ढिश्श-क्लेमर:-आम्मी भटजी असलो,तरी सदर लेखण हे प्रत्यक्ष वास्तविक तथा वास्तवावर आधारीत नसूण केवळ काल्पनिक मणोरंजणात्मक या प्रकारातले आहे. ते तितक्यानेच-घ्यावे! ,अशी विणम्र विनंती.
------------–---–---------------------------------------------------------------------
(*पौरोहित्य कामात क्लायंटला यजमान म्हणतात व त्याच्या बायकोस यजमानीण)
यज-मानीण:- गुरुजी,पोह्यांवर दही वाढू?
मी:-वाढा!
वाढलं ते तरी किती?तर चांगल्या* मेसमधे वरणभातावर (ग्राहक हक्क संरक्षण कायद्या अंतर्गत)जेव्हढी तुपाची रेघ-ओढतात ना, तेव्हढच! (*पुणेरी मेस मधे साधी,चांगली आणि वाईट मेस,असे मेसचे तीन फेस असतात!)
अजून वाढा, म्हटलं तर अजून एक केली 'सही' !
मग मी मनात म्हटलं, जेव्हढ दही,तेव्हढीच सही! छोटं पेन,छोटी वही! ह्ही ह्ही ही!
जरा वेळानी अजून पोहे येत नैत, तर तीच यजमानीण तशीच येते.
यज-मानीण:- गुर्जी,लोणचं!?
मी:- कोणचं!?
य:-हळदीचं
मी:- वाढा
परत तसच वाढलं..थोड्डस्स्स्!!! लहान मुलांना लंगोटात शी होते...तितकंच!
श्शी!!!
किती तो आखडता हात! दुष्ट दुष्ट!
नन्तर चहा आला. भांड्यातून ! मंजे प्राचीन पुणेरी मराठीत ज्याला फुलपात्र म्हणतात ,त्यात!
ते भांडही साधारण आत 1 लिंबू अंग टाकून बसेल ,एव्हढच होतं! खाली छोटीशी बशी..ती ही श्टीलचीच!
मी न राहावून विचारलं मग, गुरुजींना उपहार वग्रे द्यायच्या 'सेट' मधली आहे का ही पेला बशी!?
य:-हहह्हहह (हे हसणं आहे बरं त्यांचं!अगदी मोजून!) आमचा नातू आहे ना छोटासा,त्याची ही!
मी:- काय?
य:-पेला बशी.
मी:- अशी अशी...
य:- अंSssssssssss?
मी:-ते हे... असं असं.., असं म्हणायचंय मला.
य:- तुम्हाला कमी-पडला का चहा? अजून देते(हवं तर!) ,चांगला तांब्याभर केलाय.
मी:- स्नान झालय माझं..
य:- काSssय|!???
मी:- अहो वाक्य पूर्ण होऊ देत की,स्नान झालय माझं,तेंव्हा घेतलाय सकाळी खूप. त्यामुळे आता परत नको (अजून!). वाक्य पूर्ण!
य:- बर बर! आता दक्षिणा काढते. (?)
मी:- (मनात:- कुठून!!!?) उघड:- हो..हो..काढा काढा.
ती यजमानीण परत येइपर्यंत आलेला विचार. "सांगायला पाहिजे होती आधीच!म्हटलंय आता काढा..काढा..,इतकी येईल की त्यात एक पित्तनाशक काढा'च काढून होईल.
य:- ही घ्या.
मी:- द्या!
य:-अहो ते दक्षिणा-घेतानाचा मन्त्र म्हणा की!
मी:-किती आहे?
य:-का???
मी:-मन्त्र शं-भरच्या पटीत असतो.
य:- कुठल्या पट्टीत!?
मी:- पट्टीत नै,पटीत पटीत!
य:- 500/-
मी:- (मनात:-चला ,मिनिमम मीटर पडला ,असे म्हणत) बरोबर. द्या... "हिरण्य गर्भ गर्भस्थम्..." दक्षिणा घेऊन आम्ही जायला उठतो,तोच यज-मानीण:- या हो परत(बोलावल्यावर!)
मी(मनात:-वाट बघा!) उघड:- तर तर...येणारच!
===========
आत्म्याच्या आठवणी..या-आगाऊ-ग्रँथातून साभार!