साहित्य
अर्धा किलो खेकडे/चिंबोर्या/कुरल्या, साफ करून
१ मोठा कांदा बारीक चिरून
१ मध्यम कांदा उभा चिरून
१ तमालपत्र
१ तुकडा दालचिनी
२ ते ३ हिरवे वेलदोडे
१ बडी इलायची
२ चमचे धने
१ चमचा शहाजिरे
२ ते ३ लवंगा
१० ते १२ काळेमिरे
१ मूठ किसलेले ओले खोबरे
२ चमचे पंढरपूरी डाळं
२ चमचे आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट
१ चमचा लाल तिखट
१ चमचा हळद
१ लिंबा एवढ्या चिंचेचा कोळ
मीठ चवीनुसार
२ ते ३ मोठे चमचे तेल
चिरलेली कोथिंबीर
कृती
हि कृती माझ्या आईची. अगदी लहानपणा पासून ह्या अश्या खेकड्याच्या मसाल्यावर ताव मारत आलोय. यंदा सुद्धा पाककृती केली तिनेच आहे, मी फक्त प्लेटिंग आणि फोटो काढलाय. मी अकरावीत असताना वडिलांचा अपघातामुळे हाथ फ्रॅक्चर झालेला, तेव्हा त्यांना, खेकडे खा, असा सल्ला डॉक्टरांनी दिलेला. मूळचे खवय्ये असलेले वडील आणि सुग्रण असलेली आई, त्यामुळे मग अगदी दर २ दिवसा आड घरी जेवायला खेकडे आणि हे असं मसालेदार कालवण! पण हे प्रकरण इथेच थांबला नाही, ऐन बारावीच्या परीक्षेच्या ४ महिने आधी, अस्मादिक स्वतः सायकल वरून पडले, आणि हाथ मोडून घेतला! मग काय, पुन्हा खेकडे पुराण सुरु! शेवटी शेवटी तर अगदी नकोसे झालेले नंतर कित्येक दिवस खेकडे!
खेकडे साफ करून त्यांना हळद आणि तिखट लावून ठेवा. एका पॅन मध्ये १ चमचा तेल सोडून त्यात आधी उभा चिरलेला कांदा छान लालसर परतून घ्या. ह्यातच किसलेले ओले खोबरे आणि पंढरपुरी डाळं घालून ते देखील कांद्या सोबत छान खरपूस भाजून घ्या. (पंढरपुरी डाळं वापरल्याने रस्श्याला एक दाट पणा येईल, ते नसल्यास १ चमचा तांदळाची पिठी पाण्यात घोळवून वापरली तरी चालेल). हे गार झाल्यावर मिक्सर मधून अगदी बारीक वाटून घ्या. (वाटल्यास थोडा पाणी घालून).
ह्याच पॅन मध्ये सगळे खडे मसाले भाजून, मग त्याची मिक्सर मधून पावडर करून घ्या (अश्या ताज्या गरम मसाल्याचा वास, आणि त्याने पदार्थाला येणारी चव हि काही वेगळीच असते!).
पॅन मध्ये तेल घालून त्यात बारीक चिरलेला कांदा ३ ते ४ मिनिटे परतून घ्या. ह्यात आता आलं लसूण मिरची पेस्ट घालून अजून थोडा वेळ परतून घ्या. ह्यात खेकडे घालून ते कांद्या सोबत परतून घ्या. आपण बारीक वाटलेली कांद्या खोबऱ्याची पेस्ट ह्यात घालून, थोडं पाणी घालून, मंद आचेवर, झाकण ठेवून, खेकडे शिजू द्या (साधारण १०-१५ मिनिटे). शेवटी गरम मसाला पावडर, चवीनुसार मीठ आणि चिंचा कोळ घालून अजून एक वाफ द्या. रश्याला दाटपणा जसा हवा असेल त्यानुसार पाणी कमी जास्त करा. वरून चिरलेली कोथिंबीर घाला.
हा असा मसालेदार रस्सा मऊ भात सोबत खायला घ्या!
[खेकड्याच्या रस्सा आदल्या दिवशी करून फ्रिज मध्ये ठेवावा, दुसऱ्या दिवशी खायला घ्यावा. त्याने खेकड्याची चव अतिशय सुंदर उतरते रश्यात!]