मला लिहिते करण्यात मोलाची भूमिका बजावणारे जेष्ठ मिपाकर अविनाश कुलकर्णी (अकु काका) यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो ही प्रार्थना.
*****
ब्रह्मांड लोकातून चिन्मय परत आल्यावर बोललेला नवस फेडायला जानकी बाई लगेच पुढल्या दोन दिवसांनी काशी यात्रेला गेल्या होत्या.
काशी यात्रेहून परत आल्यावर चिन्मयही आता पूर्वीपेक्षा जरा बरा वागू लागल्याचे पाहून त्यांनी अप्पा राशीनकरांकडे त्याला कुठेतरी नोकरीला लावण्यासाठी शब्द टाकला. अप्पांनीही त्वरित त्यांच्या परिचयाच्या सरकारी कामांचे कंत्राट घेणाऱ्या एका कंत्राटदाराकडे त्याला नोकरीला लावले होते. अप्पांना चिन्मयच्या खुशालचेंडू वृत्तीची पुरेपूर कल्पना असल्याने फार महत्वाची कामे त्याला देऊ नयेत असे त्यांनी त्या कंत्राटदाराला बजावले होते.
एकुणात दिवस बरे चालले होते. जानकी बाईही पोरगं कामधंद्याला लागल्याने खुशीत होत्या. त्याचं सगळं स्थिरस्थावर झाल्यावर समोरच्या फ्लॅट मधे राहणारे देशपांडे काका उर्फ चॉकलेट काका यांनी मागे त्यांना झालेल्या मारहाणीत जखमी झाल्यानंतर चिन्मयने केलेल्या त्यांच्या देखभालीची, मदतीची जाण ठेऊन त्यांच्या दूरच्या नात्यातील चंद्रिका नावाच्या मुलीशी त्याचे लग्न लाऊन देण्यात पुढाकार घेतला आणि काही दिवसांनी ते स्वर्गवासी झाले.
चंद्रिका आणि चिन्मयची जोडी अगदी नगास नग अशीच होती. लग्नानंतर वर्षभरातच त्यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आणि मोठ्या हौशीने जानकी बाईंनी नातवाचे नाव चंद्रचिन असे ठेवले. आता हा चंद्रचिन चांगला दहा वर्षांचा झाला आहे पण सर्वजण त्याला चंची म्हणूनच ओळखतात.
चंद्रिका, चिन्मय आणि चंची या तिघांमध्ये एक आवड सामायिक होती ती म्हणजे वाचनाची. तिघेही आपापल्या उपलब्ध वेळेनुसार घरातील कॉम्पुटरवर काही ना काही वाचत बसत. त्यात वडा-पाव हे मराठी संकेतस्थळ तिघांच्या विशेष पसंतीचे.
चंची वडा-पाव वरच्या बालकथा आवडीने वाचत असे तर चंद्रिका पाककृती, चित्रपट परीक्षण या विषयांत रमत असे.
चिन्मयला विषयाचे बंधन नव्हते. तो चर्चा, कथा, कादंबरी, लेख, कविता सर्व काही वाचत असे पण केवळ वाचनमात्र राहून. चर्चेत कधी सहभागी होत नसे कि कुठल्या धाग्यावर कधी प्रतिसाद देत नसे.
परवा संध्याकाळी कामावरून घरी आल्यावर अशीच वडा-पाव वरची एक चर्चा वाचताना कोणा लेखकाने अनेक प्रतिसादात आपण काही वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘काल कि खाल’ नामक लेखाची केलेली जाहिरात त्याच्या वाचनात आली. आता हे लेखक महाशय सारखे सांगताहेत कि हे वाचाच तर वाचूया असा विचार करून चिन्मयने त्या लिंकेवर क्लिक करून तो धागा उघडला आणि वाचला, पण एका वाक्याचा अर्थ समजला असेल तर शपथ!
एरवी सर्व धाग्यांवाराचे प्रतिसाद वाचून मग मूळ कंटेंट वाचणारे, युट्युब वर पिक्चर बघतानाही आधी खालच्या कॉमेंट्स वाचून मग तो प्ले करणारे आपण, या वेळी मात्र आपला शिरस्ता मोडून कसे काय आधी कंटेंट कडे वळलो? किती हा घोर अपराध घडला आपल्या हातून! याचे प्रायश्चित्त घेतलेच पाहिजे असा विचार करून त्याने उजव्या हाताने स्वतःच्या उजव्या गालावर एक सणसणीत चपराक हाणून घेतली.
