बापजन्म!
काल पाहिला मी एक
बाप जन्मताना
O.T. बाहेर
अस्वस्थ घुटमळताना
होणाऱ्या चिमुकल्या जिवासाठी
तिळ तिळ तुटताना
कोण म्हणतं
कि मातृत्वाच्या वेदना
फक्त आईलाच होतात
बापालाही होतच
असतात.. पण त्या
त्यालाच व्यक्त
करायच्या नसतात
लागताच पिलाच्या
येण्याची ती चाहुल
बापाचे डोळेसुद्धा
अश्रुमय होतात
पण जगाला खंबीर
आहे दाखविण्यासाठी
पापणीतच दडतात
आई-पिलु सुखरुप
आहेत; आता
एवढंच ऐकायला
त्याचे कान तरसतात
आणि डोळ्यांना वेध मात्र
त्या जिवाचे लागतात
पिलाला कुशीत घेताना
त्यालाही त्यांचा
नऊ मासांचा
तो प्रवास आठवतो
कोण रे होत लबाड
अस खोट खोट दटावुन
भाळावर अलगद
ओठ टेकवतौ
नंतर मी खंबीर आहे.
असं जणु
स्वतःलाच बजावत
"फोन आलाय"
बहाण्यान रुमबाहेर
जातो ; अन्
पापणीतला तो एक
उनाड अश्रु
त्याच्या नकळत
रुमालाने टिपतो!
(Dipti Bhagat)