" अहो ऐकताय ना?.."
" नाही.. कानात तेल ओतलयं मी.."
" काय ओ, कधीतरी प्रेमाने बोलत जावा माझ्याशी.."
" अगं आज खूप कंटाळा आलाय.. मी एक झोप काढू का?"
" ओ.. झोपताय काय?.. आज काय आहे माहीत आहे ना?"
" काय आहे?..."
" अहो, ती मागच्या गल्लीतली कविता आहे ना, आज तिच्या बहिणीचा साखरपुडा आहे.."
" मग?.."
" मग काय?.. चला ना जाऊया आपण पण.."
" छ्छे... काय गं... कोण कविता आणि कोणाची बहीण?.. मला कंटाळ येतो बाई ह्या सगळ्याचा.."
" काय ओ, सगळ्या बाया वाट बघतील ना माझी.."
" बरं मग, तू जाऊन ये "
" मी एकटी नाही जाणार.."
" मग सोड ना, काय बिघडणार आहे.. लग्नाला तर जाणारच आहे ना आपण.."
" पण?.."
" हे बघ राधा.. तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतीस.. हवं तर चल मी तुला सोडून येतो.. पण चार चार तास एकाच जाग्यावर बसून, त्या म्हाताऱ्या बायांची गाणी ऐकण म्हणजे.. छे छे.. मला नाही जमणार..
बोल मग.. येऊ का सोडायला?.."
" नको रहुद्या.. लग्णालाच जावू "
" आत्ता काय झालं?.."
" काय नाही.. "
" अगं सांग ना काय झालं.."
" अहो खरंच काही नाही, सोडा तो विषय आता.."
" बरं बाई सोडला.."
" अहो, ऐकाना.."
" आता काय?.."
" चला ना बाहेर गार्डन मधे बसुया आपण.."
" राधा काय आहे गं?.. जरा शांत बसुदेना मला.."
" ओ, चला ना खूप मस्त वातावरण आहे बाहेर.."
" अगं काय बोलतीयेस.. बाहेर बघ तरी, किती ढग आलेत ते.. पाऊस पडेल एवढ्यात.."
" ओ चला, काही येत नाही पाऊस वगैरे.. थोडावेळ बसू आणि येऊ आत.."
" बरं चल.. (पाऊस आला अनी जर मी भिजलो.. मग सांगतो तुला)"
" ओ थांबा थांबा.."
" आता काय माझी आई?.."
" मी थोडी कॉफी घेऊन येऊ का?.."
" आता कशाला कॉफी.. चल.."
" थांबा.. मी आणतेच.. दोन मिनिटे तर लागतील.."
" घेतलं सगळं?.. का अजून काय राहिलंय बग..."
" काय ओ.. आपल्या दोघासाठीच तर घेतेय ना.."
" पण किती उशीर गं?.."
" झालं झालं.. चला.."
" किती गार वारा येतोय ना?.."
" ह्म्म.."
" संध्याकाळचं वातावरण किती मस्त वाटतं ना ओ?.."
" ह्म्म.."
" काय ह्म्म ह्म्म करताय?.. बोलाना काहीतरी.."
" तुझी बहीण कुठ असते गं सध्या?.."
" छे.. काय ओ, माझ्याबद्दल बोला म्हटलं तुम्हाला.. तुमचं नेहमी भलत्याच विषयाकडे लक्ष.."
" जरा कॉफी दे गं.."
" हे घ्या.. तुमचं तर माझ्याकडे कधी लक्षच नसतं.. नेहमी आपल तेच, काम काम आणि काम.. विसरलात का?.. लग्नाआधी कसं काम धंदा सोडून माझ्या मागे फिरायचा ते.. माझ्या भावाकडून दोनदा मार सुद्धा खाल्लात.. पण म्हणतात ना, माणसाला एकदा हवी ती वस्तू मिळाली की त्याची किंमतच उरत नाही.. "
" चला आत, पाऊस आला बघा.."
" थांब राधा.."
" काय आहे, हात सोडा माझा आणि चला आत.."
" हा हात सोडण्यासाठी नाही धरला राधे.."
" आता काय शक्ती कपूर आला काय अंगात तुमच्या?.. चला "
" अरे देवा... ही बाई मला रोमँटिक होऊच देत नाही.."
" म्हणजे.. काय बोलताय काय तुम्ही?.. तब्बेत ठीक आहे ना.."
" तू बस आधी.. खाली बस.."
" पण पाऊस?.."
" श्शशशश.."
" अहो आपण भिजतोय.."
" माझ्या डोळ्यात बघ राधे, माझ्या डोळ्यात बघ.."
" शिवता कर मी राधेचे.. तरंग उठले लाजेचे
नयन तिझे स्थिर होऊनी.. मोजे कंपन ओठांचे
स्पर्श होता सरसर कापे.. भिती उराशी लाखाची
थेंब दिसे मज दवबिंदू जब.. हसती राधा गालाशी "
.
.
.
.
.
" अहो थांबा.."
" काय गं?.."
" पाऊस थांबला...."
" पण मी नाही... आज तरी नाही.."
......................................................................
– दिपक लोखंडे.