मुरारबाजी म्हटलं की डोळ्यांपुढे न चुकता उभी राहते ती पुरंदरची लढाई. त्रिवार मुजरा अगदी सहज घेते - ती प्रयत्नांची पराकाष्ठा, अतुलनीय शौर्य आणि न खचणारी, कुठलीही भीड-मुर्वत न मानणारी अभेद्य हिंमत.. मुरारबाजींची आणि त्यांच्यासोबत, दिलेरखानाच्या ५००० च्या सुलतानढव्याला [डोक्याला कफन बांधून, जीवाची पर्वा न करता केवळ विजयासाठीची चढाई करण्याची मुघल पद्धत] उत्तर देण्यासाठी बाहेर पडलेल्या उण्यापुर्या ७०० कडव्या मावळ्यांची. त्यात मुरारबाजींचं शौर्य बघून दिलेरखानानं मनसबीचं आमिष दिलं.. झालं.. त्या निरोपानं कृद्ध झालेल्या मुरारबाजींनी सरळ मुघल सैन्याच्या मध्यात घुसून खानालाच कापण्यासाठी चाल केली..!!
अरे बाकी सर्व जाऊं देत.. समोर कमीतकमी १५ ते २० हजार सैन्य आहे आणि त्यात समोरासमोर घुसून मुख्य सेनापतीलाच कापून काढायचा विचार सुद्धा आपल्याला वेडेपणाचा वाटतो.. कोणत्या मुशीतून ही माणसं घडली होतीत कोण जाणे.. वाईट याचं वाटतं की आपल्याला त्या बहद्दरांची साधी नावं सुद्धा माहित नाहीत! कसे लढले असतील, काय केलं असेल.. काही समजत नाही.. बरं तेवढ्यानं ही लढाई संपली काय?
पुरंदर आणि वज्रगड हे दोन जुळे गड आहेत. मिर्झाराजांचा वेढा सुरू होऊन ६ आठवडे झाले - त्यात वज्रगड पडला, ३ तोफा वर चढल्या, एक मुख्य बुरुज उडाला आणि सर्वात मुख्य म्हणजे किल्लेदार मुरारबाजी स्वतः पडले. येवढ्या दिवसांत जवळपास ७०० ते ८०० मावळे कामी आलेत. मग त्या गडात उरलंच काय होतं शत्रूसैन्याला अडवण्यासाठी? बाहेरचा संपूर्ण किल्ला शत्रूच्या ताब्यात, तोफांचा अविरत मारा चालूच, कोणतीही मदत मिळण्याची कसलीही आशा नाही.. अशा परिस्थितीत उरलेले मावळे पुढचे ३-४ आठवडे आणखी लढत होतेत.. म्हणजे अगदी हद्द झाली..! शिवरायांनी तो गड ताबडतोब सोडण्यास स्वतः सांगेतोवर, त्यांनी जागा सोडली नाही की जीव मोडला नाही.. मला अजूनही नुसता विचार केला तरी अंगावर शहारा येतो..!! दिलेरखानाची पुरंदरावरील संपूर्ण विजयाची खुमखुमी शेवटी अधूरीच राहिली.. ! किंबहुना दिलेरखानाला आणि त्यायोगे मिर्झाराजांना मावळ्यांच्या चिवट आणि अभेद्य हिंमतीची कल्पना याच लढाई दरम्यान आली. मिर्झाराजांच्यासाठी पुरंदरचा तह म्हणजे कारकीर्दीचा परमोच्च बिंदू. कारण या लढाईनंतर मिर्झाराजे पुन्हा कोणताही मोठा पराक्रम घडवू शकले नाहीत, यातच सर्व आलं.
युद्धकाळ: ३१ मार्च ते १२ जून १६६५.
वज्रगड पडला: १४-१५ एप्रिल १६६५.
मुरारबाजी पडले: १६ मे १६६५.
पुरंदरचा तहः १२ जून १६६५.
त्याच लढाईबद्दलचे हे एक छोटेखानी कवन.. काही संदर्भ वगैरे चुकला असेल तर नि:संशय माझाच.. कृपया दुरुस्ती सांगावी.
====================
कफन बांधुनी आलेला.. कफनातच गेला..
शत्रूचा आवेशही गळला.. कफनातच मेला..
संख्येची त्या तमा कुणाला? आता वज्राघात..!
हट्टानं अन् पेटून उठलं तलवारीचं पातं!
असंख्य शस्त्रं जेथे थकली.. ते शब्दांनी झालं
खानाच्या बोलांनी काळीज अंगारून आलं..
उफाळला तो त्वेष पुरंदरी.. अवघा निमिषांत..!
हट्टानं अन् पेटून उठलं तलवारीचं पातं!
कडाडून जणू वीज उमटली शस्त्राघातातुनी..
प्रलयभयंकर शब्द उतरला गडमाथ्यावरुनी..
अगणित शत्रूंमध्ये घुसला, जळता प्रपात!!
हट्टानं ते पेटून उठलं तलवारीचं पातं!
तलवारींचं रुद्रभैरवी तांडव गरजत रणी..
चिरफाळला जो उभा राहिला त्यांच्या अंगेजणी..
खानाच्या वेधानं सुटला तो लोळ रोंरावत!!
हट्टानं ते पेटून उठलं तलवारीचं पातं!
जो जो..जे जे..पुढ्यात आले..तुटले..करवतले..
रक्त माखल्या रणात डोंगर..राईंचे उठले...!!
शस्त्र-देह-दगड-जनावर.. कुणा न चुकली मात!!
हट्टानं ते पेटून उठलं तलवारीचं पातं!
शत्रू अचंबित.. वेग अलौकिक.. गगनी थरकांप..
शस्त्र अनावर.. देह पुरंदर.. शत्रू अपलाप..
गजारूढ तो खान.. तरीही.. चरकला हृदयात!
हट्टानं ते पेटून उठलं तलवारीचं पातं!
बाण सणसणत सुटले परंतू लक्ष्यच साधत नाही..
नरसिंहाचे तेज धुरंधर.. शत्रूंमध्ये त्राही..
एक तीर पण चुकला.. घाला पडला.. आघात..
धारातीर्थ म्हणा तयाला.. ते हट्टाचं पातं...
वेगाचा तो नाद गूंजला.. गरजूनच गेला!
खान वाचला जरी.. आसुरी माज शांत झाला!
"नरडीचा त्या घोट गिळाया उरले चार हात!"
नि:श्वासातून जणू म्हणालं हट्टाचं पातं!
--
तेजस्वी तो प्रताप केवळ.. त्याला उपमा नाही..
संक्षेपानं बचावल्याच्या पराभवाची ग्वाही!
त्या हट्टानं धडकी भरली शत्रू काळजांत!!
स्वराज्याच्या शिरपेचातील तेजस्वी पातं!!
====================
राघव
टीपः
- हे कवन २०१७ च्या मिपा दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेलं आहे. पण सतत अपूर्ण वाटत होतं.. त्यात आणिक ३ कडवी झालीत, तेव्हा कुठं समाधान झालं. थोडा संदर्भ आणि कवन असं स्वरूप करून इथं परत प्रकाशित करतोय.
- काही ठिकाणी मीटर चुकलंय याची जाणीव आहे मला, पण चपखल शब्द जो वाटला तो तसाच ठेवण्याच्या अट्टहासामुळे असं झालंय.