तिरीमिरीत त्याने धाग्यावारचे प्रतिसाद वाचायला घेतले तर त्यातही सगळेच्या सगळे प्रतिसाद नकारात्मकच. काही समजले नसल्याचे, पटले नसल्याचे सांगणारे. पण लेखक मात्र सारखा सगळ्यांना सांगतोय कि पुन्हा वाचा समजेल. तरी नाही समजले तर समजे पर्यंत पुन्हा पुन्हा वाचत रहा. साध्या सोप्या भाषेत तर लिहिलंय तुम्हाला समजलेच पाहिजे.
आता लेखक एवढ्या पोटतिडकीने आणि आत्मविश्वासाने सांगतोय तर त्यात काही तथ्य असावे असा विचार करून चिन्मयने पुन्हा लेख वाचला. पण यावेळी त्याला स्वतःचा राग नाही आला तर लेखकावरच भडकला आणि “अरे हा माणूस डोक्यावर पडलाय का?” असा क्रोधीत प्रश्न त्याने स्वतःलाच मोठ्या आवाजात विचारला.
मागून “आता आमची पडायची वेळ झाली आहे तेव्हा लवकर जेऊन घ्या आणि आम्हाला मोकळे करा” असे चंद्रीकेचे शब्द कानावर पडल्यावर भानावर येऊन त्याने रागाच्या भरात कॉम्पुटर बंद केला व निमुटपणे जेऊन घेतले आणि झोपायला बेडरूम मधे गेला.
अजूनही मनात त्या लेखक वरचा राग धुमसत असल्याने त्याला झोप काही लागेना. त्या भयंकर लेखावर एक खरमरीत प्रतिसाद टंकल्यावर कदाचित आपले मन शांत होईल असा विचार करून चिन्मय पुन्हा उठला आणि कॉम्पुटर चालू केला.
आपली आजपर्यंतची कारकीर्द फार काही उज्वल नसली तरी आपली बुद्धी काही एवढी सुमार दर्जाची नक्कीच नाही कि एखादे लिखाण आपल्याला समजू नये अशा आत्मघातकी विचाराने त्याने पुन्हा एकदा तो लेख आणि त्यावरचे वडा-पाव करांचे प्रतिसाद वाचून काढले.
पुन्हा तो लेखकाचा समजे पर्यंत पुन्हा पुन्हा लेख वाचा असे सांगणारा प्रतिसाद वाचला आणि काळाने डाव साधला व त्याची बुद्धी भ्रष्ट झाली. ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ अजून काय? त्याने मग पुन्हा पुन्हा तो लेख वाचण्याचा सपाटाच लावला.
पाणी प्यायला उठलेल्या चंद्रिकेने चिन्मयला वाचत बसलेला बघून एकदा भिंतीवरच्या घड्याळाकडे नजर टाकली आणि “अहो, पहाटेचे चार वाजलेत अजून काय वाचत बसला आहात, झोपा आता, सकाळी कामावर जायचे नाहीये का आज?” असे कडाडली.
सातत्याने तो लेख वाचून वाचून चिन्मय आता ट्रान्स मधे गेला होता. त्याने स्क्रीनवरून नजर न हटवता “अग चंद्रिके काळ-वेळ ये सब झुठ है, तुमच्या सारख्या बावळट लोकांच्या कल्पना आहेत, त्या गोष्टी वास्तवात नसून तो एक भ्रम आहे.” असे उत्तर तिला दिले आणि त्या अद्भुत लेखाचे पारायण सुरूच ठेवले.
चक्रमपणात त्याच्या पेक्षा तसूभरही कमी नसलेल्या चंद्रिकेने मग “असं काय वाचताय एवढे तल्लीन होऊन ते मलाही वाचायचय” असे म्हणत त्याला खुर्चीतून उठवले आणि स्क्रीनचा ताबा स्वतःकडे घेतला. वाचनसमाधी भंग झाल्याने चिडलेल्या चिन्मयने मग आपल्या मोबाईलवर तो धागा उघडून वाचायला सुरुवात केली.
हल्ली वय झाल्याने जानकी बाईंना उशिरा जाग येत असे. साडे नऊला त्या उठल्या आणि पहातात तर चंद्रिका कॉम्पुटर समोर बसून आणि चिन्मय बेडवर अस्ताव्यस्त झोपलेल्या चंचीच्या शेजारी पडून मोबाईलवर काहीतरी वाचत बसल्याचे दिसले.
जानकी बाईंनी आधी कॅलेंडर बघितले आणि आज रविवार किंवा सुट्टीचा दिवस नसल्याची खातरजमा करून मग “अरे चिन्मय आज तुला ऑफिसला जायचे नाही का? आणि चंची का अजून झोपलाय, त्याला आज शाळा नाही का? चंद्रिका साडेनऊ वाजले पण सकाळचा चहा आणि न्याहारीची अजून काहीच तयारी कशी नाही?” अशी प्रश्नांची त्यांनी सरबत्ती सुरु केली.
