जातस त जाय,
येति रावून बी
नसे काई उपाय
नेजो
पाच पोते तांदूर
पन्नास पायल्या तूर
जाता जाता हेडून घेजो
मोहावरचा मोवतूर
दूध देवाचा बंद करन
आता तुयी गाय
जातस त जाय
करजो
सकारी एक फोन
दिसबुडता आठोन
हर मैन्याले पाठवजो
रुपये हजार-दोन
तुयी वाट पायतीन
घरवाले सप्पाय
जातस त जाय
सांगजो
पोराले आपल्या झाडीच्या गोठी
बाघ कोटी ना बावनथडी कोटी
आला कई त दाखवून डाकजो
अमराईतले सेंदऱ्या, गोल्या, घोटी
निस्यान सोडून तं जाते
वल्या खपनीमदी पाय
जातस त जाय
- संकेत,
१० मार्च, २०१८, पुणे
-------------------------------------------
हेडून म्हणजे काढून
मोवतूर म्हणजे मधाचे पोळे
देवाचा म्हणजे द्यायचे
सप्पाय म्हणजे सगळे
बाघ आणि बावनथडी या नद्या आहेत.
कोटी=कुठे
निस्यान =निशाण
खपन म्हणजे चिखल, पाय रुततात असा थोडा घन असलेला चिखल. आमच्याकडे किचड हा चिखलाचा वेगळा प्रकार.