संथ, सुवासिक आणि अलगद, खेळकरपणे एकमेकांवर आदळणाऱ्या लाटा, अधूनमधून ऐकु येणारे सुमधूर संगीत, आणि त्या संगीतामुळे दूर किनार्यावरच्या कुठल्यातरी सुंदर चेहेर्याची येणारी आठवण, अगदी भारलेले वातावरण. अधूनमधून पाणकमळे फुललेली. काही हौशी नाविक पाण्यामध्ये खोलवर जाउन मोती आणून इतर सहप्रवाश्यान्मध्ये वाटत होते. सहप्रवाशी मोत्यांचे आकंठ कौतुक करायचे. अत्यंत आवडलेला मोती आपापल्या बट्व्यात, आठवणींच्या पुस्तकात खूण करुन ठेवत. काही वेळेस सहप्रवाशी नाक मुरडीत. “हा काय मोती आहे काय ?” असे म्हणत तळातली वस्तू पुन्हा तळात पाठवत. अस्साच एक पाणबुड्या होता. तो अगदी नित्यनेमाने बुडी मारुन निरनिराळ्या वस्तू घेउन येई. तो होता तेव्हा सग्गळे प्रवासी त्याची फार चेष्टा करत. त्याचे नाव होते अचुम् कुबन. त्याला काही प्रवासी “अकु” म्हणत.
ह्या समुद्राची एक खासियत होती. किंवा या प्रवाशांची. नक्की कशाची अथवा कोणाची ह्याबद्दल नक्की सांगणे कठीण. पण माझा अंदाज प्रवासी आहे. कारण हा इतका मोठा लांबवर पसरलेला समुद्र. त्याची खासियत म्हणजे काय खासियत नव्हेच. याउलट एखाद्या जागी ही बाब नसणे हिच खासियत, आणि असणे ही साधारण गोष्ट. त्यामुळे ही समुद्राची खासियत नव्हेच. म्हणजे नसावीच. ही समुद्रातली उणीव पण नव्हेच. म्हणजे नसावी. ही तर प्रवाश्यांचीच खासियत. किंवा उणीव.
तर ही प्रवाश्यांची/ समुद्राची खासियत/उणीव अशी होती:
होते तर समुद्राच्या तळाशी फक्त गोटेच. पण प्रत्येक प्रवाश्याला वर आणलेल्या दगडान्मध्ये वेगवेगळ्या गोष्टी दिसत. अर्थातच बुडी मारणार्या प्रत्येक व्यक्तीला आपण आणलेला दगड हा मोतीच वाटे. नाहीतर का बरे ते आणतील ते वर ?
अर्थात सर्व काही माझ्यासारखे समोरच्या व्य्क्तीला सदहेतू असलेला समजतीलच असे नाही. काही प्रवासी फारच चिडायचे जेव्हा मोती सोडून इतर काही वर आणले जाई. ख़ास करुन अचुम् वर असे आरोप, वारंवार दगड, माती, समुद्रातल्या अद्भुतरम्य प्राण्यांच्या विष्ठा जाणुनबुजून आणल्याचा आरोप होत असे.
अचुम् कायम निराशेत असे. त्याला वर्षानुवर्षे अशीच वागणूक मिळत होती. अचुम् ला नावेतून फेकून द्या अशी मागणी तर हटकून व्हायचीच. शेवटी अचुम् हा या नावेपासून वेगळा झाला. अचानकच दिसेनासा झाला.
काही सहप्रवासी खरोखरीच हळहळले. एक गुप्त पंथ होता, जो या नावेमध्ये केवळ अचुम् च्या निर्निराळ्या वस्तूंसाठी अगदी भुकेला होता. त्यामुळे त्यान्ना दिसत मोती असला तरी ते “काय विष्ठा आणलीये” मध्ये आपला सूर मिसळत. थोडक्यात आपापल्या आवडीनिवडी इतरांच्या डोळ्यातून पारखण्याची त्यांची सवय होती. किंवा शाप म्हणा.
