( प्राचीताई माफ करशील ना ग? )
जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना,
आणि तुला नाक्यावरच्या वडापावची खूप खूप आठवण येईल ना
आणि तेव्हा जेव्हा मी बटाटेवड्याची रेसिपी पहात असेन
तू म्हणशील, "अवघड आहे! या जन्मी मिळतील का?"
मी तुझ्याकडे एक लुक देईन अन् मग बटाट्यांना कोंबेन कुकरमधे.
"अगं, शिट्टी!"
मी मग चिडून शिट्टी लावेन.
"जमलं!", तू म्हणशील.
मग मात्र मला रहावणार नाही.
मी तुझा फरसाणाच्या डब्यातला हात काढून घेईन,
कुकरजवळ नेईन.
तू घाबरशील..म्हणशील, हात भाजतील
मी म्हणेन भाजू देत.
शिट्ट्या होतीलच कुकरला.
झाकण काढेन, अशी अख्खी झुकून मी कुकरची वाफ घ्यायला बघेन.
तेवढंच स्टीम क्लिनिंग..
मान वर करून तुझ्याकडे पाहीन.
पाणी टाकायला विसरल्याने झालेला बटाट्याचा कोळसा, आता कसे वडे करू?
तू आता कुकर कसा घासायचा या चिंतेत असशील
मी हसून पुन्हा मोबाईलमध्ये नवी रेसिपी बघायला सुरू करेन,आत्मविश्वासाने
इझी, बिगीनर असे किवर्ड टाकेन
बघेन सोपं काही सापडतंय का
आणि मग...
.....
पण जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना,
तेव्हा तुला अरबट चरबट खावंसं वाटेल ना,
सिंकमधली भांडी आठवून तुझी भूक मरेल ना?????