खालील फोटो पाहून सुचलेली कविता:
फोटो सौजन्य: फेसबूक पेज ऑफ ALDM Photography, Pune
ढासळला वाडा
ढासळला वाडा, पडक्या झाल्या भिंती
उगवल्या बाभळी त्यातून काटेच पडती
सरकले वासे, खिडक्यांनी जागा सोडल्या
दरवाजे करकरूनी, कड्या कोयंड्या तुटल्या
टणक होते जूनेर लाकूड, उन वारा पाऊस खाऊन
भुगा केव्हाच झाला त्यांचा, अंगी खांदी वाळवी लेवून
भक्कम चिर्या दगडांची ढिसळली छाती
लेपलेल्या चूना पत्थरांची झडली माती
पक्षी उडाले, गडी माणसे गोतावळा गेला
कुबट भयाण गूढ अंधार काळा उरला
जुन्या पिढीने भोगले, जूनेच वैभव लयास गेले
नव्या पिढीच्या खांद्यावर बळजबरी ओझे आले
- पाषाणभेद