मंडळी,
दिवाळी आणि रांगोळीचं अगदी जीवाभावाचं नातं आहे. लहानपणी रांगोळ्या काढण्यापासूनच सार्वजनिक चित्रकलेला सुरुवात होते. रोजच्या रोज तुळशीपाशी एखादं स्वस्तिक, दाराच्या उंबरठ्यावर गोपद्म, लक्ष्मीची पाऊले असे आईने काढताना आपण बघत आलोय तरी खरी गंमत दिवाळीला असते. त्यावेळी आपल्या चित्रकारीत खरेखुरे रंग भरता येतात. लहानपणी पोपट, मांजर, फुले काढण्यापासून सुरुवात होते. मोठे झाल्यावर ठिपक्यांची रांगोळी जमवण्यासाठी धडपड असते. समांतर ठिपके कोणत्याही फूटपट्टीशिवाय काढण्याचं कसब अंगी हवं, नाहीतर ठिपक्यांचे कागद ती सोय करतात. मग रांगोळीची रेघ नाजूक हवी, रंगसंगती उठावदार हवी असे सल्ले मिळतात.
आता तर संस्कारभारतीच्या रांगोळ्यांमुळे अगदी अंगणभर चितारता येतील असे नमूने व उत्तम रंगसंगती ठिकठिकाणी दिसून येते. रांगोळी रेखताना अगदी मान पाठ एक झाली तरी त्या नक्षीकडे येणारे जाणारे जेंव्हा क्षणभर थांबून बघतात तेंव्हा त्या कष्टांचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. अशाचप्रकारच्या रांगोळीसाठी ही स्पर्धा! मिपाकरांच्याही घरात छुपे कलाकार असतील. स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपण किंवा आपल्या नजिकच्या नातेवाईकांनी काढलेल्या रांगोळीचे छायाचित्र मिपावर या धाग्याच्या प्रतिक्रियांमधे चिकटवावे. कलाकाराचे नाव द्यावे. स्पर्धेतील रांगोळ्या या शेजार्यांनी काढलेल्या नकोत. रांगोळीत तेवणार्या पणत्या असल्या तरी एकंदर फक्त 'रांगोळीची शोभा' हा मुद्दा प्रामुख्याने लक्षात घेतला जावा. कलाकुसर, रंगसंगती याला गुण आहेत.
आपण रांगोळ्यांचे फोटो १० नोव्हेंबरपर्यंत चढवू शकता. सगळे मिपाकर सदस्यच परिक्षक आहेत. त्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत आपापल्या पसंतीच्या तीन रांगोळ्यांस क्रम द्यावा. याठिकाणी आपल्या स्पर्धकांशी असलेल्या मैत्रीपेक्षा कलेला न्याय देणे अपेक्षित आहे. सर्व मते मोजून संपादक मंडळ २० नोव्हेंबरपर्यंत निकाल जाहीर करेल. पहिल्या ३ विजेत्यास्/विजेतीस आंतरजालीय प्रशस्तिपत्रक देण्यात येईल.