साहित्य :- जी मिळतील ती सर्व फळे , साखर , टिकवण्यासाठी सायट्रिक ऍसिड(पावडर) पाव चमचा, रंग व इसेन्स हवे असल्यास.
सगळी फळे स्वच्छ धुऊन लोणच्याला कैरीच्या करतो त्या आकारात फोडी करून घ्यावी. (मी 3चिक्कू, 3सफरचंद,4केळी,अर्धे टरबूज,पाव अननस,1पपई,2आंबे अशी फळे घेतली.)
जाड बुडाच्या पातेल्यात थोडे पाणी घेऊन सगळ्या फळफोडी त्यात टाकाव्या मंद ते मध्यम आचेवर गॅसवर झाकण टाकून शिजवून घ्याव्या. (साधारण 10 ते 15 मिनिटे)
मग फोडी डावेनी वरूनच दाबून पहाव्या. बटाटा शिजतो त्यापेक्षा थोड्या जास्त शिजल्या , मऊ झाल्या की नन्तर पाणी पूर्ण आटेपर्यंत मंद गॅसवर मिश्रण ढवळत राहावे. आटल्यानन्तर थंड होऊ द्यावे.
हे थंड मिश्रण मिक्सर/ब्लेंडर वर बारीक फिरवून घ्यावे. नन्तर पिठाची चाळणी एका मोकळ्या पातेल्यावर सेट करून बसवून घ्यावी. त्यावर हे फिरवून घेतलेले मिश्रण/पल्प थोडे थोडे घालून हाताने हलका दाब टाकत मळत रहावे. सर्व असेच करून मळून घ्यावे.वरती चाळणीला नाममात्र चोथा उरेल व वस्त्रगाळ पल्प खाली पातेल्यात येईल. हे मिश्रण पुन्हा जाड बुडाच्या पातेल्यात घ्यावे. जेव्हढे मिश्रण असेल तेव्हढीच साखर घालावी. व पातेले पुन्हा मंद आचेवर 10 मिनिटे गॅसवर चढवावे. थोडे गरम झाल्यावर सायट्रिक ऍसिड घालावे. रंग व इसेन्स हवे असल्यास घालावे. (मी वापरलेले नाहीत.)
डावेने मिश्रण पातेल्यात वरून खाली सोडावे. धार लागायची बंद झाली(म्हणजेच अधणाच्या पिठल्यासारखे थबथबित झाले)की गॅस बंद करावा.
दुसरीकडे लगेच एका पातेल्यात जॅम ठेवायची काचेची बरणी ठेऊन कडेने थंडगार पाणी घालून ठेवावे. व सगळा जॅम पातेल्यातून हळूहळू बरणीत सोडावा.
5 मिनिटांनी(च) बरणीचे झाकण लावावे. पुन्हा पातेल्यात पाण्यात 6/7 बर्फ खडे टाकावे. आणि पुढे 1 तासानी बरणी बाहेर काढून घ्यावी. हवी तर परत फ्रिजमध्येही ठेवता येईल.
हा जॅम बाजारू जॅम पेक्षा कित्येक पट चवीत व शुद्धतेत दर्जेदार असतो. महाग स्वस्त चा विचार केला तर स्वस्तातच बसतो. कारण बाजारू मिक्स फ्रुट जॅम करताना त्यात केळे चिक्कू पपई ह्याचाच मारा जास्त असतो.त्यातही केळीच जास्त असतात.बाकी फळं जवळपास नसतातच! रंग व इ-सेन्स वर सगळा खेळ होतो.
इसिलीये-घर मे बनाओ और बेहेतर खाओ! ..
---------–-----------------------------------------------------------------–-----------------------–-------------
मिश्रफलमधु हे आम्ही मिक्सफ्रुटजॅम ला दिलेले मायबोलीरुप आहे.
मनी प्रसवले l म्हणून दिधलेll
कैसे वाटले? ते कथावेl मम आत्म्याला जनहो!||
जय हिंद,जय को-रोना?
फिर मिलेंगे.