ही रंगीबेरंगी, नाजूक दिसणारी डिश डोळ्यांना सुखावतेच. शिवाय, पाहुणे येणार असतील तर मेनूमध्ये छोले किंवा इतर चमचमीत भाजीबरोबर 'बॅलन्स' करायलाही छान आहे.
साहित्यः
१५-२० रंगीत (लाल, केशरी, पिवळ्या) मिनी पेपर्स,
२०० ग्रॅम पनीर,
१ टोमॅटो,
१ टी.स्पून लाल तिखट,
१/२ टी.स्पून गरम मसाला,
१/२ टी.स्पून जीरे पूड,
१/२ टी.स्पून धनेपूड,
२ टी.स्पून साखर,
तेल,
मीठ,
कोथिंबीर बारीक चिरुन
१/२ टी.स्पून खसखस,
१ टी.स्पून तीळ,
८-१० काजू बिया,
५ लवंगा,
३ वेलदोडे,
१ इंच दालचिनी,
४-५ काळे मिरे,
१ तमालपत्र
कृती:
१. लवंगा, वेलची, दालचिनी, मिरे, तमालपत्र एका कढईत मंद आचेवर ५-६ मिनिटे भाजून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये पूड करुन घ्या. भाजीसाठी १/२ टी.स्पून घेऊन बाकी हवाबंद डबीत भरुन ठेवा (पंजाबी भाज्या, पुलाव इ. मध्ये वापरु शकता).
२. खसखस, तीळ, काजूबिया कढईत मंद आचेवर भाजून घ्या. मिक्सरमधून बारीक करुन घ्या.
३. टोमॅटोची मिक्सरमधून पेस्ट करुन घ्या.
४. १ टे.स्पून पनीर किसून वेगळे काढून ठेवा. बाकीचे भाजीसाठी बारीक करुन घ्या.
५. एका कढईत तेल गरम करुन त्यात गरम मसाला, तिखट, टोमॅटो पेस्ट, पनीर, जीरे पूड, धने पूड, साखर घाला. त्यात (१) मध्ये बनवलेला मसाला १ टी. स्पून घाला, (२) मध्ये बनवलेली पूड घाला. चवीप्रमाणे मीठ घालून झाकण ठेवून मध्यम आचेवर ७-८ मिनिटे शिजवा. हे सारण मिनी पेपर्स मध्ये भरायचे आहे, त्यामुळे ते फार पातळ असू नये. (आवडीप्रमाणे साखर आणि इतर मसाले कमी-जास्त करा).
६. सारण गार होईपर्यंत मिनी पेपर्स धुवून घ्या, आणि प्रत्येकीला एक उभी चीर द्या, म्हणजे त्यात सारण भरता येईल.
७. प्रत्येक मिरचीत सारण भरुन घ्या. (सारण उरले तरी चालेल.)
८. एका पसरट, मोठ्या पॅनमध्ये १-२ टी.स्पून तेल गरम करा. त्यात एक एक करुन भरलेल्या पेपर्स सारण बाहेर येणार नाही अश्या ठेवा. झाकण ठेऊन शिजू द्या (या मिरच्या शिजायला वेळ लागतो). सर्व बाजूंनी नीट शिजण्यासाठी हळूवार थोड्या थोड्या फिरवून पुन्हा आचेवर ठेवा. मिरच्या शिजत आल्या की सारण उरले असेल ते वरुन भुरभुरा. पुन्हा २-३ मिनिटे आचेवर ठेवा.
९. एका डीशमध्ये सर्व मिनी-पेपर्स काढून घ्या. वरुन कोथिंबीर आणि किसलेले पनीर घालून सजवा. पोळी/ पराठ्याबरोबर खायला द्या.