त्यावर चिन्मय कडून नाही पण चंद्रीकेकडून आलेल्या “अहो आई ते घड्याळ आणि कॅलेंडर बघणे आजपासून बंद करा! त्यामुळे आपल्यावर वेळेचे, ती पाळण्याचे दडपण येते. दर वेळी किती वाजले हे बघत जगणं सोडा, तुमच्या जगण्यात निवांतपणा येईल, तुमची जाणीव तीव्र होईल त्या पेक्षा झोप आली कि झोपा, जाग आली कि उठा, भूक लागली कि खा मग बघा आपले आयुष्य कसे सुखावह होते ते ! ” अशा उत्तराने त्यांना धक्काच बसला, आणि त्या म्हणाल्या “अग काय बोलत्येस तू हे? डोकं तर ठिकाणावर आहे ना? मला शुगर, ब्लड प्रेशर, दमा असे अनेक आजार आहेत, गोळ्या घ्यायच्या असतात वेळच्या वेळी, रिकाम्यापोटी नाही घेता येत औषधे हे माहित आहे ना तुला? ”
त्यावर आता चिन्मय उत्तरला “अग आई आम्हाला अत्ता भूक नाहीये तुला हवं तर तू खा काहीतरी बनवून.”
जानकी बाईंना दोघांची लक्षणे काही ठीक वाटली नाहीत. त्यांनी नाईलाजाने स्वयंपाकगृहात जाऊन दुध पोहे खाल्ले, औषधे घेतली, मग चहा केल्यावर चंचीला उठवून त्यालाही चहा बिस्किटे खायला घातल्यावर चिंतामग्न अवस्थेत आपल्या खोलीत परतल्या.
दुपारी साडेबाराला त्या पुन्हा आपल्या खोलीतून बाहेर पडल्या तरी चिन्मय आणि चंद्रिका वाचतच होते, चंचीने त्याच्या खेळण्यांचा पसारा खोलीभर मांडला होता. त्याची शाळा आज बुडाली होती आणि चिन्मय कामावर गेला नव्हता. चंद्रिकेने दुपारच्या जेवणाची कोणतीही तयारी केली नव्हती हे पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
गेल्या दहा बारा वर्षात सर्व काही सुरळीत चालू असताना कुठल्या दुष्टाची नजर लागली आपल्या कुटुंबाला याचा विचार करत त्यांनी सगळा स्वयंपाक केला. चंचीला जेऊ घातले, स्वतः जेवल्या आणि थोड्या रागातच चिन्मय आणि चंद्रिकेला म्हणाल्या “जेवण बनवून ठेवलय तुम्हाला भूक लागली कि गिळून घ्य!” त्यावर दोघांकडूनही काही उत्तर न आल्याने त्यांची चिंता अजून वाढली आणि पुन्हा त्या आपल्या खोलीत परतल्या.
नेहमी वेळप्रसंगी मदतीसाठी धावून येणाऱ्या अप्पा राशीनकरांना त्यांनी फोन लावला आणि सर्व हकीकत त्यांना सांगितली. अप्पा तेव्हा बाहेरगावी गेले होते त्यामुळे दोन दिवसांनी परतल्यावर तुमच्या घरी येतो असे सांगून त्यांनी फोन ठेवला.
संध्याकाळी त्यांनी पाहिले तर चंची हॉल मधे टीव्ही वर डोरेमॉन बघत होता तर चिन्मय आणि चंद्रिका त्यांच्या बेडरूम मधे बसून कसलीतरी चर्चा करत होते. जानकी बाईंनी दारा आडून कानोसा घेतला तर त्यांच्या चर्चेतली “हे शरीर म्हणजे मी नाही”, “काल भास आहे”, कालातीत, कालरहितता, कालज्जयी, इटर्निटी, कालशून्यता, विदेहत्व, कालाबाधीत असे शब्द आणि वाक्ये ऐकून या दोघांना कसलीतरी बाहेरची बाधा झाली कि काय या विचाराने त्यांची काळजी अजूनच वाढली.
अप्पा यायला अजून दोन दिवस होते. तो पर्यंत काहीच हालचाल न करणे योग्य नाही असा विचार करून त्या दोघांशी बोलायला धीर एकवटून जानकीबाई आत गेल्या. आणि मोठ्या प्रेमाने त्यांनी दोघांच्या पाठीवर हात फिरवत विचारले “अरे बाळांनो काय झालाय तुम्हाला? का असे वेड्या सारखे वागताय तुम्ही दोघंही आज? आणि हि कसली विचित्र चर्चा करताय तुम्ही?”
