवन करायची संधी मिळाली. तरी हौशी जिज्ञासु रसिकांनी येथील व्हिडीओ पहावा : https://youtu.be/Wbz-k-54RVY
#काढा_की
* टुचुक : म्हणजे वॅक्सीनेशन. हा शब्द वाचकांना बाळबुध्दी समजणार्या वृत्तपत्रांचा आविष्कार !
* हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो : संदर्भ भगवद्गीता अध्याय १२वा श्लोक १५वा.
यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यः ।हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः ॥ १५ ॥
तेवीं उन्मत्तें जगें । जयासि खंती न लगे ।आणि जयाचेनि आंगें । न शिणे लोकु ॥ १६६
* गर्दभ गाडीत : म्हणजे गाढवाच्या गाडीत
* मर्फी नियम : Anything that can go wrong will go wrong.
===================================================================