विसाव्या शतकाच्या अखेरीस भारताने आपली आर्थिक धोरणं बदलली आणि दोन-चार वर्षांत त्याचा परिणाम इथल्या मध्यमवर्गावर दिसू लागला.लोकांच्या खिशात खुळखुळणारा पैसा वाढला होता,उच्छभ्रु समजल्या जाणाऱ्या दुचाकीला लोकाश्रय मिळु लागला होता, केवळ सिनेमात दिसणारे ब्रँड्स भारतात आपली दालनं उघडू लागले होते. या साऱ्याचा बदल इथल्या तरूणाईवर होणं स्वाभाविक होतं. त्यांच्या इच्छा,स्वप्न यात कमालीचा बदल झाला तो ही फार झपाट्याने. याच बदलाच्या टप्प्यावर 'राज मल्होत्रा' भारतीय तरुणांना भेटला (आणि तरुणींना भावला.) उनाड,मित्रांसोबत गाड्या उडवत फिरणारा, मेंडोलीन वाजवणारा बेजबाबदार. युरो-ट्रिपच्या एका प्रवासात सिमरनवर भाळणारा, प्रेमात पडून जबाबदार होणारा वैगेरे अनेक बाजू असलेला, त्याची नायिका त्याच्या बरोबर विरुद्ध स्वभावाची.बुजरी, शिस्तीत वाढलेली, वडिलांनी हिच्या संमतीशिवायच तिचं लग्न ठरवलेलं.
रडून,भेकून,तिच्या घरच्यांना पटवून धावत्या रेल्वेत सिमरनचा हात पकडणारा राज हा पुढे अनेक (खऱ्या) प्रेमकथांची प्रेरणा ठरला, त्याचप्रमाणे मराठी लोकांमध्ये करवाचौथ सारख्या प्रथा पण घुसडल्या गेल्या. गावातून शिक्षणासाठी शहरात जाणाऱ्या तरुणींना वडील 'जी ले अपनी जिंदगी' म्हणू लागले. दिलवाले दुल्हनिया मध्ये आदित्य चोप्राला राज मल्होत्राच्या रोल साठी ' टॉम क्रूझ' ला घ्यायचं होतं, पण सुदैवाने यश चोप्रांनी याला नकार दिला (आता सिमरन ला पलट म्हणणाऱ्या टॉम क्रूझ ची कल्पना सुद्धा करू शकत नाही). डर, बाजीगर सारख्या चित्रपटांमुळे आधी अँटी हिरो इमेज असलेल्या शाहरुख खानला या सिनेमाने रोमँटिक नायक केलं,'अमिताभ नंतर कोण?' या प्रश्नाचे तितके प्रभावी नसले तरी तितकेच यशस्वी बॉलिवूडला मिळाले होते.
'दिलवाले दुल्हनिया..' प्रदर्शित होऊन आज २५ वर्षे लोटली.थेम्स आणि सतलजमधून आता बरंच पाणी वाहून गेलं आहे, Trafalgar Square पाशी कबुतरांना दाणे टाकायलाही तिथल्या प्रशासनाने बंदी घातली आहे म्हणे. , सध्या नात्यांच्या संकल्पनाही काळानुरूप बदलल्या. पण 'दिलवाले दुल्हनिया..'ची मोहिनी मात्र आजही कायम आहे. खऱ्या आयुष्यात राज मल्होत्रा च्या बापासारखा बाप कुठे खरच असतो का हे नाईंटीज वाली पोरं अजूनही शोधत आहेत. बाकी प्रेमकथा पडद्यावरच नेहमी मोहक वाटतात पण खरं आयुष्य माणसाला वासेपूर मधला 'फैजल' बनवतं ......!