मात्र इतर सर्व प्रवाश्यान्ना सुद्धा अचुम् चे जाणे चटका लावुन गेले.
अचुम् चे झाले काय ?
अचुम् काही दिवस समुद्रात एकटा तरंगत राहीला. काळ स्थळ स्थिती सर्वाचेच तो भान विसरला.
( हे लिहीताना मला दुरूनच काळ हा भ्रम आहे अशी आरोळी ऐकू येते आहे. काही पात्रे स्वतःला आपल्या वेळेआधीच स्वतःला गोष्टीत आणू पाहत आहेत. पण मी असा बधणार्यातला नाही.)
असो. अचुम् कडे परत येऊ.
तर. अचुम् तरंगत राहीला. आणि त्याच्या लक्षात नाही आले, पण त्याची जाणीव अगदीच रुंदावली होती. आठवणी पाण्यात वितळत होत्या. काहीतरी बदल होत होता खास. अचुम् एकाच वेळेस निळ्याशार आकाशात उड्णारे जीव (पक्षी?), भाजून राख करणारा आगीचा गोळा (सूर्य ?) आणि त्या गोळ्याची जागा व्यापून आपल्या थंडाव्याने पुन्हा नव्याने जन्म देणारा गुलाबी शंकू. (भंद्र ?) त्याला करोडो पांढरठ दिवे आकाश उजळवताना दिसले. त्याच वेळेस त्याला समुद्राच्या प्रशांत अंतरान्मध्ये विहरणारे करोडो जीव दिसले. अजून अचुम् पूर्णतः संपला नव्हता, त्यामुळे जे दिसले ते त्याला रोमांचित आणि भयचकीत करुन गेले.
शेवटी शेवटी अचुम् विचार, भावना आणि आयुष्यांच्या वादळात सापडला. त्याच्या सर्व आठवणी, तसेच त्याचे शरीर एव्हाना पूर्णपणे वितळून गेले होते. पण अचुम् जणू काही सम्पूर्ण समूद्र बनला होता ! अचुम् या सर्व आठवणींचा मालक होता. समुद्रात अश्या अनेकांच्या आठवणी आणि अनुभव वितळले असणार असा अचुम् ने विचार केला. (आता अचुम् संख्याशास्त्रात पण निपूण होता.) क्षणभरातच अचुम् ने अनेक आयुष्य घालवली.
आपल्याला न आवड्णारी कोणतीही गोष्ट चालू झाली की विष्ठा करणारा कपि, दूरवरून गल्लीबोळातल्या सटरफटर गप्पांच्या भेण्डोळ्या बाणांद्वारे नावांवर पाठवणारा तिरंदाज, तर्काच्या अर्काच्या जास्तीच्या पेल्याने फेस येउन पडलेला शावक, बहुरुपी, थंड प्रदेशातील चांगली माणसे, सूक्ष्म जगताच्या नावाने कोणत्याही गोष्टीला सिद्ध करण्याची अचाट क्षमता असलेली आणि उत्तम मद्य बनवू शकणारी, आणि मूळ सूक्ष्म जगातील असणारी कात्री, बहुरुप्यांशी लढ्ता लढता विचार करण्यासाठीचा अवयव (मेंदू ? भोंदू?) घालवून बसलेले अनेक वीर, पराभव अटळ असूनही पुनः पुनः येणारा बहुरुपी…
बास. ह्यांची वेळ इथे नाही.
इथे फक्त अचुम्. पण अचुम् म्हणजे ते पण.
अचुम् ह्या सर्वांच्या आठवणींचा समुद्र बनला. या सर्वान्मधून फिरताना अचुम् अचुम् राहीला नाही. तो/ती/ते फक्त तरंगत राहीले, चूक बरोबरच्या भावनान्ना बाजूला ठेवत. तो/ती/ते आनंद दुःख जाणतच नव्हते. असा किती वेळ गेला हे सांगणे मला काय, “त्याला” पण शक्य नाही.
