लहानपणी खरवस एकतर घरच्या म्हणजे आजोळच्या गायींच्या चीकाचा असायचा,नाहीतर गोरेगावहून एक भय्याजी येत असत.ते आमच्याकडे आले की, वाटीभर चीक तसाच देत असत.तो कितव्या दिवसाचा आहे हेही सांगत असे आणि मग आई ठरवायची त्यात कितीपट दूध मिसळायचे ते.त्यात साखर किंवा गूळ,वेलचीपूड घालून एका मोठ्या पातेल्यात पाणी घालून, त्यात हे छोटे पातेले घालून,छोट्या आणिमोठ्या पातेल्यावर झाकण्या घालून स्टोव्हवर चढवले जाई.दहा पंधरा मिनिटातच वेलचीचा स्वाद दरवळू लागे,आई त्यात सुरीचे टोक बुडवून पाही.आईचे समाधान झाले की, भावाची घासाघीस सुरु होई.भय्याजीना माहीत असे,की,मनाजोगा भाव ठरला तर आणलेला सगळा चीक संपणार.त्याचे कारण असे मामाचे घर पुढच्या गल्लीत,बाळगोविंददास रस्त्यावर .तिथल्या कोटवाडीचे जमीन मालक.आई घरात थोडा चीक घेऊन,भाव ठरवून,मी किंवा माझ्या धाकटा भाऊ,किरण बरोबर ठरवलेला भाव आणि कितव्या दिवसाचा चीक हे सांगायचे महत्वाचे काम देऊन त्या भय्याजीना तिथे धाडत असे.
दोन मामा,दोन मामी आणि त्यांची प्रत्येकी पाच/पाच मुले शिवाय दहाबारा नातेवाईक,त्यातले काही कुटुंबासह कायमच तिथे असत,शिवाय नोकरचाकर पाच/सहा तरी एका वेळी असत.त्यात आम्हीही बरेचदा असू.कधीही कुठचीही वस्तू किंवा खाऊ वाटताना मोठी मामी ,अण्णी म्हणत तिला,धाकट्या मामीला म्हणत असे.
"प्रतिभा,माझी पाच,तुझी पाच, माईची चार.इथेच झाले चौदा,"मग ज्या नातेवाईकांची मुले असत त्यांची मोजणी होऊन मग जोडपी मोजली जात.मग एकएकटे राहणारे जमेला धरून,नोकर मंडळीची गणती होई आणि नंतर आलागेला पाहुणा या सदरात दहा वाटे निघत. माई म्हणजे माझी आई.आम्ही तिथे असू नसू ,आमचे वाटे कडून ठेवले जात.घरातील कोणाकरवी पोचवलेही जात.
तर असा चीकवाला भय्या तिथे पोचला की,मामी आधी विचारे,
“माई येतायत ना?”प्रसंगपरत्वे माझी आई तिथली हेड शेफ असायची.मग मोठाल्या गंजात तो चीक मोजून घेतला जायचा.भय्याजीला चहा देऊन ,पैसे देऊन पाठवले जायचे.मग नेहमीच्या स्वयापाकाच्या धांदलीत,दोन माणसांना गूळ किसायचे काम दिले जाई, दोन वहिन्यांना नारळ किसून दुध काढायचे काम दिले जाई.साध्या दुधाऐवजी नारळाच्या दुधातला गूळ घालून केलेला खरवस खाल्ला आहे का कधी?नसाल खाल्ला तर नक्की खाऊन पहा.अप्रतिम लागतो.
मामी जास्तीची साखर काढून आणत असे कुलुपातली जायफळे,वेल्चीसोबत बाहेर येत.जोडीला केशराची डबीही निघे.केशरी खरवस साखरेचा.आई पोचली नसेल तर,मामी लाडिक तक्रार करत असे,“आता कशाला जेवण करत बसल्यात माई,इथेच जेवला नसतात का सगळे?’’सगळी तयारी होईपर्यंत आई पोचेच.सगळ्या तयारीकडे नजर टाकून घरातला वाटीभर चिकाचा डबा मामीच्या हातात देत असे.मामीही हजार असलेल्याना तो प्रसादासारखा वाटत असे.ती चव पोटात धालून,आता हा खरवस कधी तयार होणार याचा विचार आम्ही बच्चेकंपनी करत असू.
आई तो चीक दोन गंजात विभागे.तयारी करणारेही दक्ष अवस्थेत असत.मग कोणत्या पातेल्यात नारळाचे दूध,गूळ आणि जायफळाची पूड घालआयची आणि कोणत्या पातेल्यात साधे दूध,साखर,वेलचीपूड घालायची याचे निर्देश दिले जात,गूळ आणि साखर विरघळवली जात असे. तोपर्यंत थोड्या कोमट दुधात केशर खलून तयार असे.एव्हाना दोन मोठ्या शेगड्या स्वयंपाक आटपून रिकाम्या झालेल्या असत,त्यात निखारे वाढवले जात.चिकाची पातेली आत बसतील असे दोन मोठे गंज पोटात पाणी घालून तयार असत.त्यात ही दोन्ही चिकाची पातेली ठेवली जात असत.पुन्हा नारळाचे दुध आणि गूळ घातलेल्या पातेल्यात जायफळाची पूड शिवरवली जाई,तसेच साधे दूध आणि साखर घातलेल्या चीकाच्या पातेल्यात केशर घालून ढवळले जात असे.वरून वेलचीपूड शिवरवली जाई.आतल्या पातेल्यावर बसणाऱ्या झाकण्यांसहित बाहेरच्या गंजांवर बसणाऱ्या झाकण्या तयार असत.त्या आपापली जागा घेऊन बसत.
