नमस्कार मंडळी,
गणपती हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि गणेशोत्सव म्हणजे मराठी माणसाच्या मनाचा एक हळवा कोपरा! अंत्यत श्रध्देने आणि मोठ्या भक्तीभावाने हा सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सवांच्या बरोबरीने महाराष्ट्रात घरोघरही जवळपास १२ ते १५ लाख बाप्पांची प्रतिष्ठापना केली जाते. त्यांच्या आगमनापुर्वीच घरात लगबग सुरू झालेली असते. प्रत्येकजण आपापल्या परीने गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झालेला असतो, मग ते दिव्यांची आरास असो वा फुलांची तोरणे, थर्माकॉलचे आकर्षक मखर असो वा गणेशाची सुंदर मुर्ती! हि सजावट अगदी मनोभावे आणि जोरदार केली जाते. घरगुती गणपतींना होणारी ही सजावट लक्षात घेता मिपा व्यवस्थापनाने यावर्षीपासून घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा हा नवा उपक्रम हाती घेतला आहे. आपणा सर्वांना या स्पर्धेत सहभागी होता येईल, त्यासाठी तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्या घरात गणपतीभोवती केलेल्या सजावटीचा फोटो इथे टाकायचा आहे. येणार्या सजावटींमधून सर्वोत्तम तीन सजावटींना मिपा व्यवस्थापनातर्फे पुस्तक स्वरूपात पुरस्कार दिले जातील. त्यासंबधीची इतर माहिती नंतर कळवण्यात येईलच.
चला तर मग!! होऊन जाऊ द्या घरातली सजावट एकदम जोरदार !!
स्पर्धेचे नियम आणि अटी खालीलप्रमाणे :-
१) स्पर्धेचा सहभाग सर्वांना खुला असेल.
२) प्रत्येक स्पर्धकाने फक्त आपल्याच घरातल्या सजावटीचा फोटो टाकायचा आहे.
३) स्पर्धकाला प्रत्येकी २ फोटो टाकता येतील.
४) आपले फोटो इथेच प्रतिसादामध्ये टाकायचे आहेत. ज्या स्पर्धकांना फोटो टाकण्यात अडचण येईल, त्यांनी व्यक्तिगत निरोपाद्वारे संपादक मंडळ या आयडीला कळवायचे आहे.
५) आलेल्या सजावटींमधून सर्वोत्तम तीन निवडण्याचा अंतिम निर्णय परिक्षकांकडे राहील.