पावसाळ्यातल्या पदार्थ तसे फारसे नसत पण आषाढ लागला कि आषाढ तळणे हे एक काम असे . त्यात मग मुख्यतः तिखट आणि तळणाचे पदार्थ असत . चकली, खाऱ्या शंकरपाळ्या, तिखटाच्या पुऱ्या असे ते पदार्थ असत . आमच्या कोल्हापुरी भागात कर्नाटकी बेंदूर असतो तर तोही असाच जून जुलै महिन्यात येतो तर त्यासाठी खडूगळी (कडबोळी ) केली जात . बोली भाषेत खडूगळीच म्हणतात . हे म्हणजे तेच बेंदराला मातीच्या बैलांच्या शिंगात गोल जे वळे घातलेले असत तेच . त्यात हरबरा डाळीचे पीठ, कणिक आणि गूळ असे भिजवून त्याची गोल गोल वळी बनवायची आणि नंतर तळायची . अजूनही आईकडे ती बनतात . बैल पुजल्यावर हळूहळू त्या बैलांना वळ्यांसकट खेळायला घ्यायचे आणि वळी खाऊन टाकायची . त्याच पिठाच्या डिश एवढ्या आकाराच्या पुऱ्याही लाटत . आषाढात तो डबा पुरे . ह्याच पावसाळ्याच्या सुरवातीला वर्षेभरचे लोणचे घातले जाई . आंब्याच्या लोणच्याच्या करकरीत फोडी मटकावण्यातील मजा तर सांगायला नकोच . पहिल्या पावसाची भजी ,उडदाचे गरम घुटे, शेंगा भातावड्या भाजल्या जात.
शेतात सोडायची परडीही बहुतेक मे जून मध्येच असायची . त्यात पण खारीक खोबरे पुरणाच्या पोळ्या, तुपाचे कणकेचे दिवे आणि बरेच काय काय असे पण ते मात्र मुलंच खात . परडी सोडून येतानाच त्यांचा खाण्याचा कार्यक्रम असे बहुतेक . वटसावित्री जरी बायकांसाठी असली तरी त्या दिवशी आंब्याची ओटी भरली जायची त्यामुळे पावसाळा लागता लागता भरपूर पिकलेले आंबे आणि आमरस खायला मिळे . आषाढ पाळायला आलेल्या नवर्याही खूप असत . मग त्यांना आणताना नेताना दोन्हीकडून बुत्ती दिली जाई .त्यातपण बुंदीचे लाडू , करंज्या , चकल्या , सजुर्या , केळ्याची फणी असले काय काय दिले जाई .
मग श्रावणात येई ते श्रावणी शुक्रवार . दर शुक्रवारी हळदी कुंकू असायचे आणि त्यावेळी प्रत्येक घरात गोड कोमट दूध आणि फुटाणे दिले जाई. बरोबर पान आणि सुपारी पण . अशी खूप पाने जमत मग संध्याकाळी शुक्रवार चे उपवास पुरणपोळ्यावर सोडले जात. आणि रात्री मग झोपताना विड्याचा बेत . नुसता चुना लावून, कात घालून, सुपारीचे तुकडे घालूनच ते साधेसे पान असायचे पण ते तेंव्हाच आणि तसेच मिळे म्हणून त्याचेही अप्रूप होतेच.
श्रावणी सोमवार सोडताना मुळ्याची कोशिंबीर मस्ट होती . अजून एक श्रावण हा तसा उपवासाचा महिना असल्याने उपवासाचे सर्व पदार्थ तेंव्हा होत . राजुगारीचे लाडू , शेंगदाण्याची चिक्की , साबुदाण्याची खिचडी हे सर्व घरी बनेच . राळ्याचा रोळून केलेला भात, शेंगदाण्याची आमटी आणि चिंचेची चटणी सुद्धा . नारळी पौर्णिमेला नारळी भात आणि ओल्या खोबऱयाच्या वड्या . नागपंचमी ला तर ओल्या नारळाच्या आणि पुरणाच्या करंज्या.त्यांना दिंडे म्हणत आणि त्याचाच नैवेध असे .
पुढे गौरी गणपती येतात तेंव्हा मोदक तर सर्वांच्या घरी होतेच पण त्याचबरोबरीने पंच खाद्य , गव्हाची खीर हा पण अतिशय आवडता पदार्थ व्हायचाच . गौरी पुढे मांडायला थोडे थोडे दिवाळीचे पण पदार्थ केले जात . गौरीच्या दोऱ्यांबरोबर दही भात , काकडीचे काप, खारीक , खोबरे जे ओवशात पुजलेले असे ते मिळे . अळूची वडी किंवा पिटल्याची वडी पण गौरीसाठी बनवली जाई .
तोवर दसरा येई . शेतातल्या भुईमूंगाच्या शेंगा निघत . त्या भाजणे , उकडणे , उकडून वाळवणे असेही प्रकार होत .मक्याची कणसेही भाजली जात . उकडली जात . मक्याच्या दाण्याचा चिवडा केलाजाई . सर्वात मुख्य आकर्षण असे ते दसऱ्यातल्या कडाकण्याचे . सीताफळंही ह्याच दिवसात लागत . आमच्या आख्ख्या शेताच्या बांधावर सीताफळांची झाडे होती . काय सांगू किती सीताफळे खाल्ली आता १२० रुपये किलो घेताना जीव अक्षरशः जळतो .
पुढे दिवाळी येते आणि त्यात होणाऱ्या पदार्थाची नावे तर काही सांगायला नकोत .
दिवाळी संपून चिक्कार भाजीपाला येई . त्यातल्या गाजराचे . हरभऱ्याचे , कांद्याच्या पातीचे , दही भात कालवून मुद्दी केली जाई ती मुद्दी पौर्णिमेला .त्याची चव अहाहा . महादेव लिंपलेल्या भाताची पण एक मस्त चव असते . आवळे चिंचा , बोरं पण ह्याच काळात येतात . हे खाण्यातली मजा तर सांगायला नकोच . अजून लहान होऊन रानोमाळ भटकू वाटतंय .
अजून खूप पदार्थ असतील जे पूर्वी करायचे लोक पण आता ... गेले ते दिन ...राहिल्या त्या आठवणी .