चिन्मय आणि चंद्रिकेने एकमेकांकडे पहिले, मग चेहऱ्यावर मंद स्मित आणून चिन्मय म्हणाला “आई, या प्रश्नाचे उत्तर आम्ही नाही देऊ शकत आत्ता तुला. गुरुजींचा तसा आदेश आहे. त्यांनी सांगितलय कि आम्हाला जे पटलंय ते इतरांना लगेच पटवून देण्याचा प्रयत्न करू नका म्हणून.”
हे ऐकून अवाक झालेल्या जानकी बाईंनी त्यावर विचारले “अरे कोण गुरुजी? आणि असं काय पटलंय तुम्हाला? आणि कसला आदेश?” ते काही नाही माझी शप्पथ आहे तुम्हाला. काय प्रकार आहे हा ते मला समजलाच पाहिजे.
पुन्हा चिन्मय आणि चंद्रिकेने एकमेकांकडे पहिले आणि नाईलाज झाल्याचे भाव चेहऱ्यावर आणत चिन्मय उत्तरला “आता तुझा हट्टच आहे तर ये बाहेर आणि तूच वाच गुरुजींचा तो लेख” पण प्रथम तुला तो मनःपूर्वक वाचावा लागेल, मग तो पटला तर आचरणात येईल, आचरणात आणलस तर तुझ्या जन्माचे सार्थक होईल. आणि जानकी बाईंना हात धरून तो कॉम्पुटर समोर घेऊन आला. मग चंचीलाही बोलावून घेतले. चिन्मय कॉम्पुटर सुरु करे पर्यंत चंद्रीकाने देवघरातून उदबत्ती, तुपाचा दिवा, काडेपेटी आणि बाल्कनीतून चार पाच चीनी गुलाबाची फुले तोडून आणली.
चिन्मयने आधी ‘गुरुवीन जगी थोर या अन्य कुणी नसे’ हे भजन लावले मग वडा-पाव वरचा ‘काल कि खाल’ नावाचा तो दिव्य लेख उघडला. चंद्रिकेने आधी स्क्रीन समोर दिवा आणि उदबत्ती लावली. सगळ्यांच्या हातात एक एक फुल दिले. चंची आणि जानकी बाई हताशपणे हा सगळा खुळेपण पहात होते. चिन्मय आणि चंद्रिकेने मनोभावे स्क्रीनला नमस्कार करून फुले वाहिली आणि चंची व जानकी बाईंनाही तसे करावयास सांगितले.
पूजा साग्रसंगीत संपन्न झाल्यावर चिन्मयने जानकी बाईंना खुर्चीवर बसून एकाग्रतेने तो दिव्य लेख वाचायला सांगितले आणि काही समजले नाही तर समजेपर्यंत तो पुन्हा पुन्हा वाचत राहण्याची सूचनाही दिली.
चिन्मय आणि चंद्रिका लेख वाचताना जानकी बाईंच्या चेहऱ्यावरचे भाव टिपण्यासाठी त्यांच्या दोन्ही बाजूंना उभे राहिले तर चंची पुन्हा टीव्ही बघायला हॉल मधे पळाला.
लेख वाचून पूर्ण झाला आणि जानकी बाईंनी अत्यंत क्रोधाने टेबलावरून समोरचा मॉनिटर उचलून खाली जमिनीवर आपटला. अरे कुठल्या वेड्याने लिहिलंय हे? आणि हे लिहिणार्याला तुम्ही गुरु मानला? असे विचारत त्यांनी दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या चिन्मय आणि चंद्रीकाचे कान पिरगळले.
“आई कान सोड”, “आई कान सोडा” अशा वेदनांनी कळवळत चिन्मय आणि चंद्रीकेने फोडलेल्या टाहोने काय झाले ते बघायला चंची टीव्ही समोरून उठून तिथे आला आणि आजीने आई बाबांचे कान पिळलेले पाहून टाळ्या वाजवत मोठ मोठ्याने हसू लागला!
क्रमशः
----------
विशेष सूचना (तीच आपली नेहमीची) - सदर लेखन वाचून खरोखरीच कोणाच्या डोक्याला शॉट लागल्यास लेखकाचा उत्तरदायित्वास नकार लागू :P
टीप: चिन्मय, जानकी बाई, अप्पा राशीनकर, देशपांडे काका उर्फ चॉकलेट काका हि कै. अकू काकांनी निर्माण केलेली पात्रे आहेत. अकू काकांच्या स्मृती जपण्यासाठी त्या काल्पनिक पात्रांचा उपयोग या पुढेही करत राहण्याचा विचार आहे.
आणि हो एक राहीलच: सर्व पात्रे आणि नावे काल्पनिक आहेत. त्यांचा कुठल्याही जिवंत अथवा मृत अथवा पुनर्जन्म झालेल्या व्यक्तींशी संबंध नाही. तरी संबंध अथवा साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.