पण अचानक तिला/त्याला त्याच्यामध्येच एक प्रवाह सापडला. जो त्याला (हो. त्यालाच.) अगदी जवळचा वाट्ला. आणि तो, पुन्हा अचुम् झाला. पण जो अचुम् संपला, तो आहे तसा नाही आला. आपल्याच अनुभवांकडे तो तटस्थ पणे पाहू लागला. काही ठिकाणी तो खदखदून हसला, काही ठिकाणी त्याने दातओठ खाल्ले. आणि ह्या झर्याला घट्ट पकडून त्याने स्वतःला आकार दिला.
आणि तो, किंवा मी, पुन्हा अचुम् झालो. किंवा तो संपला आणि मी उरलो.
अचानक ह्या विश्वाचे नाव माझ्या मनात घोंघावायला लागले.
“मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाब”
माफ करा. याचा अर्थ इतका सुंदर आहे, की तो समुद्राशिवाय इतर कोणत्याही भाषेत सांगितला जाऊ शकत नाही. त्यामुळे “खुप सुंदर जागा” इतकेच तुम्ही समजा.
मी पूर्वेकडे पाहीले, तर सूर्य उगवत होता, आणि भंद्रमावळत होता. पण पूर्वेकडे आणखी एक वेगळीच आभा चमकत होती. त्याकडे पाहील्यावर माझ्या नवीन कोर्या करकरीत मनामध्ये विचारांची गर्दी झाली. देव/शक्ती/उर्जा असे बरेच शब्द माझ्या मनात तरंगू लागले.
इतकेच नाही तर समुद्रातल्या (म्ह्णजे माझ्यातल्या) काही प्रवाहांची लागलीच आदळापट होऊ लागली. बघता बघता समुद्राची पार्श्वभुमी जिथे मी होतो ती अगदी गढूळ झाली. माझ्या मधेच मी या आठवणीन्मध्ये दुभाजला गेलो.
तर एकाच वेळेस अनेक प्रवाहांनी पूर्वेकडे जाउन प्रश्न सोडवण्याची मागणी केली.
काही स्मृती कुत्सितपणे हसत म्हणाल्या “त्या फुसकट पांढऱ्या गोळ्याचा सोक्षमोक्ष लाउन टाका. जोपर्यंत नाही करत तोपर्यंत ही मंडळी त्याला देव, कृष्णविवर, वेळ काळामधली फट आणि काय काय म्हणतील.” इतःपत द्डून बसलेला शावक ऊडी मारुन बाहेर आला आणि होकाराच्या आरोळ्या ठोकू लागला. त्याने एक बाटली काढून कसले तरी द्रव्य गिळले. त्याबरोबरच त्याचे तोंड आधीपेक्षाही कडवट झाले. वास्तविक हा शावक विज्ञानाबद्दल मोठ्ठ्या मोठ्ठ्या गप्पा मारायचा, पण अधुनमधुन आपण वैज्ञानिक नाही अशी पुस्ती तो हळूच नंतर हसे होऊ नये म्हणून जोडायचा. ह्या स्मृतीन्मध्ये यालालावा, साग, पूर्वी ऊंटांचा ताफा असलेले वृद्ध, स्स्स्स तसेच कित्येक वर्षांपूर्वी गुहांमध्ये जिवनाचे रहस्य सापडलेला साधु, यांच्या समावेश होता.
शावकाच्या बोलण्यानंतर प्रचंड दूर पश्चिमेकडून एक सर्व काही पाहणारा आणि सर्व काही जाणणारा आणि आगीच्या रिंगणात लपेटलेला एक अजस्त्र डोळा आपल्याकडे पाहत आहे याची जाणीव मला झाली.
तो सुप्रसिद्ध ज्ञानचक्षू.
