सळसळणारी हिरवळ देही, विस्तीर्णाचे पान
समांतराचा ध्यास उराशी, सममितीचे भान
हिरवट पिवळे, तांबूस लोलक, नाजुक इवली फुले
वार्यावरती सरसरणारे , गंधविभोरी झुले
हिरवाईवर तांबूस हळदी, केसर भरले तुरे
चेंडूवरती कशिदाकारी, रुणझुणती गोपुरे
कृष्णासखा की म्हणू कदंब, रूप तुझे भरजरी
पानोपानी जणू वाजते कान्हाची बासरी
अवतीभवती पिंगा घालत भ्रमरांची लीला
मोह वाटुनी सोडून येई आम्रतरु कोकिळा
रुंद–अरुंदशा हिरवाईची दाट तुझी सावली
शांत असा विश्रांत जीवाला, स्मरते मज माऊली
- प्राजु
सदर फोटो जालावरुन साभार.