नमस्कार मिपाकरहो,
दिपावली अभिष्टचिंतन!
कोणताही सण आला की आपण तो साजरा करताना आई काय करत असे किंवा आज्जी कसे करत असे ते आठवून, त्यांना विचारून, पुस्तकात वाचून त्या पद्धती आचरणात आणायचा प्रयत्न करतो. काहीवेळा सगळे साग्रसंगीत करायला जमते तर कधी गोष्टी शास्त्रापुरत्या कराव्या लागतात. दिवाळी हा आपल्यकडील मोठा सण समजला जातो. चार दिवस आपापले वैशिष्ठ्य टिकवून असतात. वाईट वृत्तीचा नाश करण्यापासून ते लक्ष्मीच्या पुजेपर्यंत तर सासरच्या नातेवाईकांपासून माहेरच्या नातेवाईकांची भेट घडवत हा सण आठवणींच्या सुखाची उबदार शाल मनावर अलगदपणे सोडून पुढील वर्षाची वाट पहायला लावतो. काहीजणांचे फटाके प्रत्यक्षात तर काहीजणांचे मनात तडतडतायत. पूर्वी दिवाळीत ही मज्जा होती, अमूक गोष्टी केल्या, आता त्या बदलल्या आहेत. त्याबद्दलची आवड निवड, घरी आपण किंवा मुलाबाळांनी कौतुकाने केलेले आकाशकंदील, रोषणाई, किल्ले, फराळाचे सजलेले ताट, रांगोळ्या, सहज आलेली आठवण, जमलेले/फसलेले फराळाचे पदार्थ, लक्षात रहाण्यासारखे प्रसंग आपण या धाग्यावर मांडूया. चला तर मग! होऊ दे सुरुवात!
रांगोळी स्पर्धेसाठी वेगळा धागा येतो आहे. स्पर्धेव्यतिरिक्त इतर रांगोळ्या इथे चिकटवायला हरकत नाही.