कोण जमूरा कोण मदारी
तीन पायांची शर्यत न्यारी
कोण जमूरा कोण मदारी
बुद्धिबळाच्या या पटावर
इथे नांदते घराणेशाही
लोकशाही टांगून खुंटीवर
प्रजेस बोलायची चोरी
लोण्यावरती ठेवूनि डोळा
इमानाच्या खोट्या शपथा
सरड्यासंही वाटावा हेवा
वजीराची तर बातचं न्यारी
हत्ती, घोडे आणि उंटही
फिरता वारे चाल बदलती
मोह-मायेचे हे पुजारी
कसली निष्ठा अन कसली भक्ती
प्याद्यांची पण कथा निराळी
निसुगपणाची दाट काजळी
'संकटाच्या' तव्यावर देखील
शेकती स्वार्थाची पोळी
कोरड्या घोषणा भाबडी आशा
प्रजा बिचारी केविलवाणी
सावळ्यासंही गहिवर येई
सावळा गोंधळ दरबारी
स्वतःभोवती गिरक्या घेत
राजा सांगे प्रजेस कहाणी
'मी', 'माझे', 'पूर्वज माझे' अन कर्तृत्व तयांचे..
.............
रुळांची उशी... खडीचे अंथरूण...
दाटले आभाळ... पापण्यांवर पाणी
तीन पायांची शर्यत न्यारी
कोण जमूरा कोण मदारी