आता रसरसलेल्या शेगड्यांमधले अर्धे अर्धे निखारे पत्येक गंजाच्या झाकणीवर विसावत.गंज शेगड्यांवर चढत.आता रात्रभर मंद आंचेवर चीकाचे रुपांतर खरवासात होऊन त्या खरवसाचे दर्शन उद्या सकाळीच होणार असते.आता जेवून आम्हाला झोपवून मोठ्यांच्या गप्पा रंगत.सकाळी जाग येई ती घरभर दरवळणाऱ्या जायफळ,वेलची आणि केशराचा वासाने.भरभ दात घासून,आंघोळी उरकून सगळे स्वयंपाकघरात नाश्यासाठी जमत.पातेली उतरून ठेवलेली असत.वरच्या झाकण्या अलगद उचलून बाहेर नेल्या जात.आतल्या झाकण्या काढल्या जात.
अहाहा! काय ते दर्शन ! पिवळसर रंगाच्या दोन वेवेगळ्या छटातील,त्यावर,वेलची आणि जायफळाचाही वेगवेगळा रंग दर्शविणारा थोडासा खरबरीत पोत. डोळे आणि नाक जीभ खवळून टाकत एकदमच तोंडाला भरीला घालू लागत. आई मोठी विणायची सुई तळापासून घालूनबाहेर काढून पाहत असे.स्वच्छ सुई पाहताच तिच्या आणि दोन्ही मामींच्या तोंडावर समाधान झळकत असे.बाकीच्यांच्या तोंडूनही सुस्कारा निघत असे.आतापर्यंत शांत असलेले स्वयंपाकघर, नुकत्याच बोलायला शिकलेल्या मुलाच्या सततच्या एकाच शब्दाच्या,बोलण्यासारखे गजबजून उठे.“वा! वा! वा! वा!”
मग आई मोठ्या गन्जातली पातेली बाहेर काढत असे ,दोन मोठमोठ्या परती घेऊन त्या पातेल्यांच्या तोंडावर धरून,मदतनीसांच्या सहाय्याने पातेली अलगद उपडी करत असे.आतला खरवस त्याच्या रसासह एक थेंबही न सांडता परातीत थोडासा थरथरत उभा असे.मग आई नवे रीळ घेऊन त्या दोऱ्याने उंचीनुसार चार/पाच ठिकाणी मधून आडवे काप देत असे.त्यानंतर उभे काप देत असे.पुढे मांडलेल्या बशांमध्ये सपाट कालथ्याने भराभर दोन्ही प्रकारच्या खरवसाचा एक एक तुकडा वाढत असे.रांगेत बसलेल्या आम्हा मुलांच्या पुढ्यात बशा सरकत असत आणि पाहता पाहता त्यातला खरवस पोटातही सरकत असे.
आता खात्रीचा चीक मिळणे दुरापास्त झाले,मिळालाच तर कोणत्या दिवसाचा असतो हे कळत नाही.शेगड्या गेल्या,निखारे गेले आणि रात्रभर शिजणारा खरवस काळाच्या पडद्याआड गेला. वेगवेगळ्या मराठी हॉटेलातल्या दररोज मिळणारा खरवस चीकाचाच असेल याची खात्रीही देववत नाही,पण खरवस तर खावासा वाटतो.हल्ली आपल्याला नव्या नव्या शिकवणाऱ्या गुगलबाबाच्या मदतीने एक पाककृती मिळाली.कमीत,कमी साहित्य वापरून केलेली. ती करून पाहिली/ खूप छान वाटली,अर्थात आईच्या हातचीआणि मामेभावंडांच्या सोबतीची चव त्याला नाही.पण म्हणतात ना!दुधाची तहान ताकावर,तसेच काहीसे.अक्षरश: चीकाच्या ऐवजी दही वापरून केलेली.चला तर ,वरचं सगळं वाचून तुम्हालाही खरवस खावासा वाटायला लागला असेलच.चला तर साहित्य पाहूयात.
साहित्य:-
१. एक वाटी दूध.
२ . एक वाटी दही(हे मात्र आदमोरंच हवं.जराही आंबट नको) .
३. एक वाटी कंडेन्स मिल्क .
४. दोन टीस्पून कोर्न फ्लोअर.
५ . एक टीस्पून वेलची पूड .
६ चिमुटभर केशर (ऐच्छिक)
कृती:-
१. एका पसरट भांड्यात किंवा वाडग्यात कंडेन्स मिल्क घेऊन त्यात अनुक्रमे कोर्न फ्लोअर,दही,दूध घालून फेटावे.
२. आता कुकरमध्ये पाणी घालून त्यात हे भांडे किंवा त्यात बसणाऱ्या भांड्यात या भांड्यातले मिश्रण ओतून ते भांडे ठेवावे .
३. वेलचीपूड शिवरावी.शिट्टी न लावता झाकण लावे
४. मंद आचेवर ४० मिनिटे शिजवावे.बस्स! झाला तयार खरवस .
५.वाट कसली पाहताय,हाणा आता.