चुलीवरील जेवणाचा घरगुती आस्वाद....
धकाधकीच्या दैनंदिन जीवनातला आजचा दिवस माझ्यासाठी अतिशय खास राहिला. सकाळीच दिपकदादांचा (आमचे पुणे येथील मोठे बंधु) फोन आला. माईंना खास वैदर्भीय खणखणीत डाळभाजी आणि पोळी चुलीवरचं जेवण करायचे आहे म्हणुन. आमच्या माई सौ. सिंधुताई सपकाळ यांना आज अमरावती आल्यावर खास वर्हाडी जेवणाचा आस्वाद घ्यायचा होता. मग लागलो तयारीला. सरोज चौकातील रुक्मिणी वल्लभ झुणका भाकर केंद्रात ऑर्डर दिली. माई, दिपकदादा, शामराव दादा, विनय दादा, मी, अधिक्षिका मॅडम, पांडा भाऊ, चालक नितीन दादा, असे आम्ही सर्व एकसाथ जेवायला बसलो. डाळभाजी, झुणका, पाटोळी, पोळी, भाकरी, ठेचा, लिंबुचे लोणचं असं अस्सल महाराष्ट्रीयन चुलीवरचं घरगुती जेवणं बऱ्याच दिवसांनी मिळाल्याने माईंनी शिरभाते कुटुंबियांचे भरभरून कौतुक केले. झुणका भाकर केंद्राच्या संचालिका सौ.माधवी घनश्याम शिरभाते, रितेश घनश्याम शिरभाते, अमित घनश्याम शिरभाते यांनी स्वतःअपार कष्ट करून उभं केलेलं रुक्मिणी वल्लभ झुणका भाकर आज अमरावतीकरांसाठी जेवणाची खास पर्वणी ठरत असल्याचे उदगार काढले. तोवर जेवण सुरू असताना अनेक लोक जेवायला येत होते. ह्या तर माई आहेत. म्हणून जो-तो माईंचे दर्शन घेत होता. जेवण होईस्तोवर झुणका भाकर केंद्रात माईंना चाहणाऱ्या, प्रेम करणाऱयांची चांगलीच गर्दी जमली. होती. माईंनी चुलीवरचं जेवण घेतल्यावर पुढील प्रवासाला सुरुवात केली. तेव्हा शिरभाते काकूंनी आज माईंनी आमच्या भोजनालायत भेट दिली. त्यामुळे आम्ही धन्य झाल्याचे सांगितले. त्यांचे मोठे चिरंजीव रितेश शिरभाते हे ग्रॅज्युएट झाले असून स्वतः किचनरूम मध्ये भाजी बनवितात. तर थोरला मुलगा अमित कुणाला काय हवं, काय लागतं कोणी काय ऑर्डर दिली, ती व्यवस्थित दिली की नाही यावर सतत बारीक लक्ष्य ठेवून असतो. तर शिरभाते काकू काउंटर सांभाळतात. हे दोन्ही बंधुराजे आईला कामात हातभार लावंतांनाचे दृश्य पाहून माईंनी दोघांचं कौतुक केलं. एवढंच नव्हे तर लेकरांनो असेच जन्म देणाऱ्या माऊलीला कामात हातभार लावत रहा, तुम्ही तिघे ही पुण्याच काम करत आहात अस माई म्हणाल्या.
रुक्मिणी वल्लभ झुणका भाकर केंद्राच जेवढं कौतुक केलं तेवढं कमीच आहे. महाराष्ट्रायिन अस्सल वर्हाडी चुलीवरील घरगुती भोजनाचा आस्वाद घ्यायचा असेल तर एकदा नक्कीच इथे भेट देऊन आस्वाद घेतला पाहिजे.
मुकेश चौधरी,
मेळघाट अमरावती!!
मो. न. 9049068803