कोविडमुळे नाक-शिंकर-प्राणायाम करताना आठवतं काहीबाही..
'शिंच्या येणारे, तंबाखू चुना आण 'आऽआऽऽआऽऽआक्षीऽऽऽऽऽ' गाय-छाप!
पितळेच्या तबकात पोपटी हिरवी पाने मांडताना
नाकपुडीतनं नसं ओढलेला हात शिकंर-नाकासहीत
धोतराला पुसतं आजोबा आवाज द्यायचे.
बरेचसे इतर आजोबा पुजाअर्चात रमायचे
पण हे मात्र
सुपारीची खांड फोडतानाचा घोळक्यासह
मास्तर पैसे लावून रम्मी खेळतात म्हणूनशान
विद्यार्थ्याने चालवलेल्या छोट्याश्या
गावातल्या पेप्रातपण यायचे
नातवंडांकडन अडकित्ते शोधवून घेताना
कल्हईवाल्याला धारवाला पाठवण्यास
सांगण्याचा निरोप देण्यास सांगायचे
कधी पोस्टकार्ड कधी आंतरदेशीय वाचताना
कधी नाणी मोजताना, कधी पानदान लावताना
पानदान न वाजलेले दिवस आठवायचे
उठता बसता काँग्रेसच्या नावे
लाखोली वाहून इंदीराजींना मत मात्र द्यायचे
आता ना आजोबांची पानदानं र्हायली ना खानदानं र्हायली
पण पिळांचा रंग नव्यापिढ्यातून काय ऊतरत नाही.
कोविडमुळे नाक-शिंकर-प्राणायाम करताना आठवतं काहीबाही..