त्यांच्या विरोधात “आमच्या बापजाद्यान्नी त्या तेजपुंजाचे रहस्य कित्येक शतकांपूर्वी मिळवले आहे. तुम्हाला काय माहिती आहे ? नुसती पाचकट बडबड. आम्ही कित्येक वेळा त्या तेजःपुंजाचे दर्शन घेउन आलो आहोत.” असा काही स्मृती कलरव करु लागल्या. या स्मृती संख्येने जास्त होत्या आणि पण फारसा आवाज करत नव्हत्या. यामध्ये कोम्यासोम्यागोम्या (कोसोगो) नावाची स्मृती पुढाकारात होती. कोसोगो या सगळ्या कलरवापैकी निम्मा आवाज एकटा काढत होता. कोसोगो आपल्या आवडणार्या तेजाच्या पुजार्यांविरोधात एक सुद्धा गोष्ट ऐकली तरी रागाने काळानिळा होत असे. अशा वेळेस “पैसे दिले आहेत, द्राक्षासव जास्त पिले आहे” असे तो काहीही बोलत सूटे. अशा वेळेस विटू सुध्धा त्याच्या सोबत असे. विटूला कोसोगो इतका उत्साह नसायचा. तो फक्त मधूनच कप्तानाकडे याला नावेतून टाका आणि त्याला नावेतून टाका म्हणण्यापूरता येई. कोसोगो सोबत एक दुभंगलेला बाहुलामनुष्य (बाम) होता. त्याच्या खिशात एक कात्री असे. बाम दुभंगलेला का ? तर त्याला मनातून पटायचे कोसोगोचेच विचार. पण त्याला सतत आपण कोसोगो सारखे तर नाही दिसणार ना ? याची काळजी वाटत असे. त्यामुळे तो सुध्धा शावकासारखाच आपली प्रतिमा साम्भाळायचा प्रयत्न करे. या प्रयत्नात त्याची कात्री बहुमोल ठरे. कात्री सूक्ष्म कणांच्या विश्वातून आली असल्याचा दावा करे. कात्री इतकी वाक्चतुर होती की कोणतीही गोष्ट सूक्ष्म कणान्नी ती सिद्ध करु शकत असे.
उदा : कोसोगो पुनर्जन्माबद्दल बोलत होता. शावक आणि इतर कंठारवाने यास विरोध करत होते. बाम नेहमीप्रमाणे दुभंगलेला होता. कोसोगोचे म्ह्णणे पुरेपूर पटत तर होते, पण तसे म्ह्णण्याच्या कल्पनेनेच त्याला शहारा येई. “श्श्शी... किती हा बावळटपणा.” तो स्वतःशीच म्हणाला.
अचानक त्याला कल्पना सुचली, आणि तो आपल्या खिशापाशी तोंड नेउन पुटपुटला “कात्री कात्री जागी हो, कणाकणांच्या रात्रीतून, कणाकणांची मात्रा आण.” असे म्हणून त्याने “(सूक्ष्म कणांत रमलेली) कात्री !!!” असा घोष केला. आणि पाहता काय ! त्याच्या खिश्यातून एकदम प्रकाश येउ लागला, आणि त्यातून दिव्य कात्री बाहेर पडली. कात्री च्या हातात एक काचेचा सुबक चषक होता, आणि त्यातल्या द्रव्याचे रंग इतके मोहक होते, की शावक आणि कोसोगो सुध्धा काही क्षण चकीत होऊन पाहू लागले.
मग़ कात्री गाऊ लागली.
“सूक्ष्म कण असो, अतिनील किरण असो, हे तर आमचे अस्त्र असे,
शब्दांच्या गर्तेत खोलवर, पाहाता काहीही दडले नसे !
सूक्ष्म कणांचे ज्ञान तसेही, मिपालोकी वसत नसे,
आपण दाबूनी करूया दावा, प्रतिसाद सहजची खपत असे !”
