पेरणा अर्थातच
(जरी विडंबन म्हणून लिहिले असले तरी जवळून अनुभवलेली सत्य परिस्थिती )
मुलगी घरी जायला निघते तेव्हा,
प्रवासासाठी म्हणून आईने केलेले पराठे सगळेच्या सगळे घेउन जाते,..... चुकून.
फ्रिजसुध्दा झाडून पुसून केलेला असतो.. अगदी रीकामा
आठवड्याची भाजी, मसाले, लोणची..
बाबांकडून खोवून घेतलेलं खोबरं, सोललेला लसूण..
डब्बा भर तिखट पु-या, चकली अन लाडू..
तुझ्या हातचे लाडू याला फार आवडतात असे म्हणून केलेले
दाण्याचं कूट, जीरेपूड, धणेपूड..
कधी ब्यागेत भरते कोण जाणे!
विस्कटून ठेवलेला असतो बेड.
उशांचे अभ्रे, अंथरूण पांघरूण मग मी टाकते धुवायच्या कपड्यात,
कपाटात तेवढा शिल्लक असतो डोकेदुखीचा बाम,
डायबेटीसच्या गोळ्यांची पाकिटं.
ड्रॉवरमधला पर्फ्युम, क्रीम वगैरे
" हे मी घेते ग.... तुला काय करायचंय?" असे म्हणत ब्यागेत गेलेले असते
मागे उरतात नातींची नावं लिहून ठेवलेली रिकामी पाकिटं.... कपाटा खाली सरकवलेली
अन हमखास विसरलेली टेलर ची शिलाई ..
मला आठवतात तिने फोनवरुन नवऱ्याशी उगाच घातलेले वाद
आणि मग त्याचा आमच्यावर काढलेला राग
तिचा चढलेला आवाज
अन् उगाच त्याला केलेली दमदाटी .
निघताना सामान ठेवायच्या गडबडीत राहिलेच की असे म्हणता सोयीस्कर न केलेला नमस्कार, मिठी..
हुश्य गेली एकदाची असे म्हणत मी जरा पडते तेवढ्यात फोन वाजतोच,
पोचले सांगायला नाही काही...
तर "ती नवी पैठणी पॉलिश करून दुकानदार घरी आणून देईल मी त्याला थोडे पैसे दिले होते बाकीचे दे आणि पैठणी कुरीयरने इकडे पाठवून दे मला गणपतीत घालायला हवी आहे...." हे सांगायला...
मुलगी घरी जायला निघते आणि मी एकदाची मोकळी होते..
(निर्भीड सत्यवादी ) पैजारबुवा,