दाटून आलेलं आभाळ पण पाऊस पडत नव्हता
उडू की नको या विवंचनेत पडलेला एक अर्धा भिजलेला कावळा
कसा बसा, शहारत, तोल सावरत गर्द आकाशाकडे बघत
चारी दिशांना काय शोधत होता कुणास ठावूक
नक्की काय करावं या विवंचनेत त्याचा चेहरा बहुधा अधिकच काळवंडलेला
शेजारच्या कावळीच्या जास्त जवळ जावं तर सोशल डिस्टंसिंग आड येणार
अंतर पाळावं तर शेजारच्या बिल्डिंग वरचा कॉम्पिटिटर टपूनच बसलेला
अंधारे क्षितिज लंघून पलीकडे जावं तर
..पलिकडे नक्की काय आहे,
.. मित्र आहेत की शत्रू की इथल्यासारखंच तिथे
..जाताना वीज तर पडणार नाही ना
.. भिजलेले पंख किती काळ फडफडू शकणार आपण
आणि गेल्या कित्येक दिवसांचा
.. फॅमिली बरोबरचा घालवलेला वेळ
.. कच्या-बच्यांबरोबर झालेलं ट्युनिंग कसं मोडावं
.. थकल्या, भागल्या, वृद्ध मातापितरांना सोडलं तर कसं व्हावं त्यांचं
.. wfh मुळे कधी नव्हे इतकं निर्माण झालेलं घरट्याचं कौतुक कसं कमी व्हावं..
नुसतं शहारे, उसासे, आणि रीपिट
.. किती काळ असं बसावं काहीच कळेना
जाऊदे मरूदे..
पाऊस कधी पडणार ते ढगाला माहित
वीज कधी पडणार ते वाऱ्यालाच माहित
सोशल डिस्टंसिंग चं कधी, कितीकाळ पर्यंत ताणणार हे सरकारलाच माहित
पलीकडे काय आहे हे तिकडच्यालाच माहित
अशी मनाची समजूत घालून तो पुन्हा आपल्या मित्र, मैत्रीण, मुलं, नातलग यांबरोबर आणि बहुधा याविषयीच कावकाव करू लागला
आणि लॉक डाऊन चा विषय साऱ्या कावळ्यांनी त्यांच्या त्यांच्या पुरता सोडवून टाकला
माणसांचे नियम कावळ्यांना थोडीच लागू आहेत?!
--अनिकेत कवठेकर
लेखनविषय:
काव्यरस