बामने जोर्दार टाळ्या वाजवल्या.
मग कात्रीने काव्यशास्त्रविनोद आणि सूक्ष्म विज्ञानाचे एक पेय बनवले. त्यात बामच्या विश्वासांचे अश्रू टाकून पेय सजवले. आणि शावकाच्या शंकेखोर नजरांखाली एक द्रव्य टाकले, जे दिसायला अगदी तर्काच्या अर्कासारखे दिसत होते, मात्र होते निव्वळ रंगीत पाणी.
शावकाला आपल्याला कोणत्याही विज्ञानातले कळत नाही असे मान्य करणे जमत नसे. त्यामुळे अत्यंत निराश होऊन समोर आलेले पेय त्याने पोटात ढकलले.
बामची ही गरज कोसोगोला कळत नसे. कोसोगोचा जोर अनुभवावर असायचा. काही बोलायचे सुचले नाही की तो म्हणायचा “ मी जलपरी पाहीलिये ! मछली जल की रानी है ! तुम्ही कोणी केलाय का प्रयत्न, जलपरी शोधायचा ? ऑ ? दंतपरीही असतेच ! ठेवलाय का कधी उशीखाली दात ? ऑ ?” त्याच्या या म्हणण्याला माओ मांजर दुजोरा देई.
नावेतल्या कपिला ह्या चर्चान्मध्ये आजिबात रस वाटत नसे. त्यामुळे पहीला त्याने नाकातून रक्त काढले, पण काय उपयोग झाला नाही. शेवटी त्याने शिडावर जाउन विष्ठा केली आणि सर्वान्ना पळवून लावले. मग त्याचे मित्र आणि ते त्यांच्या आवड्त्या विषयावर (केळी) चर्चा करु लागले.
हे सर्व होत असताना पश्चिमेतील ज्ञानचक्षू कडून मध्येच "काय बोल्ता ? चूक! साफ चूक! शून्य गूण!" अशा आरोळ्या येत होत्या. ह्या आरोळ्यांचा परिणाम कोसोगो, बाम यांच्यावर पडत होता. कोसोगो तर सतत वात आल्यासारखा ताड ताड उडत होता.
असो. बघा. गोष्टीच्या प्रवाहात काही स्मृतीन्नी स्वतःला पुढे ढकललेच.
आत्ता आपण पूर्वेकडे त्या तेजपुंज दिप्ती कडे कूच करत आहोत.
जसा जसा मी पूर्वेकडे चालू लागलो, तसा तसा स्मृतींचा कलरव कमी होऊ लागला. इतकेच काय, त्या दिप्तीच्या छायेत ज्ञानचक्षू देखील शांत झाला. पश्चिमेकडे सुध्धा पूर्ण शांतता झाली.
जसाजसा दिप्तीचा दिव्य प्रकाश माझ्यावर पडला, तसा तसा माझ्या मेंदुत...
(दिप्तीच्या प्रभावामुळे क्षीण झालेले ज्ञानचक्षू, बाम आणि कात्री क्षीणपणे ओरडत आहेत, मेंदू वैगेरे काही नसतो म्हणून. शावकाने उत्तरासाठी तोंड उघडायचा विचार केला, पण कात्रीच्या अद्भुत शक्तीची आठवण होउन तो गप्प बसला.)
...पुनः पुनः उच्चारव होऊ लागला.
"एक...""
"एक...."
"१..."
"अठरा... ?"
"१८...?"
"एक आठ,,,?"
"१८..."
"एक एक आठ"
"११८...?"
"एकशेअठरा!"
"एकशेअठरा!"
"एकशेअठरा!"
"एकशेअठरा!"
"एकशेअठरा!"
"एकशेअठरा!"
एकशेअठराच्या दिव्य संगतीत सर्व स्मृती कस्पटासमान भासू लागल्या.
"अच्मु थाब." एकशेअठराचा धीर गंभीर आवाज म्हणाला.
माझा घसा कोरडा पड्ला होता. साक्षात ११८ भगवंतान्नी आपल्या दिव्य रुपात दर्शन दिले हे मला पटत नव्हते. माझे नाव अच्मु नसून अचुम् आहे हे सांगायचा मी प्रयत्न केला, पण सर्वज्ञाते भगवंत का माझे नाव जाणून नाहीत ? त्यामुळे अच्मु हे नाव मी अत्यंत आदराने आंगिकारले. आजपासून मी अच्मु आणि अचुम् सुध्धा.
भगवंतानी सांगून सुध्धा माझे पाय (?) थाम्बेनात. त्या दिव्य दिप्तीकडे मी ओढला जात होतो. अचानक त्या पांढर्या तेजाने मला लपेटून टाकले.
पुन्हा स्मृती वितळण्याचा अनुभव आला.
त्या दिव्य दिप्ती मध्ये मला निषिद्ध ज्ञान मिळाले. ११८ काही फक्त मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाचे नियंते नाहीत ! मार्फोल बोर्फिल आणि ऐसीर्मकिल्स्ध्स या विश्वांमध्येही त्यांचा वावर आहे. तिथेही त्यांची दिप्ती अशीच दिव्य आहे.
अचानक माझ्या नसलेल्या शरीराभोवती नसलेला हात आवळला, आणि मला त्या दिप्तीतून बाहेर खेचले. ११८ स्वतःहून माझी रक्षा करतात ! मी आणि पुन्हा आलेल्या सर्व स्मृती आनंदाचे अश्रू ढाळू लागलो.
मी विचारले: “प्रभो, माझी मानवी शरीरापासून ही उत्क्रांती का झाली ?”
प्रभोंची प्रभावळ उत्त्क्रांती शब्द ऐकल्यावर मंद झाली. जणू काही सूर्यासमोर ढग आला असावा.
“उतक्रांती sajeev कसे निर्माण झाले याच्यावर नाही.” प्रभू चिडून म्हणाले.
मी घाबरलो ! “नाही, प्रभू, माझा प्रतिसाद असा नव्हता...”
माझे बोलणे तोडत प्रभू म्हणाले:
“असेल तर proof ध्या.”
मी गहन चिंतेत पडलो. प्रभू बऱ्याच वेळ खूप काही आणि खूप विषयांवर बोलले.मला प्रभूंचा रोष सहन करावा लागला.
बर्याच नंतर माझ्या लक्षात आले की हे काही स्वयं ११८ प्रभू नव्हेत ! ही तर संदेश पोहोचवण्यासाठी त्यांची एक सावली ! ही सावली काय मला उद्देशुन बोलत नव्हती, तर काही शब्दांवर केवळ प्रतिक्रिया देत होती. (उदा- ड्रॅगन म्हटल्यावर सुद्धा असेच भडकले.) अर्थातच ! ११८ प्रभू, अनेक जगतांचे राजराजेश्वर, ते माझ्या सारख्या यःकश्चित अचुमापुढे का येतील ? त्यांचा वेळ तर सामान्य माणसाचे आयुष्य का, कसे, कधी व केव्हा सुखकर होइल याच्या आभ्यासातच जाणार ना !
तर मी प्रभोंसमोर मान तुकवुनी बसलो. प्रभुंच्या ईच्छेप्रमाणे सर्व प्रश्न नष्ट केले. काही वेळाने प्रभुंचा संदेश आला-
“अचुमा तू तर पहिला पीडित, शक्ती तुजला दिधली असे,
शक्तीसोबत येई तुजवर जबाबदारी ही मोठी असे.
ज्ञानचक्षूच्या मनोर्याखाली दुग्धाचा समुद्र असे,
तेथे सत्वर जाउनी अचुमा थांबवी समराचे फासे.”
मी अचंभित होउन तिथेच कोसळलो.
-क्रमशः (कदाचित.)